Skip to main content
x

माने, वसुधा वसंत

     वसुधा माने ह्यांनी बी.ए. करून लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यांचा वसंत माने ह्यांच्याशी विवाह झाला. वसंत माने हे आकाशवाणीवर नोकरी करत होते. त्यांच्या बदल्यांच्या निमित्ताने वसुधाताईंचे दिल्ली, गोवा ह्या ठिकाणी अधिक वास्तव्य घडले.

     वसुधाताईंना समाजकार्याची विशेष आवड होती. पणजीत राहत असताना त्यांनी ‘बालकलाकेंद्रा’तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. शिवाय घर संभाळून कुटुंबनियोजनाचे प्रचारकार्य केले.

     वसुधाताईंनी मोजकेच, परंतु लक्षवेधी ललितलेखन केले. ‘गोव्यातील दिवस’ (१९८६), ‘सरहद्द आणि इतर’ (१९८६) हे त्यांचे आत्मचरित्रपर ललितलेखसंग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गोव्याच्या वास्तव्यात असताना त्यांनी तेथील ‘धालो’ ह्या लोकगीतांचा अभ्यास करून त्यांचा एक संग्रह प्रसिद्ध केला. ‘गोव्यातील धालो’ हा तो संग्रह होय. वसुधा माने एक उत्तम अनुवादक आहेत. ‘नीलशैल’ (१९७४) हा हिंदी कादंबरीचा अनुवाद आणि ‘सैबेरियातून पलायन’ (१९८७) हा इंग्रजी प्रवासवृत्ताचा अनुवाद, हे दोन्ही अनुवाद वेधक आणि उत्कंठावर्धक आहेत.

     वसुधाताईंच्या सर्वच लेखनातून त्यांची भाषाशैली वाचकाच्या मनाची पकड घेते. तसेच त्यांच्या लेखनातून त्यांची निसर्गाकडे बघण्याची सौंदर्यपूर्ण दृष्टी, रसिकतेने आस्वाद घेण्याची वृत्ती दिसून येते. अनेक छोटी-मोठी माणसे त्यांच्या सहवासात आली. त्यांचे अचूक निरीक्षण करण्याची त्यांची दृष्टी आणि त्यांच्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हे वसुधाताईंच्या लेखनाचे विशेष त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येतात.

     - अंजली जोशी

माने, वसुधा वसंत