Skip to main content
x

हतवळणे, सदाशिव विनायक

      सदाशिव उर्फ मामासाहेब यांचा जन्म वाई (जि.सातारा) येथे झाला. मूळ गाव नगरपासून ३५ कि. मी. अंतरावरील ‘हतवळण’. आजोबा शंकरराव डेक्कन महाविद्यालयाचे पदवीधर व पेशाने शिक्षक तर वडील विनायकराव भूमिअभिलेख खात्यात अधिकारी होते. सततच्या बदल्यांमुळे मामासाहेबांना शिक्षण विविध गावी किंवा जवळच्या नातलगांकडे राहून करावे लागले. शेवटी कराची (पाकिस्तान) च्या डी.जे.सिंध  महाविद्यालयामधून बी.एस्सी. पूर्ण केले. तर मुंबईच्या एस.टी. महाविद्यालयामधून बी.टी.पूर्ण झाले. या सर्व प्रवासात डॉ. अप्पासाहेब पंत, प्रा. एन.डी.नगरवाला, डॉ. द्वारकानाथ कोटणीस अशा अनेक जिवलग मित्रांचा लाभ झाला. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामधील सहाध्यायी मित्र सातारचे मुतालिक यांनी  दिलेले टोपण नाव ‘मामा’ पुढे सर्वांनीच स्वीकारले.

     ‘हिंद सेवा मंडळ’ हे स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय ‘राष्ट्रीय पाठशाळा’ या संस्थेचे भावंड. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रारंभी अनाथ विद्यार्थीगृह सुरू केले. कालांतराने विद्यार्थीगृहातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने तेलीखुंटावर मंडळाचे कार्यकर्ते नानासाहेब देवचके, नानासाहेब सप्तर्षी आदींच्या पुढाकाराने इ.स. १९३५ मध्ये अहमदनगर येथे मॉडर्न विद्यालय  स्थापन झाले. इ.स. १९४० मध्ये मामासाहेबांना शास्त्र व गणित विषयाचे शिक्षक म्हणून मुख्याध्यापक अण्णासाहेब आपटे यांनी नोकरी दिली. आपटे-हतवळणे यांच्या नेतृत्वाखाली बाबा गोसावी, अष्टेकर, आगाशे, गिते, प्रसिद्ध गायक राम फाटक आदी शिक्षकांनी विद्यार्थी घडविण्याच्या कार्यात स्वत:स झोकून दिले. मामासाहेबांच्या अथक परिश्रमामुळे शिक्षक प्रतिनिधी म्हणून त्यांचा हिंद सेवा मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये प्रवेश झाला. पुढे दीर्घकाळ संस्थेचे सहचिटणीस म्हणून काम करताना संस्थेचे मॉडर्न विद्यालय, नवभारत विद्यालय (सीताराम सारडा विद्यालय), दादा चौधरी विद्यालय, श्रीरामपूर, अकोले, मिरजगाव येथील शाळांच्या स्थापना, उभारणी व प्रगतीमध्ये, जागा मिळविण्यापासून इमारती बांधण्यापर्यंत व शाळांचा दर्जा उंचावण्यामध्ये बहुमोल योगदान दिले.

     संस्थेच्या शाळांसाठी जागा मिळविण्याचे अत्यंत अवघड काम मामासाहेबांच्या पुढाकाराने व भगीरथ प्रयत्नाने यशस्वी होत गेले. नगरच्या कोर्टाजवळील, पेशवाईतील किल्लेदार नारो बाबाजी नारकर (अभ्यंकर) यांचा पाऊण एकरावरील पडीक वाडा, मॉडर्न विद्यालयासाठी जागा मिळविण्यासाठी ३२ हिस्सेदारांशी सतत सात वर्षे संपर्कात राहण्याचे काम त्यांनी यशस्वीपणे केले. तसेच सरदार मिरीकरांलगतची तबेल्याची जागा त्यांनी दादा चौधरी मराठी शाळेला देणगी स्वरूपाने मिळवून दिली. आज त्या ठिकाणी भव्य इमारती उभ्या आहेत. शाळेच्या तीन मजली दगडी इमारतीच्या उभारणीत संस्थेचे चिटणीस नानासाहेब निसळ, मुख्याध्यापक मामासाहेब व इंजिनियर द. धो. नानल यांनी अपूर्व योगदान दिले. या इमारतीचे उद्घाटन १५ मे १९५१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले, तर नवभारत विद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते २८ डिसेंबर १९५४ ला झाले. अशा अनेक कार्यक्रमात व उपक्रमात मामासाहेबांचा सिंहाचा वाटा राहिला.

     १९५० ते ७५ या काळात मामासाहेबांनी स.चि. वाळिंबे यांच्या सहकार्याने लिहिलेली गणित विषयाची क्रमिक पुस्तके राज्यात आदर्श मानली गेली. १९५२ ते ७५ याच काळात नगर जिल्हा माध्य. शिक्षक सोसायटीचे कार्य व इमारत उभारणीत मोलाचे योगदान दिले. याच सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळावर प्रदीर्घ काळ काम केले. सरदार बाबासाहेब मिरीकर व दत्तोपंत डावरे यांच्या स्नेहामुळे दीर्घकाळ रिमांड होम व नगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे काम पाहिले. १९६१ मध्ये दिल्लीतील जागतिक शिक्षक परिषदेला  (वर्ल्ड टीचर्स कॉन्फरन्सला) उपस्थित राहिले. राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना १९६८ मध्ये प्रदान करण्यात आला. राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने तळेगाव दाभाडे येथे भरविलेल्या आदर्श शिक्षकांच्या शिबिरातून प्रेरणा घेऊन स्वत:च्या आत्मचरित्राची २० प्रकरणे लिहून पूर्ण केली. पुढे १९८९ मध्ये ‘जीवनश्रद्धा’ या नावाने आत्मचरित्रही प्रकाशित केले. एक उत्तम संदर्भ ग्रंथ म्हणून सदर ग्रंथाचा लौकिक आहे.

     इ. १९६१ मध्ये धर्मपत्नी प्रभावती यांच्या दु:खद निधनानंतरही चिकाटीने केलेली शिक्षणसेवा, त्यातून घडत गेलेले हजारो मुलामुलींचे व्यक्तिमत्व अशा अनेक जमेच्या बाबी मामासाहेबांच्या जीवनाच्या ताळेबंदात दिसून येतात.

     अहमदनगरच्या सार्वजनिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुमारे सहा तपे समरसून ‘काया वाचा मने’ योगदान देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष, मॉडर्न व दादा चौधरी विद्यालयाचे शिल्पकार, मुख्याध्यापक, गणित विषयाच्या शासनमान्य क्रमिक पुस्तकांचे लेखक, जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे संस्थापक, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे, जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, सिटी गेम्स असोसिएशन अशा अनेक संस्थांचे ते पदाधिकारी होते.

- विश्वास काळे

हतवळणे, सदाशिव विनायक