Skip to main content
x

सोलोमन, साम्युएल

         साम्युएल सोलोमन यांचे शालेय शिक्षण अलिबाग व मुंबई येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय, पुणे येथून पूर्ण करून बी.एजी. पदवी संपादन केली (१९३०). नंतर त्याच महाविद्यालयातून एम.एजी. पदवी संपादन केली (१९३९). ते याच महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विभागात टारफुला संशोधक म्हणून नोकरीस लागले. टारफुला तणाचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांच्या चाचण्या घेऊन ती वापरण्याच्या पद्धती व वेळ सुचवल्या व या तणास प्रतिकारक्षमता असलेले ज्वारीचे वाण संशोधित करण्याचे कामही केले. त्यानंतरच्या सुमारे ३० वर्षांच्या काळात त्यांना क्रमाक्रमाने वरवरच्या गॅझेटेड पदावर बढती मिळाली. प्रथम १९४५-५२ या काळात सोलोमन यांनी साहाय्यक प्राध्यापक (वनस्पतिशास्त्र) या पदावर काम केले. नंतर त्यांनी कापूस शरीरक्रियाशास्त्रज्ञ आणि कृषि-उपसंचालक (पीक संशोधन) म्हणून काम केले. या काळात निरनिराळ्या कापसांच्या जातींची पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती अजमावली. तसेच त्यांच्या वाढींच्या अवस्थांचा व पीक उत्पादन यांचा अन्योन्यसंबंध अभ्यासून ही माहिती रोप-पैदासकारांना उपलब्ध केली. तसेच तृणधान्ये, कडधान्ये व तेलबिया पिकांवर निरनिराळ्या संशोधन केंद्रांवर चाललेल्या संशोधनास मार्गदर्शन केले. नोकरीत असताना त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली. १९६१-६२ आणि १९६५-६८ या कालावधीत त्यांनी कृषी महाविद्यालय, पुणे येथे प्राचार्य म्हणून काम केले. तसेच त्यांनी परभणी येथेही कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केलेले आहे. या काळात सोलोमन यांनी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करून या दोन्ही महाविद्यालयांत चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण केले. काही काळ अधीक्षक कृषि-अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी शेती विकासाच्या योजना नाशिक विभागात चांगल्या तर्‍हेने राबवून उत्पादनवाढीस चालना दिली. नोकरीच्या काळात त्यांनी विविध पिकांवर संशोधन केले आणि संशोधनात्मक लेख शास्त्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. ते ३ जानेवारी १९६८ रोजी कृषी खात्यातून सेवानिवृत्त झाले.

- संपादित

सोलोमन, साम्युएल