Skip to main content
x

पिंगे, रवींद्र रामचंद्र

      रवींद्र रामचंद्र पिंगे यांची खरी ओळख आहे ती एक उत्कृष्ट ललितलेखक म्हणून. पिंगे कुटुंब मूळचे विजयदुर्गजवळच्या ‘उपळं’ खेड्यातले, पण रवींद्र पिंगे यांची सारी हयात मुंबईतच गेली. त्यांचा जन्म गुढी पाडव्याच्या दिवशी, मुंबईच्या गिरगावातील कांदेवाडीतील केशवजी नाईकच्या चाळीत झाला. वडील रामचंद्र परशुराम पिंगे आणि आई सुभद्राबाई दोघेही मुंबई नगरपालिकेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असत. पुढे ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. विद्येचे बाळबोध वातावरण घरात होते. रवींद्र पिंगे यांना, लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. गिरगावातील चिकित्सक शाळेत शिकत असतानाच त्यांनी हस्तलिखित मासिकाचे लेखन, संपादन केले होते. ते कवितेच्या वाटेवर जाऊन मागे फिरले.

     १९४५ मध्ये पिंगे विल्सन महाविद्यालयात दाखल झाले आणि तेथील ग्रंथालयात वाचनाचा मनमुराद आनंद लुटला. वाचता वाचता स्फुटलेखन, वाङ्मयीन घटनांचे वृत्तान्तलेखन, पुस्तकावर अभिप्राय लिहिणे, परिचयपर मजकूर लिहिणे. असा लेखनप्रवास सुरू झाला. एकीकडे ग्रंथ संग्रहही वाढू लागला.

     १९५५ मध्ये ‘मौज’ साप्ताहिकात युसुफ मेहेरअलींची व्यक्तिरेखा लिहून पिंग्यांनी लेखनाचा श्रीगणेशा गिरवला, आणि पुढे सतत पन्नास वर्षे पिंगे लिहीत होते. ४० ग्रंथांची निर्मिती त्यांच्या नावे जमा झाली आहे. चपखल लेखशीर्षके; अचूक; व नेमकी शब्दयोजना ललित्यपूर्ण, एकात्म, एकसंध, बंदिस्त भाषाशैली हे पिंग्यांचे खास वैशिष्ट्य होय. मौज, साधना, माणूस, वीणा, नवशक्ती, सकाळ, केसरी, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, ललित इत्यादींमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले.

    नौदलाच्या हिशोब खात्यात, रेशनिंग कार्यालयामध्ये नोकरी करीतच, अर्थशास्त्र विषय घेऊन ते बी. ए. झाले.  त्यानंतर त्यांना मंत्रालयात नोकरी मिळाली. तेथे पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर १९६५मध्ये ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात साहाय्यक निर्माता म्हणून रुजू झाले आणि एका चैतन्यमय सृष्टीत दाखल झाल्याचा आनंद निवृत्तीपर्यंत-शेवटपर्यंत त्यांना मिळाला.

     याअगोदर १९५५मध्ये अखिल भारतीय स्तरावरच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत त्यांच्या ‘महापूर’ या नभोनाट्याला पारितोषिक मिळाले. हे नभोनाट्य अनेक भाषांत अनुवादित झाले. ‘दीपावली’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजिलेल्या कादंबरी लेखन स्पर्धेत पिंगे यांच्या ‘परशुरामाची सावली’ या कादंबरीला पुरस्कार मिळाला. त्यानंतर आकाशवाणीसाठी त्यांनी डझनावारी नाटिका लिहिल्या.

     ‘श्रीअरविंदांच्या पाँडेचरीत’ हा लेख सप्टेंबर १९५७च्या ‘सत्यकथा’च्या अंकात प्रसिद्ध झाला आणि पिंगे यांचे नाव वाचकांसमोर ठळकपणे आले. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘माणूस’, ‘वीणा’ ह्यांमध्ये विविध विषयांवर त्यांनी स्तंभलेखन केले. वि. स. खांडेकर, गो. नि. दांडेकर, मंगेश पाडगांवकर ह्यांनीही त्याला पसंतीची दाद दिली. ‘बकुल फुल’, ‘शतपावली’ (१९७४), ‘देवाघरचा पाऊस’ (१९७५), ‘दिवे लक्ष्मण दिवे’ (१९८४), ‘अत्तर आणि गुलाबपाणी’  (१९९६) हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’ (१९७४), ‘आनंदव्रत’ (१९८३), ‘दुसरी पौर्णिमा’ (१९९६) ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ (१९७२), ‘पिंपळपान’ (१९८६), ‘हिरवीगार पानं’ (१९९२) ही पाश्‍चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’ (१९७०) ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’ (१९७८), व ‘सुखाचं फूल’ (१९८१) हे कथासंग्रह; असे विविध स्वरूपाचे लेखन पिंगे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांचे सुमारे दोनशे ललितलेख ‘माणूस’ साप्ताहिकातून सतत पाच वर्षांच्या प्रसिद्ध कालावधीत झाले. ‘साहित्यसूची’चे ते लेखक आणि संपादकीय सल्लागार होते. ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’, तीनशे भारतीयांची व्यक्तिचित्रे, पाश्चात्त्य साहित्यसेवकांचे दोनशे परिचय, शंभर प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, साठ मानपत्रे, पाच-सहाशे ललितलेख, पन्नास कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखनसंपत्ती होय. पिंगे यांच्या लेखनाला वाचकांनी भरभरून प्रेम दिले, दाद दिली.

     ‘परशुरामाची सावली’ला राज्यपुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांना ‘कोकण साहित्यभूषण पुरस्कार’, सोलापूरचा ‘दमाणी पुरस्कार’, गुणसमृद्ध लेखन दीर्घकाळ सातत्याने केल्याबद्दल पुण्याच्या साहित्य परिषदेनेही त्यांना खास पुरस्कार दिला. त्यांच्या इंग्रजीत भाषांतर झालेल्या कथेला ‘दिल्लीच्या कथा’ वार्षिकाचेही पारितोषिक मिळाले.

     रवींद्र पिंगे यांचा पिंड आध्यात्मिक होता. पुट्टपूर्तीचे संत सत्यसाई हे त्यांच्या परमश्रद्धेचे विषय होते. ‘दुसर्‍या पिढीचे आत्मकथन’ (नोव्हेंबर २००८) या ग्रंथामधील त्यांनी केलेले स्वकथन हा पिंगे यांचा शेवटचा लेख आहे.        

- प्रा. मंगला गोखले

पिंगे, रवींद्र रामचंद्र