Skip to main content
x

साधू, अरुण मार्तंडराव

रुण मार्तंडराव साधू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या गावी झाला. प्राथमिक शिक्षण परतवाडा-अचलपूर येथे तर माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले. विदर्भ महाविद्यालय, अमरावतीतूनच त्यांनी बी.एस्सी. केले. पुणे विद्यापीठातून एम.एस्सी.चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ पत्रकारिता केली. १९६२पर्यंत परतवाडा व अमरावती येथे वास्तव्य केले. १९६२ पासून १९६७ पर्यंत पुण्यात व पुढे १९६७पासून मुंबईत वास्तव्य झाले. केसरी, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, द स्टेट्समन आदी वर्तमानपत्रांसाठी वार्ताहर, विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य केले. फ्री प्रेस जर्नलचे संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. १९८९पर्यंत सक्रिय पत्रकारिता केली. पुढे क्रियाशील पत्रकारिता सोडून ते स्तंभलेखनाकडे वळले. स्तंभलेखक ते कथाकार-कादंबरीकार-विज्ञानलेखक-इतिहासलेखक म्हणून त्यांनी आजतागायत भरगच्च लेखनकार्य केले आहे.

माणसाच्या अंतर्बाह्य विश्वाचा सूक्ष्मपट त्यांनी उभा केला. महानगर-लोकसत्ता-लोकमत या नियतकालिकांतून स्तंभलेखन केले. माणूस-केसरी’, ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘द स्टेट्समन’, ‘फ्री प्रेस जर्नलआदी इंग्रजी नियतकालिकांमधून संपादन-स्तंभलेखन व पत्रकारिता केली. १९९५पासून २००१पर्यंत पुणे विद्यापीठात वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग येथे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.  १९८५मध्ये इंटरनॅशनल रायटर्स वर्कशॉप, आयोवा सिटीअमेरिका येथे भारताचे प्रतिनिधित्व केले. नागपूरच्या ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

अरुण साधू जसे पत्रकार म्हणून प्रख्यात झाले, तसेच ते त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतील महानगरीय छायाचित्रणात्मक शैलीसाठीही मराठी साहित्य प्रांतात प्रस्थापित झाले. मुंबई दिनांक’ (१९७२) आणि सिंहासन’ (१९७७) ह्या दोन्ही कादंबर्‍यांनी महानगरीय वास्तव जीवनाचा आणि महाराष्ट्रातल्या मराठा राजकारणाचा जो टोकदार आणि तिरकस दृष्टीतून वेध घेतला, तो मराठी मनात घर करून बसला. ह्या कादंबर्‍या चित्रपटाच्या माध्यमांतूनही समाजमनावर बिंबल्या. सत्तांध’, ‘बहिष्कृत’, ‘शापित’, ‘स्फोट’, ‘विप्लवा’, ‘त्रिशंकू’, ‘शोधयात्रा’, ‘तडजोड’, ‘झिपर्‍या’, ‘मुखवटाआदी सामाजिक आणि वैज्ञानिक कादंबर्‍यांतून त्यांनी महाराष्ट्राच्या अंतर्बाह्य जीवनाचा आणि विज्ञानाच्या नवनवीन आविष्कारांचा शोध घेतला आहे.

माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘बिनपावसाचा दिवस’, ‘मुक्ती’, ‘मंत्रजागर’, ‘बेचकाह्या कथासंग्रहांतून आणि पडघम’, ‘प्रारंभ’, ‘बसस्टॉपआणि इतर एकांकिकांतून त्यांनी वैविध्यपूर्ण विषयांना न्याय दिला. काकासाहेब गाडगीळ’, ‘महाराष्ट्र: लँड अँड पिपल’ (इंग्रजी), ‘अक्षांश-रेखांश’, ‘निश्चिततेच्या अंधारयुगाचा अंत’, ‘संज्ञापन क्रांती-स्वरूप व परिणाम’, ‘पत्रकारितेची नीतिमूल्येआदी ललितेतर पुस्तकांतून त्यांनी चरित्र- समाजज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान असे विषय हाताळले. आणि ड्रॅगन जागा झाला’, ‘फिडेल-चे आणि क्रांती’, ‘तिसरी क्रांती’, ‘ड्रॅगन जागा झाल्यावरह्या पठडीत समकालीन देशीविदेशी इतिहासावरही त्यांनी ग्रंथलेखन केले. अ सूटेबल बॉय- शुभमंगलही त्यांची भाषांतरित कादंबरी असून त्यांच्या मुंबई दिनांक’, ‘सिंहासनया कादंबर्‍यांचे देशी-विदेशी भाषांमध्ये भाषांतरेही प्रकाशित झाली आहेत. डॉ.जयसिंगराव पवार यांच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज या बृहत् ग्रंथाचा इंग्रजी अनुवादही त्यांनी केला आहे. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ.आंबेडकर या चित्रपटाच्या संहितालेखनातही साधू सहभागी होते.

अरुण साधूंनी केलेल्या वैविध्यपूर्ण ग्रंथसंपदेला राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार’, ‘भैरू रतन दमाणी पुरस्कार’, ‘न.चिं.केळकर पुरस्कार’, ‘आचार्य अत्रे पुरस्कारतसेच साहित्यातील व पत्रकारितेतील योगदानासाठी फाय फाउंडेशनपुरस्कारही प्राप्त झालेला आहे. मराठी कथा-कादंबरीला पत्रकार-लेखक साधूंनी आपली स्वयंभू दृष्टी आणि शैली दिली. नागरीपासून महानगरीपर्यंतच्या परिप्रेक्ष्यात आपल्या ललित-लेखनांतून जगण्याचा कोलाहल मांडला. अरुण साधूंचे वाङ्मय म्हणजे एकोणिसाव्या-विसाव्या शतकात आकाराला आलेल्या महाराष्ट्राचे सर्वंकष वास्तववादी सामाजिक आणि राजकीय जीवन-चरित्र होय...

अरुण साधू यांच्या सामाजिक कादंबर्‍याया लेखात अरुण साधूंच्या वाङ्मयनिर्मितीचे माहात्म्य व्यक्त करतांना दीपक घारे म्हणतात, ‘पत्रकारिता आणि ललित लेखन यांचा संबंध मराठी साहित्यात पूर्वीपासून चालत आलेला आहे. तरी राजकीय शब्दाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला तो विसाव्या शतकातील सत्तरीच्या दशकात. मुंबई दिनांकआणि सिंहासनया कादंबर्‍यांमुळे साधू यांची प्रतिमा एक राजकीय कादंबरीकार म्हणून झाली. साधूंच्या लेखनामागच्या प्रेरणा समजून घ्यायच्या असतील, तर सत्तर आणि ऐंशीया दशकांतील सामाजिक वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातला हा संक्रमणाचा काळ होता. सारी जीवनशैलीच या काळात झपाट्याने बदलत होती. राजकीय म्हणजे स्वप्नाळू राष्ट्रवाद ही कल्पना मागे पडली. त्याची जागा सर्वच क्षेत्रांतल्या दबावगटांच्या सत्तास्पर्धेने घेतली. याचे चित्रण कथा-कादंबर्‍यांतून होऊ लागले. अरुण साधू हे या काळातले एक महत्त्वाचे नाव आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बदलणार्‍या महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनाचे ललित भाष्यकार म्हणून अरुण साधूंच्या एकूण ललित आणि ललितेतर वाङ्मयाकडे पाहता येते.

खुद्द अरुण साधू आपल्या लेखन निर्मिती प्रक्रियेवर भाष्य करतांना म्हणतात, ‘स्वयंभू व्यक्तींच्या अथवा अखिल समाजाच्या भव्य सर्जनशीलतेमधूनच कलाकार अथवा लेखक निर्मितीच्या प्रेरणा घेतात. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या नकळत आपले अभिव्यक्तीचे माध्यम शोधत असतो. हा शोध आयुष्याच्या अंतापर्यंत चालूच असतो. आद्रेलीन प्रवाही होते, ते माध्यम आपले. एखादी गोष्ट अंगात विषासारखी भिनली, अस्वस्थ करू लागली, दाह होऊ लागला की लिहिण्याखेरीज गत्यंतर नसते...अरुण साधूंनी ह्या अंत:प्रवाही ऊर्मीतून कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका आणि स्तंभ अशा माध्यमांतून केलेले लेखन समकालीन इतिहासाचा मागोवा घेणारे आहे.

- डॉ. किशोर सानप

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].