Skip to main content
x

पवार, ऊर्मिला हरिश्चंद्र

    र्मिला हरिश्चंद्र पवार यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या शब्दांतून साकार झालेले शिल्प ‘आयदान’ हे आत्मपर चरित्र आधुनिक मराठी साहित्याचे एक लेणे ठरेल इतके संवेदनशील आणि कोरीव आहे. फणसवळेपासून रत्नागिरीपर्यंतच्या ‘घाटी-डोंगरातून उरी पोटी ओझी वाहून पोट जाळणार्‍या’ त्या ‘गावाकडच्या बायकांनी’ त्यांना कडेहीखांद्यावर घेऊन त्यांचे बाळपण साजरे केले होते. ‘आयदान’मध्ये त्या बायकांच्या बरोबरच तिथल्या तत्कालीन जीवनाला व राहणीला लेखिकेने सजीव व साकार केले आहे. ‘दलित’ शब्दाची दलित साहित्यिकांनी केलेली नवी व्याख्या सर्वमान्य झालेली आहे. ‘समाजव्यवस्थेखाली चिरडलेला, भरडलेला उपेक्षित आणि त्या शोषणाच्या विरोधात उभा राहिलेला विज्ञानवादी, मानवतावादी माणूस तो दलित’ हे आत्मभान महत्त्वाचे आहे.

ऊर्मिला पवार यांचे माहेरचे नाव विमल अर्जुन पवार हे होय. वडील सहावीपर्यंत शिकलेले, हरहुन्नरी व कष्टाळू होते. नोकरीच्या जोडीला घराण्यात चालत आलेली भटगिरी ते करीत. ऊर्मिलाची आई त्यांना संसाराचा गाडा ओढण्यासाठी चांगली मदत करी. ती बांबूच्या टोपल्या, करंडे, खुराडे, सुपे, रोवळ्या, दुरड्या, परड्या, हातर्‍या, पाळणे असे काहीही विणायची. या सर्व वस्तूंचे सामान्यरूप म्हणजे ‘आयदान’. भटक्या-विमुक्त जातीचा हा पोट भरण्याचा व्यवसाय आहे.

ऊर्मिला यांचे शिक्षण त्यांच्या जन्मगावी रत्नागिरी येथे झाले. १९६३मध्ये एस.एस.सी. झाल्यानंतर, विवाह होऊन त्या मुंबईला आल्या. येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून १९८३ साली त्या एम.ए. झाल्या. आपल्या बालपणासंबंधीचे लेखन त्यांनी ‘अबब हत्ती’ या मुलांसाठीच्या दिवाळी अंकात प्रथम १९८९मध्ये व पुढेही ३-४ वर्षे प्रसिद्ध केले. त्यांच्या कथा आणि वैचारिक लेख ‘स्त्री उवाच’, ‘लोकसत्ता’, ‘मिळून सार्‍या जणी’ ह्यांमधून प्रसिद्ध झाले. ‘आम्हीही इतिहास घडवला’ (१९८९), (सहलेखिका मीनाक्षी मून) हे संशोधनात्मक लेखन असून ‘उदान’ (१९८९) हे बौद्ध वाङ्मयातील तत्त्वज्ञान मराठीतून सांगणारे पुस्तक आहे. ‘मॉरिशस एक प्रवास’ (१९९४), ‘मुक्ती’ व ‘इलास पावण्या तू बसा बसा’ हे दोन एकांकिका संग्रह आहेत. ‘एका एका इयत्तेने’ हे आत्मचरित्रात्मक लेखन लोकप्रिय झाले आहे. ऊर्मिला यांच्या लेखनातला व त्यांच्या आईच्या हातात अखंड फिरणार्‍या आयदानातल्या वेदनेचा धागा एक आहे, हे जसे जाणवते; तसेच त्यांच्यातला ‘चिवट व जिवट’ स्वभाव आणि प्रखर आशावादही जाणवतो.

२०१३ साली त्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या लेखनासाठी त्यांना ‘प्रबोधनमित्र’ पुरस्कारही प्राप्त झाला आहे. 

- वि. ग. जोशी/ आर्या जोशी

पवार, ऊर्मिला हरिश्चंद्र