Skip to main content
x

विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण

कोणत्याही प्रदेशाची जडणघडण अनेक अंगांनी होत असते. त्या जडणघडणीचे अनेक पैलू असतात. सब भूमी गोपाल क़ी इसमें अटक कहाँ? असं अलंकारिक अर्थानं विचारलं जात असलं, तरी आपल्या या धरतीची भूमी सलग, एकसंध नाही हे वास्तव आहे. वैज्ञानिकांना विचाराल तर ते प्लेट टेक्टॉनिक्स या सिद्धान्ताचा दाखला देत धरतीचा पृष्ठभाग अनेक छोट्या-छोट्या तुकड्यांचा, प्लेट्सचा बनलेला आहे, हे सप्रमाण दाखवून देतील. पण तो विचार बाजूला ठेवला तरी या भूमीवर अनेक कृत्रिम आणि स्वनिर्मित अटका निर्माण झालेल्या आहेत हे वास्तव टाळता येत नाही.

 

काही सीमारेखा निसर्गानंच आखून दिलेल्या आहेत. भूभागावरून आस्ते कदम करत जावं, तर एका क्षणी तो भूभाग संपून सागराचं साम्राज्य सुरू होतं. तो किनारा मग एक अडसर बनतो. तो ओलांडून सागरावरून सहजगत्या वाटचाल करणं अशक्य बनतं. दुसरीकडे जावं, तर सपाट वाटणारा भूभाग अकस्मात आकाशगामी झेप घेत, वाटेत आडवा येतो. ती उत्तुंग पर्वतराजी उल्लंघून पलीकडे जाणं सहजसाध्य नसतं. ती पार करण्यासाठी एखादी सोईस्कर खिंड सापडत नाही तोवर तो नगाधिराजही एका लक्ष्मणरेखेचं रूप धारण करतो. कुठं घनदा़ट, निबिड अरण्य मार्ग खंडित करतं, तर कुठं चालणंही अवघड करणारी मरुभूमी. एक ना अनेक. यांसारख्या चतु:सीमांनी आखलेला तो प्रदेश जरासा अलग पडत़ो, तिथलं हवामान वेगळं असत़ं, तिथली सजीवसृष्टी आगळी असते. तो प्रदेश मग स्वत:ची वेगळी ओळख सांग्ाू लागतो.

पण सगळ्याच अटकसीमा अशा भौगोलिक नसतात. नैसर्गिक नसतात. इतिहास़, समाजसंघटऩ, त्या समाजाचे   नीतिनियम़, कुटुंबव्यवस्थ़ा, अंगीकारलेली जीवनशैल़ी, राहणी-साहण़ी, आरोग्य़, कल़ा, संगीत़, साहित्य, अनेक पैलूंनी त्या प्रदेशाची स्वत:ची वेगळी ओळख अधोरेखित होत असते. या प्रत्येक पैलूचे विभ्रम खुलवणार्‍या, त्यांची झळाळी लक्षणीयरीत्या वृद्धिंगत करणार्‍या महाभागांना त्या प्रदेशाचे शिल्पकार म्हणणं क्रमप्राप्त होतं. महाराष्ट्राचे असे जे कोणी शिल्पकार होते, त्यांचा अल्पचरित्रात्मक परिचय करून देणं हेच या बहुखंडात्मक प्रकल्पाचं अधिष्ठान ठरतं.

तरीही, महाराष्ट्र आणि शिल्पकार या दोन कळीच्या शब्दांची नेटकी आणि नेमकी व्याख्या केल्याशिवाय या प्रकल्पाची नांदी म्हणता येणार नाही. महाराष्ट्राची स्वत:ची वेगळी ओळख पटवण्यासाठी ज्या पैलूंचा विचार करावयास हवा, तो करूनच या प्रकल्पातील निरनिराळ्या खंडांची आखणी करण्यात आली आहे. आणि त्या प्रत्येक पैलूच्या विकासात बहुमोल भर घालणार्‍या दिग्गजांची ओळख शिल्पकार अशी केली गेली आहे.

इतर पैलूंबाबत अशी ओळख पटवणं सोपं आहे. कारण, मराठी संगीत़, मराठी साहित्य़, मराठी समाज़, मराठी राजकारण़, महाराष्ट्राचा भूगोल यांची वेगऴी, स्वतंत्र ओळख पटवणं सहजसाध्य आहे, त्यांची अधिष्ठानं इतर प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. त्यामुळं त्यांचे निकष ठरवणं अवघड जात नाही. विज्ञान आणि सुरुवातीला त्याला समांतर, पण आजकाल त्याचं बोट धरूनच वाटचाल करणारं तंत्रज्ञाऩ, यांच्या बाबतीत ते निकष बाद ठरतात. इंग्रजीत ज्यांना नॉनस्टार्टर म्हणता येईल, असे ठरतात.

याचं तसं ठोस कारणही आहे. विज्ञान हे जागतिक़, नव्हे वैश्विक आहे, यच्चयावत विश्वाला त्याचे नियम़, त्याचे आविष्कार लाग्ाू पडणारे आहेत. हे विज्ञान आपल़ं, हे परक्यांचं, असा दुजाभाव आपण त्यात करू शकत नाही. ज्या ग्ाुरुत्वाकर्षणाचा साक्षात्कार महाराष्ट्रात होतो, तोच इतर प्रदेशांमध्येही होतो. त्याचं नियमबद्ध स्वरूप उलगडून दाखवणारा आयझॅक न्यूटन इंग्रज होता किंवा त्याहून वेगळ्या भूमितिबद्ध रूपड्याचं दर्शन घडवणारा अल्बर्ट आइन्स्टाइन प्रथम जर्मन आणि नंतर अमेरिकन होता म्हण्ाून ग्ाुरुत्वाकर्षणावर इंग्लंडच़ा, जर्मनीच़ा, अमेरिकेच़ा, कोणाचाच कॉपीराइट निर्धारित होऊ शकत नाही.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. तंत्रज्ञानाचा विकास उपभोग्य वस्तूच्या उत्पादनासाठी सहसा केला जातो. अशा उत्पादनाची निकड ज्या प्रदेशात भासते, तिथं त्याचा विकास आणि वापर होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं त्या तंत्रज्ञानाची ओळख त्या प्रदेशावरून पटवता येते. तरीही, आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात असं तंत्रज्ञान त्या प्रदेशाच्या सीमा बंदिस्त करून ठेवू शकत नाहीत. त्या सीमा सच्छिद्र बनतात. त्यातून ते तंत्रज्ञान सहजासहजी सीमापार जाऊ शकतं. आज चीन किंवा भारत इथं मोबाइल फोनचा वापर सर्वाधिक आहे, पण त्यापोटी हे तंत्रज्ञान चिनी किंवा भारतीय असं आपण म्हण्ाू शकत नाही. पण त्याच्या विकासाला हातभार लावणारी मंडळी कोणत्याही प्रदेशातली असू शकतात. ती चिनी किंवा भारतीयही असू शकतात. पण त्यापायी या तंत्रज्ञानाला आपण भारतीय म्हण्ाू शकत नाही. ते तंत्रज्ञान जागतिक स्वरूपाचंच राहतं.

शेतीच्या बाबतीतही साधारण अशीच परिस्थिती आहे. शेतीचा उगम तैग्रिस आणि युफ्राटीस या नद्यांच्या दोआबाच्या प्रदेशात़, म्हणजेच एकेकाळी मेसोपोटेमिया म्हण्ाून, पण आज इराक या नावानं ओळखल्या जाणार्‍या प्रदेशात झाला. तरीही, शेती हे त्या प्रदेशाचं व्यवच्छेदक लक्षण मानता येत नाही. त्याचा उगम तिथं झाला एवढंच आपण म्हण्ाू शकतो. ती शेती करण्याची एक पद्धत एका प्रदेशात विकसित होते. ती त्या प्रदेशाच्या नावानं ओळखली जाते. म्हण्ाूनच जपानी भातशेती वेगऴी, चिनी भातशेती त्याहून निराऴी, भारतीय भातशेती आणखी तिसरीच, अशी त्या-त्या शेती करण्याच्या पद्धतींची ओळख असू शकते. तरीही जपानी भातशेतीचा विकास एखाद्या भारतीयाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा बासमती तांदळाचं हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठीचे यशस्वी प्रयत्न एखाद्या अमेरिकनानं केले म्हण्ाून बासमती अमेरिकन बनत नाही. तरीही, त्याच्या बासमती या नावापुरताच कॉपीराइटचा हक्क भारत बजावू शकतो.

या परिस्थितीत विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांतील महाराष्ट्राच्या शिल्पकारांची निवड कशी करायची?, त्यासाठी कोणते निकष लावायचे?, या प्रश्नांची सर्वमान्य उत्तरं देणं वाटतं तितकं सोपं नाही. जिनं मानवी ज्ञानसंग्रहात मोलाची भर घातली आहे किंवा जिनं एखाद्या विज्ञानसूत्राचा मागोवा घेत नवोन्मेषशाली तंत्रज्ञान विकसित केलं आहे ती व्यक्ती मराठी भाषक असेल, तर तिचा समावेश आपण महाराष्ट्राच्या शिल्पकारात करणार आहोत की नाही? मग भलेही त्याची कर्मभूमी महाराष्ट्राबाहेर असो. उलटपक्षी, ज्या व्यक्तीची कर्मभूमी महाराष्ट्र आहे अशी व्यक्ती मराठी भाषक नाही किंवा तिची जन्मभूमी महाराष्ट्र नाही म्हण्ाून आपण तिला वगळणार आहोत का? काही अशीही मंडळी आढळतात, की ज्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आह़े, त्यांच्या ग्ाुणवत्तेला महाराष्ट्रातच कंगोरे पडले आहेत़, त्यांनी आपली वैज्ञानिक कामगिरीही महाराष्ट्राच्या भूमीतच पार पाडली आहे, पण त्यांची मातृभाषा मात्र मराठी नाही. अशांचा विचार आपण महाराष्ट्राचे शिल्पकार म्हण्ाून करणार आहोत की नाही? महाराष्ट्राच्या उदारमतवादी परंपरेपोटी मराठी भाषेचे ज्ञान न प्राप्त करताही आपलं सारं आयुष्य याच भूमीत व्यतीत करण्याचं स्वातंत्र्य आपण सर्वांनाच दिलं आहे. सर्जनशील नवनिर्मितीला या स्वातंत्र्यापोटीच धुमारे फुटत असतात. मग अशा अमराठी दिग्गजांना त्यांचं योग्य स्थान नाकारताना आपण या महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेलाचा नाकारत तर नाही ना?

यांसारख्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह महाराष्ट्राच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील शिल्पकारांची निवड करताना करणं आवश्यक ठरतं. त्याचबरोबऱ, एकंदरीत विज्ञानाची वाटचाल़, महाराष्ट्रात, देशात आणि जागतिक स्तरावरह़ी, कशी झाली याचाही विचार करणं आवश्यक ठरतं.

विज्ञानाच्या इतिहासाचे दोन मुख्य कालखंड आहेत. आपल्या अवतीभोवती पसरलेल्या निसर्गाच्या अनेक आविष्कारांचं ग्ाूढ मानवाला सतावत आलं आहे. धरतीवर वावरणार्‍या प्रत्येक प्राण्यालाच त्याचं कुतूहल वाटत असतं. किमानपक्षी, अशा आविष्कारांपासून आपल्याला धोका नाही याची खातरजमा करून घेण्याची आवश्यकता त्यांना वाटत असते आणि ती पटली नाही तर जेव्हा-जेव्हा असे आविष्कार होतात, तेव्हा-तेव्हा स्वसंरक्षणासाठी योग्य तो पवित्रा घेण्याची उपजत ऊर्मी प्रत्येक सजीवाच्या अंगी असते. पण, या आविष्काराचं ग्ाूढ उकलण्याची बौद्धिक क्षमता मात्र केवळ मानवप्राण्याच्याच ठायी आहे. एवढंच नाही, तर एकदा का त्या सतावणार्‍या कोड्याची उकल झाली की त्यापाठील मूलभूत सूत्राचा वापर स्वत:च्या विधायक भल्यासाठ़ी आणि प्रसंगी विघातक बुर्‍यासाठीह़ी, करण्याची प्रेरणा मानवप्राणी बाळग्ाून आहे. या दिशेनं केलेल्या प्रयासालाच विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी नामाभिधानं प्राप्त झाली आहेत.

या ग्ाूढांविषयीचं चिंतन करून त्यांच्याविषयीची एक सैद्धान्तिक भूमिका मांडण्याचे प्रयत्न प्राचीन काळी झाले. त्या काळात, जगाच्या पाठीवर, निरनिराळ्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या संस्कृती उदयाला आल्या, त्या सर्वांमध्येच अशा प्रकारचं तत्त्वचिंतन केल्याचं आढळतं. कोहं, कुतो आयात:, या दोन प्रश्नांनी प्रामुख्यानं मानवाला या ज्ञानसंपादनाच्या सुरुवातीच्या कालखंडात सतावलं होतं. मी कोण़, आजूबाजूल़ा, या जमिनीवऱ, वर आकाशात दिसणार्‍या या अखिल विश्वात माझं नेमकं स्थान काय आह़े, या विश्वाशी माझं नातं कोणतं आह़े, माझा या विश्वावर आणि त्या विश्वाचा माझ्यावर नेमका कोणता प्रभाव पडतो आह़े, मी कोठून आल़ो, कुठे जाणार आह़े, या माझ्या हालचालींचं नियंत्रण करणं माझ्या हाती आहे की यदृच्छयाच ही सारी भलीबुरी कामगिरी माझ्या हातून घडत आह़े, यांसारख्या मूलभूत प्रश्नांची पटणारी उत्तरं शोधण्याचे प्रयास या कालखंडात झाले आणि त्यांची जी उत्तरं दिली गेली, ती बहुधा त्याविषयी केलेल्या तत्त्वचिंतनातून दिली गेली किंवा अनुभवजन्य अनुमानांमधूऩ, एम्पिरिकल कन्सिडरेशनमधूऩ दिली गेली. तत्त्वचिंतनाची बैठक वैयक्तिक होत़ी, पण त्या चिंतनाचं फलित व्यक्तीपुरतंच सीमित राहणारं नव्हतं. ते सामूहिक होतं. समष्टीला लाग्ाू पडणारं होतं. सर्वांनाच ते समजावून सांगणं समाजहिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक होतं.  त्याचं अनुबोधन ग्ाुरुशिष्य परंपरेमधून केलं गेल्यामुळं त्याचा प्रसार झाला. दररोजच्या जीवनकलहातून मुक्त होऊन असं चिंतन साध्य करणारे महाभाग संख्येनं कमीच होते. त्यांनी दाखवलेला मार्ग इतरांनी अनुसरला. त्यांच्या चिंतनाच्या फलिताला या मूलभूत प्रश्नांच्या समर्पक उत्तरांचं स्थान प्राप्त झालं. त्या प्रतीचं चिंतन करण्याची क्षमता असलेला दुसरा कोणी महाभागच त्यामधील काही विसंगतींचा किंवा त्र्ाुटींचा निर्देश करून वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयास करू धजत असे.

अनुभवजन्य अनुमानांची स्थिती थोडीशी वेगळी होती. हे अनुभव वैयक्तिक नव्हते. सामूहिक होते. अनेकांना तेच अनुभव वारंवार आले होते. किंबहुना, विज्ञानानं नेहमीच सार्वत्रिक, सार्वकालिक, सामूहिक अनुभवांचाच मागोवा घेतला आहे. त्यातून मग नैसर्गिक आविष्कारांपाठच्या निसर्गनियमांचं जे ज्ञान प्राप्त होतं, त्याचा प्रभाव सर्व समाजावर सारखाच होतो. अशा सार्वत्रिक अनुभवाच्या आविष्कारांची पार्श्वभूमीही ध्यानात आली होती. एका विशिष्ट परिस्थितीत एक विवक्षित आविष्कार होतो याची साक्ष मिळाली होती. वैयक्तिक परिस्थितीवऱ, ग्ाुणवत्तेवर या आविष्कारांचं स्वरूप अवलंबून नव्हतं. त्यातूनच मग कार्यकारणभावाचं अनुमान काढणं शक्य होत होतं. आकाशात नेहमीच दिसणारे सूर्य आणि चंद्र या तेजोगोलांचं स्थान कायमस्वरूपी नाही. ते एका जागी स्थिर राहत नाहीत. त्यांचं अवकाशातलं स्थान बदलत जातं. सर्वांनाच याचा अनुभव येतो आणि या बदलांचंही एक आवर्तन होतं. त्या चक्रानुसार आपल्या परिसरातही बदल होत असतात आणि त्यांचंही एक आवर्तन होतं. या दोन आवर्तनांची परस्परात सांगड आहे हा अनुभव सर्वांनीच घेतला होता. त्यातलंच मग एक कार्य आणि दुसरं कारण असं अनुमान काढणं तर्कसंगत वाटत होतं.  अशा अनुभवांचीही मानवाच्या ज्ञानसंग्रहात भर पडत गेली. ही भर घालण्याचं मौलिक कार्य करणारे महाभाग त्या कालखंडातले विज्ञानाचे बिनीचे शिलेदार होते. शिल्पकार होते.

त्यांनी हा ज्ञानसंग्रह स्वत:पुरताच सीमित न ठेवता, त्याचा प्रसार करण्याचं कामही केलं होतं. त्यातूनच ग्ाुरुकुल परंपरा निर्माण झाली होती. काहींना त्या काळचा राजाश्रयही मिळाला होता. तरीही हा प्रसार मुख्यत्वे मौखिक पद्धतीनं होत असल्यामुळं त्याची व्याप्ती मर्यादित राहिली होती. भूर्जपत्रांवरील प्राथमिक स्वरूपाच्या लेखनातून यांपैकी काहींना अक्षरस्थान प्राप्त झालं होतं. त्यांतील जे काही टिकून राहिलं आहे, ते आज हस्तगत करण्यात यश मिळालं आहे. त्याच्या अध्ययनातून त्या काळच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासाचा परिचय होऊ शकतो. 

ही परिस्थिती साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या पाच-सहा शतकांपर्यंत राहिली. पण, तिची गती मंदावत असल्याची चिन्हंही दिसत होती. ज्ञानलालसेच्या प्रेरणेला दुय्यम़-तिय्यम स्थान प्राप्त झालं होतं. मानवप्राण्याच्या इतर ध्यासांना अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. निसर्गाची सर्वच ग्ाूढं उकलल्यामुळं ही परिस्थिती समोर उभी राहिली होती किंवा नवनवीन अनुभव येणं थांबलं होतं अशातला भाग नव्हता, पण तत्त्वचिंतनासाठी लागणारं वातावरण लुप्त होत चाललं होतं हे मात्र मागं वळून पाहता स्पष्ट होतं.

त्यानंतर जण्ाू ज्ञानप्रकाश एकाएकी लुप्तच झाला. एका अंधकारमय कालखंडात मानवप्राणी चाचपडत राहिला. ज्ञानसंग्रह नष्ट झाला नाही, पण त्यात मोलाची भरही पडली नाही की त्याला खास महत्त्वही दिलं गेलं नाही. मानवी सर्जनशील प्रेरणेलाच जण्ाू ग्रहण लागलं. या ज्ञानापायी वसुधैव कुटुंबकम् या तत्त्वाचा प्रसार होण्याऐवजी मानवातील प्राणी जातीची वैशिष्ट्यं उफाळून वर आली. प्रादेशिक स्वामित्वाला महत्त्व प्राप्त झालं. ते प्रस्थापित करण्याच्या नादात मानवजातीचं विविध कळपांमध्ये गठन झालं. या कळपांच्या, खरं तर टोळ्यांच्या आपापसातील युद्धांना प्रारंभ झाला. त्याला धार्मिक वरिष्ठतेच्या भूमिकेचं प्रोत्साहन मिळालं. त्यापायी मानवजातीच्या पुढच्या काही शतकांचा इतिहास अशा प्रकारच्या संघर्षांनीच भारलेला राहिलेला आहे. संस्कृती संवर्धनाच्या प्रवाहाला अटकाव होत राहिला. जगाच्या जवळजवळ सर्वच भागांत ही परिस्थिती होती.

त्यात बदल झाला तो मुख्यत्वे युरोपात चौदाव्या-पंधराव्या शतकात सुरू झालेल्या सर्जनशील नवनिर्मितीच्या पुनरुत्थानातूऩ, रेनेसान्समधून. कल़ा, साहित्य़, विज्ञान या मानवाच्या सर्जनशीलतेची प्रचीती देणार्‍या सर्वच क्षेत्रांनी काजळी झटकून टाकली. एका नव्या क्रांतीचं वारं सर्वत्र वाहू लागलं. विज्ञानाच्या विकासातील दुसर्‍या कालखंडाचा प्रारंभ झाला. या कालखंडात एक महत्त्वाचा बदल झाला. तत्त्वचिंतन आणि अनुभवजन्य अनुमान या दोन आधारस्तंभांना प्रायोगिक परीक्षेची जोड मिळाली आणि या नव्या पद्धतीनंच पाहतापाहता अग्रस्थान मिळवलं. अनुभव येण्याची वाट न पाहत़ा, वास्तव परिस्थितीत नियंत्रित बदल करून त्याच्या परिणामांचा अनुभव घेत त्यांची परीक्षा करण्याचं आणि त्यातून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारावर मूलतत्त्व शोधून काढण्याची नवीन पद्धत विकसित होत गेली. नियंत्रित बदल करण्याचा प्रयोग व्यक्तिनिष्ठ नस़े, तो वस्तुनिष्ठ असे, तो क़रण्याची मुभा आणि क्षमता कोणाकडेही असे. यामुळंच या पद्धतीला सर्वमान्यता मिळत गेली. त्यामुळंही असेल कदाचित, जी विज्ञानाची घोडदौड सुरू झाली, ती आजतागायत राहिली आहे.

आपल्या देशातील विज्ञानअध्यायनाचेही असेच दोन कालखंड पडतात. प्राचीन काळात देशात विज्ञानाचा विकास झाला होता, परंतु वेदकाळातही आपल्या देशात आजच्या अत्याधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा सर्वदूर प्रसार झाला होता या दाव्याची पुष्टी करणारे विश्वासार्ह पुरावे आढळत नाहीत. रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख आहे. त्या आधारावर त्या काळी विमानविद्येनं या देशात चांगलंच बाळसं धरलं होतं असा दावा केला जातो. तो खरा मानायचा तर ग्ाुरुत्वाकर्षणाच्या बलाची ओळख त्या काळात पटली होत़ी, त्याचं स्वरूप अवगत झालं होतं आणि त्याचे नियम़, सूत्र यांचाही परिचय झाला होता असं मानायला हवं. त्या ग्ाुरुत्वाकर्षणाच्या ओढीवर मात करत आकाशगामी कसं व्हायचं हेही अवगत होत़ं, त्यासाठी आवश्यक क्षमता असणार्‍या इंजिनाची बांधणी कशी करायची याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं असायला हव़ं, असं विमान चालवण्याचं शिक्षण देणार्‍या विद्यालयांची स्थापना झालेली असायला हव़ी, त्या विमानाचा सांगाडा बांधण्यासाठी योग्य ते ग्ाुणधर्म असणार्‍या धातूची निर्मिती करण्याचं ज्ञान आणि त्याचं उत्पादन करणारे कारखाने स्थापित झालेले असावयास हव़ेत, या विमानांच्या उड्डाणासाठी विमानतळ बांधलेले असावयास हव़ेत, आकाशातल्या त्याच्या उड्डाणाचं नियंत्रण करणारे कक्ष हवेत. हे सारं तंत्रज्ञान विकसित झालेलं असेल तरच विमानविद्या अवगत होती असं अनुमान काढता येतं. तसं करण्यास मदत करणारी कागदपत्रं वा इतर विश्वासार्ह पुरावे सापडलेले नाहीत. तीच बाब महाभारतात असलेल्या वायव्यास्त्र किंवा अग्न्यस्त्र वगैरेंची. त्यामुळं आज आधुनिक युगात उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान त्या काळात विकसित झालं होतं किंवा त्यासाठी आधारभूत असणारी विज्ञानसूत्रं अवगत झालेली होती असं मानण्यास जागा नाही.

पण याचा अर्थ त्या काळात काहीच प्रगती झालेली नव्हती किंवा ज्ञानसंग्रहाचं दालन रिकामं होतं असंही म्हणण्याचं कारण नाही. आयुर्वेद ही आरोग्यप्रणाली त्या काळात संपूर्ण विकसित झाली होती. ती त्याच काळातील सर्वांत प्रगत प्रणाली होती. एवढंच नाही, तर त्यातील अनेक सूत्रं आजही तितकीच लाग्ाू पडतात हे सिद्ध करणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आयुर्वेद ज्यांना प्रमाण मानतं असे ते ग्रंथ म्हणजे चरकसंहिता (इसवी सनाचे पहिले शतक), सुश्रूतसंहिता (इसवी सनाचे दुसरे शतक) आणि वाग्भट (इसवी सनाचे सातवे शतक), आणि तेव्हापासून आजवर आयुर्वेदाची एक अखंड परंपरा आपल्याला दाखवता येते. जागतिक प्रदूषण आणि आधुनिक अ‍ॅलोपथिक औषधांच्या जाणवणार्‍या दुष्परिणामांच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करू लागतो, तेव्हा जगभर परत एकदा लोक आयुर्वेदाच्या मागे का लागले आहेत ते लक्षात येते. मात्र, आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन औषधात प्रमाणीकरण आणणे, औषधांच्या सर्व बाटल्यांवर औषधात असलेले घटक दाखविणे आणि औषधे बनविणार्‍या कारखान्यात ग्ाुणवत्ता नियंत्रण करणे  ह्या गोष्टी कराव्या लागतील. आयुर्वेदाची मूलभूत तात्त्विक बैठक पाश्चात्त्य वैद्यकप्रणालीच्या म्हणजेच अ‍ॅलोपथीच्या तात्त्विक बैठकीपेक्षा कशी वेगळी आहे हे सप्रमाण सिद्ध करावं लागेल. त्यामुळं आयुर्वेदातील निदान आणि उपचार या दोन्हींचीही परीक्षा करण्यासाठीचे निकष व पद्धती वेगळी का असावी हे तर्कसंगतरीत्या जगापुढं मांडावं लागेल आणि त्याच्या समीक्षेचे रूपबंधही आधुनिक विज्ञानपद्धतीशी सुसंगत रीतीनं विकसित करावे लागतील.

आयुर्वेदातील श्लोकांचा आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अर्थ लावून तो कसा सुसंगत आहे हे दर्शवणारं संशोधन आज होत आहे. चरकसंहितेतील सूत्रानुसार बनवलेली औषधं आजही काही व्याधींवर सर्वांत ग्ाुणकारी सिद्ध होत आहेत. त्यांचं औद्योगिक स्तरावर उत्पादन होत आहे आणि जगभर त्यांचं वितरणही होत आहे. सुश्रूतानं शस्त्रक्रियेसाठी वापरलेली उपकरणं सापडलेली आहेत. आजचे शल्यविशारद वापरत असलेल्या उपकरणांपेक्षा ती फारशी वेगळी नाहीत. दिल्लीचा पाचव्या-सहाव्या शतकातला लोहस्तंभ त्या काळातल्या विकसित धातुविज्ञानाची साक्ष देत उभा आहे. कोणार्क येथील सूर्यमंदिर त्या काळातल्या प्रगत वास्तुशिल्पाची ग्वाही देत आहे. भास्कराचार्य, लीलावती यांचे ग्रंथ गणितातील प्रगतीचे साक्षीदार आहेत. हे विज्ञान निश्चितच विकसित झालं होतं आणि ते करण्यात ज्यांनी कळीचं योगदान दिलं, त्यांचा समावेश शिल्पकारांमध्ये करण्यास प्रत्यवाय नसावा.

खगोल विज्ञानातही आपल्या वैज्ञानिकांनी गरुडझेप घेतली होती हे पटवून देणारे ग्रंथ उपलब्ध आहेत. वराहमिहिऱ, आर्यभट्ट, ब्रह्मग्ाुप्त, भास्कराचार्य यांच्या संशोधनाची माहिती आजही अनेकांना स्तिमित करून सोडते. त्यांनी उद्घोषित केलेल्या कितीतरी संकल्पना आज जगन्मान्य झालेल्या खगोलशास्त्रीय आणि विश्वरचनाशास्त्रीय संकल्पनांशी सुसंगत आहेत. आर्यभट्ट

ते भास्कराचार्य हा ८०० वर्षांचा काळ आहे. इ.स.११५०मध्ये भास्कराचार्यांनी सिद्धान्त शिरोमणी हा ग्रंथ लिहिला. यातील गोलाध्याय भागात खगोलशास्त्र आहे. चंद्राची त्रिज्या, त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर, त्यावरील दिवसरात्रीची लांबी, बुध-श्ाुक्र-मंगळ-ग्ाुरू-शनी या ग्रहांच्या प्रदक्षिणेस लागणारा काळ हे सारं त्यात आहे. ही मापनं आधुनिक मापनाशी खूप मिळतीजुळती आहेत. कार्ल सॅगाननं आपल्या कॉसमॉस या ग्रंथात प्राचीन भारतीय कालमापनाचं परिमाण आधुनिक विश्वरचनाशास्त्राच्या परिमाणाशी मिळतंजुळतं आहे असं म्हटलं आहे.

पायथॅगोरसचा काटकोन त्रिकोण सिद्धान्त हा इ.स.पूर्व ५५०चा आहे, तर या सिद्धान्ताचा उल्लेख भारतीय श्ाूल्बसूत्रात आहे. श्ाूल्बसूत्राचा काळ हा इ.स.पूर्व १५००चा आहे. आर्यभट्ट प्रथम (सहावे शतक), ब्रह्मग्ाुप्त (इ.स.६२८), महावीराचार्य (इ.स.८५०), आर्यभट्ट द्वितीय (इ.स.८७५), श्रीधर (इ.स.१०००), भास्कराचार्य (इ.स.११५०) आणि रामानुजन (इ.स.१९००) अशी गणितातील भारतीयांची परंपरा आहे. श्ाून्याचा शोध भारतानं लावला ही आधुनिक गणिताला वाटणारी एक क्रांतिकारी घटनाच आहे. श्ाून्याविना गणितातील आकडे मांडणं आणि हिशेब करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. श्ाून्याचा शोध लागण्यापूर्वी घ्,घ्घ्,घ्घ्घ्,घ्न्नन्नन्न..र्.ें..थ्..ण्..अ् असे आकडे अनुक्रमे १,,,,,६..१०,५०,१००,५०० वगैरेला वापरत आणि याचे ग्ाुणाकार करण्यासाठी गावातल्या तज्ज्ञांची फौज आण्ाून बसवावी लागे आणि दोन, चार ग्ाुणाकार करायला त्यांना दोन-दोन दिवस लागत. श्ाून्याच्या एका शोधामुळं आज पाचवी-सहावीतला मुलगाही भराभर ग्ाुणाकार करतो आणि आता कॅल्क्युलेटर आल्यावर तर तो ते निमिषमात्रात करतो. संपूर्ण संगणक ० आणि १ या दोन आकड्यांवर काम करणारा आहे. अशा वेळी श्ाून्याचं महत्त्व आणखीच प्रकर्षानं जाणवतं.

अजंठा-वेरूळची लेणी, हळ्ळेबीड मंदिरातील शिल्पकाम, श्रवण बेळगोळची बाहुबलीची प्रचंड मूर्ती, दिल्लीतील कुतुबमीनारसमोरील न गंजणारा पाचव्या-सहाव्या शतकातील लोहस्तंभ, पोरस राजानं  अलेक्झांडरला भेट दिलेला १४ किलो वजनाचा पोलादी तुकडा, हरप्पा- मोहेंजोदरो संस्कृतीत वापरलेले ब्राँझ, तेथील गृहरचना, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था, त्या वेळी वापरली जाणारी स्वयंपाकाची भांडी, तेथले जवळचे बंदर (मोहेंजोदरो संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ३२०० ते २५०० वर्षं) आणि अगदी अलीकडच्या काळातील म्हणजे सतराव्या शतकात श्रीरंगपट्टणमला टिपू सुलतानाच्या काळातील क्षेपणास्त्रे. ही भारतात जुन्या काळी वेगवेगळ्या शास्त्रात झालेली प्रगती दाखवितात.

परंतु, यांपैकी किती जणांची ओळख महाराष्ट्रीय अशी करता येईल, याबद्दल संदेह आहे. एक तर, महाराष्ट्र अशीच या प्रदेशाची ओळख त्या काळात झाली नव्हती. एवढंच काय, पण उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेचैव दक्षिणम् अशी भारतवर्षाची व्याख्या जरी आपण करत असलो, तरी तो तसा एकसंध प्रदेश होता की काय याविषयी शंका घेण्यास जागा आहे. कारण, तसा तो असता तर मगध़, कलिंग़, कामरूप़, दंडकारण्य अशा वेगवेगळ्या आणि एकमेकांशी झगडत असलेल्या प्रदेशांचा उल्लेख झाला नसता. त्यामुळं, त्या काळातील ज्या शिल्पकारांच्या योगदानाविषयी यत्किंचितही संदेह नाही, अशांचा महाराष्ट्राच्या शिल्पकारांत समावेश करण्याबाबत दुविधा उत्पन्न होऊ शकते.

त्यामुळं आधुनिक रेनेसान्स पश्चात काळातील विज्ञानाच्या वाटचालीचाच मागोवा घ्यावयास हवा. महाराष्ट्र अशी ज्या प्रदेशाची आज आपण ओळख सांगतो, ती साधारण बाराव्या, तेराव्या शतकात दृग्गोचर झाली होती असं इतिहास सांगतो. संतवाङ्मयाचा आढावा घेतल्यास याची पुष्टी होते. पण, त्या काळात विज्ञान संशोधन होण्यासाठी आवश्यक ती सामाजिक परिस्थिती आणि शांतीचं वातावरण महाराष्ट्रात नव्हतं. शिवाय, पाचव्या-सहाव्या शतकापासून पुढची दहा शतकं आपल्या देशातही एक अंधारयुगच अवतरलं होतं. या काळात सांस्कृतिक क्षेत्राच्या कोणत्याही पैलूला झळाळी दिली गेल्याच्या कोणत्याच खुणा नाहीत. त्यात परकीय आक्रमण आणि प्रशासन यांपोटी एकोणिसाव्या शतकापर्यंत सर्जनशील कृतींचा अभावच आढळतो.

अशा प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रात काही प्रमाणात विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास होत राहिला होता, याचे काही प्रत् मिळतात. महाराष्ट्रात शिवाजीच्या काळी प्रत्येक गड-किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. पेशव्यांनी पुण्यात कात्रजच्या घाटातून शहरापर्यंत पाण्याची भूमिगत सोय केली होती आणि आज २०० वर्षे झाल्यानंतरही ती अजूनही वापरात येऊ शकेल इतकी धड अवस्थेत आहे. अशीच सोय अन्य शहरांतूनही आहे. दि.मा. मोरे यांनी महाराष्ट्रातील जुन्या काळच्या पाणी योजनेवर आणि अ.शं. पाठकांनी महाराष्ट्राची बारव संस्कृती यावर पुस्तकं लिहिली आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आर्यांचं मूळ वसतिस्थान हे उत्तरध्रुवावर होतं, हे गणिती आणि पंचांगपद्धतीनं सिद्ध केलं आणि वेदांचा काळही त्यांनी ठरवला. वालचंद हिराचंद आणि किर्लोस्कर बंधू यांनी महाराष्ट्रात कारखानदारी सुरू केली. मुंबईतही कापडगिरण्या सुुरू झाल्या. द.बा. लिमये यांनी रसायनशास्त्रात काम केलं, तर वि.ना. शिरोडकर यांनी सूतिकाशास्त्राच्या शस्त्रक्रियेत विकसित केलेला शिरोडकर स्टिच आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरला गेला.

अभियांत्रिकी क्षेत्रात अलीकडे कोकण रेल्वेनं बांधलेले उंच-उंच पूल हे जागतिक पातळीवर चर्चेचे विषय झाले. कोयना धरणात दोन वर्षांपूर्वी लेक टॅपिंगचा प्रयोग यशस्वी झाला. नगर जिल्ह्यात हिवरे बाजार या गावात ज्या ठिकाणी जमिनीखाली पाणी साठत नव्हतं, अशा ठिकाणी जमिनीखाली सुरुंग लावून चिरा पाडल्या आणि आता तेथे पाणी साठू लागलं आहे.

त्यामुळं आधुनिक विज्ञान अध्नाच्या मुहूर्तमेढीसाठी आपल्याला एकोणिसाव्या शतकाच्या मध्याकडे ध्यान द्यावं लागतं. हिन्दुस्थान या नावानं ओळखल्या जाणार्‍या प्रदेशावर आता इंग्लंडच्या राणीचं साम्राज्य प्रस्थापित झालं आहे आणि ती सम्राज्ञी व्हिक्टोरिया या नावानं देशाचा कारभार करण्यास सज्ज झाली आहे, अशी दवंडी पिटली जात असतानाच, देशात तीन विद्यापीठांच्या स्थापनेची घोषणा क़रण्यात आली. १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या समाप्तीनंतर बॉम्ब़े - आताचं  मुंबइऱ् , मद्रास़ - आताचं  चेन्नई आणि कलकत्त़ा - आताचं  कोलकाता या ठिकाणी उच्च शिक्षण देणारी विद्यापीठं स्थापन केली गेली.

या तीन विद्यापीठांचा जन्म जरी एकाच वेळी झाला असला, तरी पुढील प्रवास मात्र वेगवेगळ्या  मार्गानं होत गेला. विज्ञान - संशोधनानं जोम धरला तो कोलकाता विद्यापीठात. भौतिकशास्त्र व जीवशास्त्र या दोन्ही क्षेत्रांमध्ये संशोधन करणारे विभाग तिथं प्रस्थापित झाले. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांच्या उच्च शिक्षणालाही तिथं प्रारंभ झाला. त्याचीच परिणती पुढं त्या क्षेत्रांना वाहिलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेत झाली. प्रयोगशाळा आणि संशोधनसंस्था यांचीही स्थापना होत गेली. जगदीशचंद्र बोस़, प्रफुल्लचंद्र ऱे, मेघनाद साह़ा, महेन्द्रलाल सरकार यांच्यासारख्या बिनीच्या शिलेदारांनी विज्ञानाची पताका फडकवत ठेवली. कोलकाता विद्यापीठ आणि विज्ञान संशोधन यांची इतकी एकजीव सांगड बसली की नोबेल पुरस्कार विजेते चंद्रशेखर रामन यांचं शिक्षण मद्रास विद्यापीठात झालेलं असतानाही संशोधनासाठी त्यांनी कोलकात्याचीच वाट धरली. त्यांचं नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं संशोधनही तिथंच झालं. ज्यांनी महाराष्ट्रात विज्ञानवर्धिनीची प्रतिष्ठापना केली, त्या वनस्पतिशास्त्रज्ञ शंकर पुरुषोत्तम आघारकरांची कारकीर्दही तिथंच फुलल़ी, फोफावली आणि ती मान्यता मिळाल्यानंतरच ते महाराष्ट्रात आले.

मुंबई विद्यापीठात मानव्यविद्या आणि कायदा या क्षेत्राला मान देण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यातील कित्येक धुरिणांनी या विषयात मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवूनच आपल्या सामाजिक़, राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. मुंबई विद्यापीठात विज्ञान-संशोधनाचे विभाग सुरू झाले ते एकोणीसशे सत्तरच्या दशकात. त्यानंतर गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्येही या विभागांनी देशातल्या आघाडीच्या संशोधनशाळांमध्ये स्थान मिळवलेलं नाही.

याला एक उल्लेखनीय अपवाद आहे तो विद्यापीठाच्या रसायन-तंत्रज्ञान विभागाचा. पण, त्याचीही स्थापना स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपासच झाली. सुरुवातीपासून त्यानं जवळजवळ स्वतंत्रपणे  आपला कारभार हाकला आणि आज तर तो स्वायत्त झाला आहे. आता तो इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी झाला आहे.

विज्ञान-संशोधनाचा संस्थात्मक विकास महाराष्ट्रात फारसा झाला नाही. मुंबईत स्थापन झालेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातली पहिली संशोधनसंस्था. पुण्याला आघारकरांनी स्थापन केलेली महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ही महाराष्ट्रीय वैज्ञानिकांनी स्थापन केलेली पहिली संस्था म्हणावयास हरकत नाही. हाफकिन इन्स्टिट्यूटचे प्रणेते युरोपियन असल्यामुळं त्या संस्थेला थोडाफार राजाश्रय तरी मिळाला. पण, आघारकरांच्या संस्थेला ना राजाश्रय ना लोकाश्रय. त्यामुळं तिची व्हावी तशी भरभराट झाली नाही. केंद्र सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागानं तिचं मुखत्यारपत्र स्वीकारल्यानंतरच त्या संस्थेला काही बळ प्राप्त झालं आहे. 

याचा अर्थ, महाराष्ट्रात विज्ञान-संशोधन झालंच नाही किंवा महाराष्ट्रीय वैज्ञानिकांनी लक्षणीय योगदान दिलेलं नाही असा होत नाही. पण, महाराष्ट्रीय वैज्ञानिकांना लक्षवेधी संशोधनासाठी महाराष्ट्राबाहेरच्या व क्वचितप्रसंगी देशाबाहेरच्या संस्थांकडे प्रयाण करावं लागलं ही वस्तुस्थिती आहे. तसंच, महाराष्ट्रात आज कार्यरत असलेल्या आणि जगभरात ज्यांनी नाव कमावलं आहे अशा विज्ञानसंस्था या मुख्यत्वे राष्ट्रीय स्वरूपाच्य़ा केंद्र सरकारच्या विविध विभागांनी स्थापन केलेल्या आहेत. त्यांचे अध्वर्यू कित्येक वेळा महाराष्ट्र ही जन्मभूमी नसलेले राहिले आहेत, परंतु त्यांची संपूर्ण वैज्ञानिक कारकीर्द महाराष्ट्रातच व्यतीत झालेली आहे. आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक विकासाला हातभार लावलेला आहे. पुणे विद्यापी़ठ, नागपूर विद्यापी़ठ, महाराष्ट्रातील कित्येक कृषी विद्यापीठे या संस्थांतील विज्ञान संशोधऩ, तंत्रज्ञान विकास उल्लेखनीय आहेत. त्यांच्या अनुषंगानं महाराष्ट्रात अलीकडच्या काळात विज्ञान-संशोधनानं मूळ धरलं आहे, पण महाराष्ट्रातील विज्ञानसंस्था म्हटल्यानंतर ज्यांची नावं सर्वप्रथम नजरेसमोर येतात, त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फण्डामेन्टल रिसचऱ्, भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेन्टर, नॅशनल केमिकल लॅबोरेटऱी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलाज़, नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉज़ी, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर सायन्स़ एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट यांसारख्या संस्था केंद्रीय संस्था आहेत. त्या महाराष्ट्रात आहेत म्हण्ाून त्यांना महाराष्ट्रीय मानायचं की काय, हा वादाचा विषय होईल, पण त्यांच्या स्थापनेच्या काळात आणि नंतरही त्यांच्या विकासात महाराष्ट्रीय वैज्ञानिकांचं योगदान लक्षणीय राहिलेलं आहे. महाराष्ट्रीय समाजाच्या मानसविश्वात या संस्थांनी लोभाचं स्थान प्राप्त केलेलं नाही हे एकंदरीतच विज्ञान-संशोधनाच्या बाबतीतल्या महाराष्ट्रीय समाजाच्या अनास्थेचं द्योतक आहे. अशीच अनास्था महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनीही दाखवलेली आहे. शासनाच्या स्तरावर विज्ञान व तंत्रज्ञान विकासाच्या कोणत्याच योजना राबविण्यात आल्या नाहीत. त्यापायी संशोधनसंस्थांचीही स्थापना झाली नाही. विद्यापीठांमधील संशोधनविकासाकडेही शासकीय स्तरावर दुर्लक्षच झालं आहे.

तेव्हा, महाराष्ट्राचे विज्ञान-तंत्रज्ञान शिल्पकार यांची निवड करताना या वास्तवाची दखल न घेणं परवडणारं नाही. म्हण्ाूनच जन्मभूमी महाराष्ट्र किंवा कर्मभूमी महाराष्ट किंवा दोन्हीही असणार्‍या दिग्गजांचा महाराष्ट्राच्या शिल्पकारांमध्ये समावेश करण्याचा व्यापक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक आहे.

असाच विस्तारित दृष्टिकोन विज्ञान-तंत्रज्ञान विषयांची व्याप्ती ठरवण्यासाठीही आवश्यक आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास़्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवविज्ञान यांसारख्या विज्ञानाच्या मूलभूत शाखांना, तसंच त्यांच्या आपापसातील सहयोगापायी स्थापन झालेल्या जैवरसायनशास्त्र, जैवभौतिकशास्त्र, रेण्वीय जीवशास्त्र यांसारख्या अत्याधुनिक शाखांचा समावेश तर करायलाच हवा. तीच बाब उपयोजित विज्ञानशाखांची व तंत्रज्ञानशाखांचीही आहे. या विषयांमध्ये मूलभूत संशोधन करून मोलाची भर घालणार्‍या महाभागांना शिल्पकार म्हण्ाून गणलं जाणं स्वाभाविकच होतं, पण विज्ञान शिक्षण आणि विज्ञान प्रसार या समाजात विज्ञानाची वेल रुजण्यासाठी आवश्यक असणार्‍या क्षेत्रांमध्ये देदीप्यमान कामगिरी करणार्‍या महाभागांनाही त्या पंक्तीत स्थान देणं आवश्यक ठरतं. 

तरीही, लक्षणीय किंवा देदीप्यमान कामगिरीचे निकष कोणते, असा सवाल उभा राहण्याचा संभव आहे. त्या बाबतीत मात्र संदिग्धता नाही. ते निकष ठोक आहेत. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांना मानसन्मान प्राप्त झालेले आहेत़, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांचं संचालकत्व ज्यांनी भूषविलं आह़े, ज्यांच्या संशोधनाचा गौरवपर उल्लेख मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून झालेला आहे, ज्यांनी प्रयोगशाळेतील संशोधन घराघरापर्यंत पोहोचवलेलं आह़े, खास करून शेतकीमध्ये महाराष्ट्रातील शेतीच्या समस्यांवर तोडगे शोधण्याचे विशेष प्रयत्न ज्यांनी केले आहेत, ज्यांनी विज्ञानाधिष्ठित उद्योगधंद्यांची स्थापना करून तंत्रज्ञान विकासात मोलाची भर घातली आह़े, ज्यांनी विज्ञानशिक्षणाचा पाया भक्कम करण्याची कामगिरी बजावलेली आहे, अशांना शिल्पकारांमध्ये स्थान मिळालेलं आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याच्या प्रयत्नांमध्ये मात्र महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. यातील बहुतेक योगदान स्वयंसेवी संस्थांचंच आहे. त्यांच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या दिग्गजांनाही शिल्पकार मानणं आवश्यक आहे.

हे निकष जरी ठोस असले, तरी त्यानुसार ज्यांची निवड होऊ शकते अशा सर्वांचाच समावेश या कोशात आहे, असा दावा मात्र करता येणार नाही. दस्तऐवजांच्या दफ्तरीकरणाबाबत आपल्या देशातच एकंदरीत भयानक अनास्था आहे. अनेक धडाडीच्या धुरिणांची विश्वासार्ह चरित्रविषयक माहिती मिळणं त्यामुळंच दुरापास्त झालं आहे. त्यांच्या वैज्ञानिक कार्याची बरीचशी माहिती मिळत असली तरी त्यांच्या वैयक्तिक माहितीची वानवाच आहे. कित्येकांच्या वैज्ञानिक शोधनिबंधांचा उल्लेख इतरत्र आढळतोय, पण ते मूळ शोधनिबंध अवलोकनासाठीही उपलब्ध नाहीत. ज्यांच्या काही निकटच्या नातलगांचा वा वारसांचा वा शिष्यांचा ठावठिकाणा लागणं शक्य आहे, अशांकडून काही माहिती मिळू शकते. कित्येक वेळा तीही तुटपुंजी असते किंवा त्यावर भावनात्मक जवळिकीचं सावट पडलेलं असतं. अशा वेळी काही अतिशय अवघड निर्णय घ्यावे लागतात. जी माहिती मिळाली, तिच्या विश्वासार्हतेची खात्री नसतानाही तिचा समावेश करावा की ती वगळण्याचा मार्ग पत्करावा, अशा दुविधेत पडल्यावर ती वगळण्याचा सोईस्कर मार्ग पत्करण्याचा मोह होतो.

महाराष्ट्रात विज्ञान प्रसाराचं काम अनेक संस्था गेली कित्येक वर्षं जोमानं करीत आहेत. मराठी विज्ञान परिषद हे त्यांतील एक ठळक नाव. ही संस्था गेली ४४ वर्षे नाना प्रकारे विज्ञान प्रसार करीत आहे. १९६६पासून २०१०पर्यंत मराठी विज्ञान परिषदेनं अखंडपणे चव्वेचाळीस अधिवेशनं भरवली आहेत. इतर संमेलनांत पडला, तसा खंड एकदाही न पडता या अधिवेशनांचं अध्यक्षपद मराठी भाषक वैज्ञानिकानं भूषविलं आहे. (अपवाद १९९५ सालचे अध्यक्ष श्री. अरविंद ग्ाुप्ता आणि २०१० सालचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम.) या अधिवेशन परंपरेनं वैद्यक, अभियांत्रिकी, भौतिकी, रसायन, जीव, शेती, समुद्रतळ, लोकसंख्या, संरक्षण, शिक्षण, आहार, भूशास्त्र, पर्यावरण, अर्थशास्त्र, रेल्वे इत्यादी विषयांतील वैज्ञानिकांना अध्यक्षपद देऊन त्या-त्या विषयातील त्यांच्या कामाच्या निमित्तानं हे विषय ग्रमीण आणि शहरी समाजापुढे आण्ाून त्या-त्या विषयात समाजाचं प्रबोधन केलं. याचा आणखी एक फायदा असा झाला की, ही क्षेत्रं पालकांना माहीत झाल्यानं, ही क्षेत्रं शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत, हे ध्यानात आलं आणि व्यावसायिक आणि शैक्षणिक ह्या दोन्ही दृष्टींनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या क्षेत्रांना विविध पर्याय उपलब्ध झाले.

या सार्‍या चक्रव्यूहातून मार्ग काढत, महाराष्ट्राच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रांतील शिल्पकारांचा अल्पचरित्रात्मक कोश आज वाचकांपुढं सादर होत आहे. यातील अल्पचरित्र या संज्ञेकडे वाचकांचं लक्ष वेधणं आवश्यक वाटतं. या कोशांच्या नोंदींचं स्वरूप आणि व्याप्ती यांचे निकष निश्चित करण्यासाठी प्रबंध संपादकमंडळानं काही नियम केले होते. त्यानुसार प्रत्येक नोंदींची कमाल मर्यादा १२०० शब्दांवर सीमित केली होती. उपलब्ध माहिती, शिल्पकाराच्या कार्याचं स्वरूप यांनुसार ही मर्यादा किमान ३५० शब्दांची असावी असाही नियम होता. या नियमांचं काटेकोर पालन ह्या विज्ञानकोशाच्या संपादनाच्या वेळी केलं गेलं आहे.  या कोशाची समीक्षा करताना संपादनावर पडलेल्या या मर्यादांचंही भान ठेवणं आवश्यक ठरावं. तरीही त्यावरची वाचकांची वा समीक्षकांची भलावण करणारी प्रतिक्रिया त्या शिल्पकारांच्या महनीय कामगिरीपोटी असेल पण आलोचना करणार्‍या प्रतिक्रियांचं उत्तरदायित्व संपादकांनी स्वीकारायला हवं अशीच आमची भावना आहे.

बाळ फोंडके                                                                                                                                                                 

अ.पां. देशपांडे