Skip to main content
x

थोरात, रावसाहेब भाऊसाहेब

    नाशिक तालुक्यात सुकेणे गावी जन्मलेल्या रावसाहेब भाऊसाहेब थोरात यांचे  प्राथमिक शिक्षण वणी येथे झाले. माध्यमिक शिक्षण नाशिकच्या ‘सेंट जॉर्जेस विद्यालय’ मध्ये झाले. तो काळ स्वातंत्र्य चळवळींचा होता. नव्या सामाजिक जाणिवांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले होते. शाळेत शिकत असताना बहुजन समाजातील पाच टक्के विद्यार्थी देखील शिक्षण घेत नाहीत हे रावसाहेबांच्या लक्षात आले. तेव्हा इंग्रजी सहावीत असताना रावसाहेबांंनी  पिंपळगाव बसवंत येथील थोर समाजसेवक गणपतदादा मोरे ह्यांनी चालविलेल्या समाज जागृतीच्या कार्यास स्वत:ला वाहून घेतले. देशातील बहुजन समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय देशातील कोणतीही क्रांती यशस्वी होणार नाही. या विचाराने, श्रीमंत उदाजीराव महाराजांनी दिलेल्या देणगीतून या सर्व कार्यकर्त्यांनी १९१४ मध्ये ‘उदाजी मराठा वसतिगृहा’ची स्थापना केली. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ यापूर्वीच सुरू झाले होते. या मंडळाची ही पहिली संस्था रावसाहेबांनी नावारूपास आणली. या वसतिगृहात धुळे, जळगाव जिल्ह्यातून मुले जायची.

     राष्ट्रातील बहुजन समाजाला जडलेल्या अज्ञानरोगातून त्याची सुटका करणे या ध्येयाने रावसाहेबांनी लोकसेवेचे व समाज जागृतीचे काम सुरू केले. त्यासाठी ते ‘लोकशिक्षकांच्या’ भूमिकेतून नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी ग्रामसभा घेत, मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करीत, आर्थिक मदतही करीत. १९३६ मध्ये नाशिकमध्ये त्यांनी मराठा विद्यालयाची स्थापना केली. गोरे गल्लीत ही शाळा भरत असे.

     शिक्षणाच्या प्रसारासाठी शासनसंस्थेत बहुजन समाजातील माणसे असणे आवश्यक वाटल्याने रावसाहेबांनी निवडणूक लढविली व नाशिक जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळविला. १९५२ पर्यंत हा कार्यभार सांभाळला. शिक्षणाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत आधुनिक व उदारमतवादी होता. आत्मशिक्षणाच्या योगाने ‘आत्मविकास करणे व त्या द्वारा आपला देश, आपले राष्ट्र यांच्या उन्नतीस हातभार लावणे म्हणजे शिक्षण’ ही त्यांची शिक्षणाची व्याख्या होती.

     भारतातील महिला ज्ञानसंपन्न झाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून पत्रे लिहिली ती ‘बोधामृत’ म्हणून प्रसिद्ध झाली. १९३७ च्या विधिमंडळाच्या निवडणूकीत रावसाहेब नाशिकमधून निवडून आले. नंतरच्या काळात डांग, पेठ, सुरगाणा ह्या आदिवासी विभागाचा त्यांनी कायापालट घडविला. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने १९४१ मध्ये ‘रावसाहेब’ पदवी दिली. पण सरकारी रावसाहेब म्हणून मिरवण्यापेक्षा ‘शेतकऱ्यांचे व गरिबांचे रावसाहेब’ राहण्यातच धन्यता मानणाऱ्या रावसाहेबांनी या पदवीचा त्याग केला.

     - प्रा. सुहासिनी पटेल

थोरात, रावसाहेब भाऊसाहेब