सावंत, अरविंद गंगाराम
अरविंद गंगाराम सावंत यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वलके हे आहे. त्यांचे वडील पुण्याला नोकरी करत होते. म्हणून त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून १९६२मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली व तेथेच १९६३पासून कृषी पर्यवेक्षक पदावर सेवा सुरू केली. त्यांनी १९६५मध्ये पुणे विद्यापीठातून कृषि-विस्तार विषयात एम.एस्सी.(कृषी) पदवी संपादन केली. १९६६मध्ये दापोली येथील कृषी महाविद्यालयात त्याच पदांवर रुजू झाले. त्यानंतर निरनिराळ्या पदावर काम करून ते प्राध्यापक झाले. त्यांनी १९७९मध्ये प्रतिनियुक्तीवर बंगलोरच्या कृषिशास्त्र विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. विद्यापीठात गुणवत्ता यादीत सर्वप्रथम आल्याबद्दल त्यांना सुवर्णपदकाने गौरवले. त्यांची १ एप्रिल १९८२ रोजी बा.सा.को.कृ.वि.चे कुलसचिव म्हणून निवड झाली व परत कृषि-विस्तार विभागात प्राध्यापक पदावर रुजू झाले. त्यांची २५ सप्टेंबर १९८९ रोजी बा.सा.को.कृ.वि.च्या विस्तारशिक्षण संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांनी १० डिसेंबर १९९३ रोजी बा.सा.को.कृ.वि.चे कुलगुरुपद स्वीकारले. कुलगुरुपदाची मुदत संपण्यापूर्वीच नवी दिल्लीस्थित भा.कृ.अ.प.च्या केंद्रीय कृषिशास्त्रज्ञ निवड मंडळावर सदस्य म्हणून भारत सरकारच्या कृषी खात्यामार्फत त्यांची नियुक्ती १९९९ साली झाली. तेथून ते ४ एप्रिल २००५ रोजी निवृत्त झाले. अपार कष्ट, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध कार्य, उत्कृष्ट संघटनकौशल्य आणि दूरदृष्टी इ. अंगभूत गुणांमुळेच सावंत हा प्रवास सफल करू शकले.
सावंत यांनी ग्रामीण भागात कृषी विकास युवक मंडळाची स्थापना करून कृषि-तंत्रज्ञान प्रसाराचा अभिनव उपक्रम सुरू केला. विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून विद्यापीठ प्रक्षेत्रावर सामुदायिक वृक्षारोपण कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. त्याचा उपयोग वन व पर्यावरणविषयक संशोधनासाठी होत आहे. त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम कोकणातील विविध खेडेगावांतूनही यशस्वीरीत्या राबवला.
डॉ. सावंत यांनी ज्ञानप्रसारण केंद्राची स्थापना करून कृषि-तंत्रज्ञान प्रसाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले. या केंद्रात विद्यापीठाची प्रकाशने मिळू लागली, तसेच विक्री केंद्राच्या माध्यमातून, बियाणे, अवजारेही शेतकऱ्यांना मिळू लागली. भा.कृ.अ.प.चा संस्था-ग्राम समन्वय प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होडावडे येथे यशस्वीपणे राबवल्यानंतर त्याच्या दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञान मूल्यमापन आणि सुधारणा प्रकल्प सुरू करावयाचा होता. त्याविषयी विचारमंथन करण्यासाठी डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावर त्यापैकी अखिल भारतीय काजू प्रदर्शन हा देशातील पहिला कार्यक्रम वेंगुर्ला येथील काजू संशोधन केंद्रावर घेण्यात आला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे अखिल भारतीय जातिवंत जनावरांचे प्रदर्शन आयोजिले होते.
संशोधनाचा लाभ कोकणातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा या दृष्टीने युरोपीयन आर्थिक समुदायाच्या सहकार्याने कोकणातील चारही जिल्ह्यांतील लघुसिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रात नियंत्रित सिंचन पद्धतींचा वापर करून पीक पद्धती ठरवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबवला. तसेच रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर खार जमीन विकास पथदर्शक प्रकल्पही राबवला गेला. डॉ. सावंत यांच्या कुलगुरूपदाच्या कारकिर्दीत विद्यापीठाचे संशोधन आणि विकास क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल विद्यापीठाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवले गेले. वनीकरण व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील कार्यासाठी राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार आणि केंद्र शासनाचा इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार, काजू विकास कार्यासाठी काजू विकास संचालनालयाचे पारितोषिक, असे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. रौप्य महोत्सव साजरा करत असतानाच विद्यापीठाला १९९७मध्ये भा.कृ.अ.प.चा सर्वोत्कृष्ट कृषी संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. सावंत यांना दिल्लीस्थित भारतीय विस्तारशिक्षण संस्थेचा राष्ट्रीय फेलो पुरस्कार दिला गेला. कोकणातील फलोद्यान विकास कार्य गतिमान करून नवीन दिशा दिल्याबद्दल त्यांना वसंतराव नाईक पुरस्काराने गौरवले.
- संपादित