Skip to main content
x

हापसे, ज्ञानदेव गंगाराम

             स पिकाच्या विकासासाठी झटणार्‍या ज्ञानदेव गंगाराम हापसे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर हापसे यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून १९६२मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी प्रयोग निर्देशक म्हणून त्याच महाविद्यालयात नोकरीस सुरुवात केली. त्यांनी १९६५मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांची नेमणूक साहाय्यक प्राध्यापक पदावर केली गेली. डॉ. हापसे यांनी १९७१ ते १९७५ या कालावधीत अमेरिकेतील पेन्स स्टेट युनिव्हर्सिटी व भा.कृ.अ.सं., नवी दिल्ली यांच्या संयुक्त कार्यक्रमांतर्गत कृषि-वनस्पतिक्रियाशास्त्रात पीएच.डी. पदवी मिळवली.

             डॉ. हापसे यांनी १९६८ ते १९७५ या काळात नाशिक जिल्ह्यातील गहू संशोधन केंद्र येथे गहू क्रियाशास्त्रज्ञ म्हणून कार्य केले. त्यांनी १९७६मध्ये सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख व विभागीय ऊस संशोधन समन्वयक म्हणून कामास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा दक्षिण भारतातील सर्व राज्यांत ऊस संशोधनाबद्दलचा संपर्क वाढला. पाडेगाव येथे ते काम करत असताना उसाच्या चार नवीन जाती प्रसारित झाल्या. तसेच पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्याने उसाचे दर हेक्टरी २५० टन उत्पादन येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणे हा त्यांच्या कामाचा एक भाग होता. त्यामुळे त्यांनी निरनिराळ्या कारखान्यांना भेटी देऊन ऊस उत्पादनवाढीस चालना देण्याचा व तांत्रिक सल्ला देऊन सुधारणा करण्याचा कार्यक्रम केला. डॉ. हापसे यांचा जनता संपर्क दांडगा आहे. त्यांनी भारतातील सात राज्यांत व देशाबाहेर नेपाळ व फिजी येथे ऊस उत्पादनवाढीकरता तांत्रिक मार्गदर्शन केले.

             महाराष्ट्रात पुणे येथे वसंतदादा ऊस संशोधन केंद्र स्थापन झाल्यावर त्यांनी या संस्थेत संचालक म्हणून आठ वर्षे काम केले. त्यांनी १९८६मध्ये म.फु.कृ.वि.तून सेवानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ उसाविषयी शास्त्रीय माहिती प्रसार करण्याचा वसा चालवला. त्यासाठी त्यांनी ज्ञानशील फाऊंडेशन व डॉ. डी.जी. हापसे अँड असोसिएटस् या दोन संस्था स्थापन केल्या आणि त्यामार्फत ऊस परिसंवाद, प्रशिक्षण व उपयुक्त प्रकाशने तयार करणे यात महत्त्वाचा वाटा उचलला. डॉ. हापसे अनेक संस्थांचे सदस्य व मार्गदर्शक आहेत तसेच ऊस पिकासंबंधात राज्य व केंद्र शासन यांना सल्ला देणार्‍या अनेक समित्यांवर सदस्य म्हणून कार्य करत आहेत.

             पुणे विद्यापीठामध्ये ऊस तंत्राबद्दल नवीन अभ्यासक्रम करण्याच्या दृष्टीने त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले आहे. पुणे विद्यापीठाच्या अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून कार्य केले आहे. तसेच त्यांनी वसंतदादा साखर संशोधन संस्था व सहकारी साखर उद्योग इ. संस्थांच्या संपादकीय मंडळावर कार्य केले आहे. पुणे येथील राजर्षी शाहू सहकारी बँकेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते लायन्स क्लब औंध-पाषाण (पुणे) या संस्थेचे अध्यक्ष आहेत. डॉ. हापसे यांनी ऊस पिकासंबंधात ५ पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच सुमारे २०० शास्त्रीय लेख लिहिले आहेत. त्यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोेसिएशन ऑफ इंडियाचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच त्यांना समाजश्री हा बहुमान इंडियन काऊन्सिल ऑफ मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह या संस्थेने दिला आहे. तसेच म.फु.कृ.वि., आंध्र प्रदेश कृषी विद्यापीठ या संस्थांनी त्यांचा उत्तम कार्याबद्दल  गौरव केला आहे.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

हापसे, ज्ञानदेव गंगाराम