कपिलेश्वरी, बाळकृष्ण लक्ष्मण
किराणा घराण्याचे अध्वर्यू उ.अब्दुल करीम खाँसाहेब यांचे पट्टशिष्य बाळकृष्ण लक्ष्मण कपिलेश्वरी यांचा जन्म गोव्यात झाला. त्यांचे वडील लक्ष्मणराव कपिलेश्वरी हे मूळचे गोव्याचे. त्यांना संगीत व नाटक यांची अत्यंत आवड होती. ‘स्त्री संगीत नाटक कंपनी’चे ते चालक होते. अब्दुल करीम खाँ साहेबांना महाराष्ट्रात बस्तान बसवण्यासाठी लक्ष्मणराव कपिलेश्वरी यांनी सर्वतोपरी साहाय्य केले. लक्ष्मणरावांनी आपली तीन मुले (बाळकृष्ण, शंकर व हरिश्चंद्र) ‘आयुष्यभर संगीत साधना करणार’ अशा प्रतिज्ञेवर खाँ साहेबांच्या स्वाधीन केली. यांपैकी बाळकृष्णबुवा हे खाँ साहेबांच्या ‘उपदेशक वर्गा’चे विद्यार्थी बनले. जे विद्यार्थी भविष्यात गायक म्हणून मोठे नाव कमावण्याची क्षमता बाळगत व जे प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी अध्यापनही करू शकत, असे विद्यार्थी ‘उपदेशक’ वर्गात असत. म्हणजेच प्रथमपासूनच खाँ साहेबांना बाळकृष्ण बुवांबाबत मोठ्या अपेक्षा होत्या. खाँ साहेबांच्या बहुतेक सर्व मैफलींमध्ये बाळकृष्णबुवा तंबोर्यावर बसून गायनसाथ करीत व शंकरबुवा कपिलेश्वरी पुढील काळात संवादिनीची साथ करीत.
बाळकृष्णबुवांनी बेळगाव येथे १९१४ मध्ये ‘सरस्वती संगीत विद्यालय’ स्थापन केले. हे विद्यालय २४ जून १९२० रोजी मुंबई येथे स्थलांतरित केले गेले. बाळकृष्णबुवा व शंकरबुवा मुंबईतील विद्यालय सांभाळत, तर हरिश्चंद्रबुवा खाँ साहेबांनी पुण्यात स्थापन केलेले ‘आर्य संगीत विद्यालय’ सांभाळत. १९३० मध्ये खाँ साहेबांनी बाळकृष्णबुवांना ‘खिलाफत’ दिली, म्हणजेच आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. त्यांना ‘खास-उल-खास’ अशी तालीम दिली. ते आयुष्यभर खाँ साहेबांच्या मागे सावलीसारखे वावरले.
बाळकृष्णबुवांनी ‘श्रुतिदर्शन’ १९६४ मध्ये हा ग्रंथ लिहिला. अब्दुल करीम खाँ साहेबांनी आयुष्यभर स्वर, श्रुती, सप्तक यांवर जे संशोधन केले, ते या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. खाँ साहेब, क्लेमंट, देवल व अन्य पंडित यांच्यामध्ये झालेल्या चर्चा व २२ श्रुतींची सप्रमाण चिकित्सा या ग्रंथामध्ये केली आहे. प्राचीन भारताचे स्वरसप्तक हे भैरवी सदृश कोमल स्वरांचे असावे असा सिद्धान्त यामध्ये मांडला आहे.
बाळकृष्णबुवांनी लिहिलेला दुसरा महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे ‘अब्दुल करीम खाँ साहेब यांचे जीवनचरित्र’ (१९७२) होय. ऐतिहासिकदृष्ट्या हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. मुंबईच्या ‘सरस्वती संगीत विद्यालया’मधून बाळकृष्णबुवांनी अनेक शिष्यांना शिकवले. बुवांची मुले चंद्रशेखर व सुधा पेडणेकर यांनाही त्यांची उत्तम तालीम मिळालेली होती.स्वत: एक कलाकार म्हणून मैफली करण्यापेक्षाही खाँ साहेबांची विद्या ग्रहण करून व्यासंग वाढवणे, खाँ साहेबांचे सांगीतिक व वैयक्तिक व्यवहार सांभाळणे, विद्यालय चालवणे, ग्रंथलेखन करणे यांमध्ये बाळकृष्णबुवांनी आपले जीवन व्यतीत केले.