Skip to main content
x

बेल्हे, नारायण दत्तात्रेय

 

           नारायण दत्तात्रेय बेल्हे यांचा जन्म पुणे जिल्ह्यात धामणी गावी झाला. त्यांनी प्राथमिक, माध्यमिक व कृषी महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच घेतले. त्यांनी १९५९मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. पुणे कृषी महाविद्यालयातील पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागात कार्य केल्यानंतर ते धुळे कृषी महाविद्यालयात पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पुणे येथून एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली (१९६८) व पुढे कर्नाल, हरियाना राज्य येथील प्रसिद्ध राष्ट्रीय दुग्धशास्त्र संशोधन संस्थेतून पीएच.डी. (दुग्ध तंत्रज्ञान) पदवी प्राप्त केली (१९८६). त्यांनी प्रबंधासाठी मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक फॉर चेडार टाइप चीज फ्रॉम बफेलो मिल्क युझिंग मायक्रोबियल रेनेट या विषयावर संशोधन केले. चीज हा दुग्ध पदार्थ परदेशात मोठ्या प्रमाणात आहारात वापरला जातो, परंतु त्याच्या उत्पादन प्रक्रियेत जे रेनेट वितंचक (एन्झाईम) वापरले जाते ते गायीच्या वासरांच्या पोटातील आतड्यांवर प्रक्रिया करून तयार करत असल्यामुळे भारतातील बहुसंख्य लोक उच्च प्रथिने असूनही चीजचा वापर आहारात करत नसत.

           डॉ.बेल्हे यांनी वासरांची आतडी न वापरता सूक्ष्म जिवाणूंपासून तयार होत असलेले मायक्रोबियल रेनेट (बॅसिल्स सबटिलीस व अ‍ॅबसीडिया रॅनोझा या सूक्ष्म जिवाणूंपासून) वापरून चीज तयार करण्याची नवीन प्रक्रिया शोधली. आज त्याचा वापर करून अनेक दुग्धप्रक्रिया कारखाने चीज तयार करत असून त्यामुळे चीज खाण्याचे प्रमाणही भारतात वाढत आहे. दुग्धशास्त्र विषयात हा एक मोठा बदल घडवण्यात डॉ. बेल्हे यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. वासरांपासूनचे रेनेट आयात करावे लागे. हे आयातीचे प्रमाण कमी झाल्याने मौल्यवान परकीय चलनही वाचले. या संशोधनाचा पुढे मोठ्या प्रमाणात वापर करून भारतीय दुग्ध व्यावसायिकांना मदत करावी या उद्देशाने त्यांनी काही आराखडे तयार केले होते, तथापि दुर्दैवाने वयाच्या ५७व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने पुणे येथे निधन झाले.

- प्रा. मुकुंद श्रीकृष्ण देशपांडे

बेल्हे, नारायण दत्तात्रेय