Skip to main content
x

पटवर्धन, सुधीर मनोहर

                मकालीन वास्तवाचे आणि सामान्य माणसाच्या जगण्याच्या धडपडीचे चित्रण करणारे आणि कोणत्याही प्रकारचे रीतसर कलाशिक्षण न घेता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेले चित्रकार म्हणून सुधीर पटवर्धन ओळखले जातात. बडोदा, मुंबई व देशाच्या अन्य भागातील चित्रकारांनी १९६० नंतरच्या काळात मानवाकृतिप्रधान चित्रांना वेगळा सामाजिक आशय दिला. अशा चित्रकारांमध्ये पटवर्धन यांना महत्त्वाचे स्थान आहे.

                सुधीर पटवर्धन यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील राजा उर्फ मनोहर पटवर्धन शस्त्रनिर्मिती कारखान्यात नोकरीला असल्याने त्यांच्या बदल्या होत असत. त्यामुळे सुधीर पटवर्धनांचे शिक्षण कुन्नूर व पुणे येथे झाले. त्यांनी १९६५ मध्ये पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी १९७२ मध्ये ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’मधून वैद्यकीय पदवी घेतली व ते १९७३ मध्ये मुंबईत आले. पटवर्धनांनी १९७५ मध्ये ठाण्यामध्ये क्ष-किरणतज्ज्ञ (रेडिऑलॉजिस्ट) म्हणून व्यवसाय सुरू केला. वैद्यकीय व्यवसायासाठी ठरावीक वेळ देऊन उरलेला वेळ चित्रकलेसाठी देता येईल, असा त्यामागे उद्देश होता.

                पटवर्धनांना चित्रकलेची सुरुवातीपासून आवड होती. क्रिकेटसारख्या खेळांची आवड आणि सुतारकामाचा छंद हा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना चित्रकार होण्याचा विचार त्यांच्या मनात रुजला. वसतिगृहामधील काही मित्र निसर्गचित्र करायला जात. त्याचाही मनावर अनुकूल परिणाम झाला. ‘हाऊ टू पेंट’ सारखी पुस्तके विकत घेणे, अभिनव कला मंदिरच्या छंदवर्गाला जाणे असे चित्रकलेचे तंत्र आत्मसात करण्याचे प्रयत्न सुरू झाले. चित्रकलेवरची पुस्तके व कलेचा इतिहास वाचणे, वेगवेगळ्या चित्रकारांची चित्रे अभ्यासणे, रेखाचित्रे काढणे अशा अनेक अंगांनी पटवर्धनांनी चित्रकला आत्मसात केली. मुंबईत आल्यावर प्रदर्शनांमधून चित्रकारांच्या भेटी घडत गेल्या. गीव्ह पटेल, नलिनी मालानी, गुलाममोहंमद शेख अशा चित्रकारांबरोबर होणार्‍या चर्चांमधून पटवर्धनांच्या कलाविषयक विचारांना चालना मिळाली. आधुनिक कलेपलीकडे असलेल्या रेनेसान्स, लोककला, जनसामान्यांची कला अशा कलापरंपरांमधून खूप काही घेण्यासारखे आहे, ही जाण पटवर्धनांच्या मनात या सुरुवातीच्या काळात रुजली.

                चित्रकलेबरोबर साहित्य, तत्त्वज्ञान, सामाजिक चळवळी याबद्दलही पटवर्धनांना कुतूहल होते. कामू, सार्त्र, मार्क्सवाद, बरख्तची नाटके आदी वाचनातून पटवर्धनांची समाजाभिमुख अशी वैचारिक बैठक तयार झाली आणि त्याचा प्रभाव त्यांच्या चित्रांच्या आशयावर आणि रचनेवरही पडला. मार्क्सवादी विचारवंत अर्न्स्ट फिशर यांच्या ‘नेसेसिटी ऑफ आर्ट’ या पुस्तकामुळे पटवर्धनांना कला आणि मानवजातीचा विकास यांच्यातील नाते उलगडले आणि कलेतिहासाकडे ते आस्थेने बघू लागले. याच्या जोडीलाच ते आजूबाजूच्या सामाजिक वास्तवाचा डोळसपणे अनुभव घेत होते. फर्गसन महाविद्यालयापासून त्यांच्यासोबत शिकत असलेल्या शांता कल्याणपूरकर यांच्याशी १९७४ मध्ये पटवर्धनांचा विवाह झाला. त्या स्वत: कथ्थक नृत्य शिकल्या होत्या व त्या वैद्यकीय व्यवसायात होत्या. पटवर्धनांच्या कलानिर्मितीचा व्याप वाढल्यावर वैद्यकीय व्यवसायातून त्यांनी निवृत्ती स्वीकारली व पटवर्धनांच्या कलानिर्मितीला त्यांनी प्राधान्य दिले. त्या अनुषंगाने आवश्यक ती कामे त्या करू लागल्या व स्वत:चे नृत्यविषयक संशोधनाचे काम त्यांनी चालू ठेवले. पटवर्धनांच्यातल्या साम्यवादी विचाराच्या कार्यकर्त्यापेक्षा त्यांच्यातला कलावंत कसा कार्यरत राहील याची त्यांनी काळजी घेतली.

                मुंबईत आल्यावर पटवर्धनांनी वैद्यकीय व्यवसायासाठी ताडदेव ते ठाणे असा लोकलचा प्रवास केला, त्यानंतर ते ठाण्यात स्थायिक झाले. मुंबईच्या धकाधकीचा तो एक सकारात्मक अनुभव होता. मोठ्या शहरातील अनेक प्रकारची माणसे, त्यांच्याशी जोडला जाणारा आपला धागा, या गर्दीतली आपली स्वतःची अनामिकता या गोष्टी पटवर्धनांना विशेष जाणवल्या. पटवर्धनांनी १९८६ पासून चार-एक वर्षांच्या कालावधीत ‘पोखरण’ या ठाण्याजवळच्या परिसरातील बदलत्या जनजीवनाची चित्रे काढली. तिथे पाड्यांवर राहणाऱ्या, काम करणाऱ्या लोकांशी कलाकार म्हणून नाते जोडण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता. ‘लोअर परळ’ चित्रातली गिरणगावची आधुनिक शहरात रूपांतरित होणारी संक्रमणावस्था आणि ‘उल्हासनगर’ चित्रामधली औद्योगिक पट्ट्यातील प्रदूषणग्रस्त नदी अशा परिपूर्ण चित्रांमध्ये पटवर्धनांचा व्यक्तिगत अनुभव आणि त्यांच्यातला सामाजिक विचारवंत यांचा मनोज्ञ मिलाफ झालेला आढळतो.

                सुधीर पटवर्धन यांनी विविध माध्यमांमध्ये काम केले. तैलरंग, अ‍ॅक्रिलिक, रेखाचित्रे (ड्राईंग्ज), टेराकोटामधील शिल्पे अशी माध्यमे हाताळताना त्यांनी व्यक्ती आणि मानवाकृती चित्रण, निसर्गचित्र, रचनाचित्र या चित्रप्रकारांना एक वेगळा आशय दिला. सामाजिक वास्तवाला प्रतिसाद देणे, त्याचे चित्रण करणे यावरच न थांबता त्यापलीकडे असलेल्या वास्तवाचा शोध घेण्याचा पटवर्धनांनी प्रयत्न केला. मुंबईत व दिल्लीत १९८१ मध्ये भरलेल्या प्रदर्शनात भूपेन खख्खर, गुलाम मोहंमद शेख, विवान सुंदरम्, जोगेन चौधरी, नलिनी मालानी यांच्याबरोबर सुधीर पटवर्धनांचाही सहभाग होता. गीता कपूर यांनी त्यावर कॅटलॉगमध्ये एक लेखही लिहिला होता. या प्रदर्शनाचे नाव होते ‘प्लेस फॉर पीपल’. या प्रदर्शनातील सर्वच कलावंतांनी मानवाकृतीच्या चित्रणाला सामाजिक संदर्भ दिले. ‘बडोदा स्कूल’ या नावाने चित्रकलेतील हा सामाजिक वास्तववाद ओळखला जाऊ लागला आणि सुधीर पटवर्धन या प्रदर्शनामुळे राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. या विचारधारेशी आणि पटवर्धनांशी व्यक्तिगत पातळीवर नाते जुळलेले आणखी एक चित्रकार आहेत, गीव्ह पटेल.

                पटवर्धनांच्या कलाप्रवासाचे तीन ते चार कालखंड पडतात. यांतील १९७५ ते १९८५ हा पहिला कालखंड. पटवर्धनांवर असलेला डाव्या विचारसरणीचा प्रभाव आणि कष्टकरी वर्गातल्या मानवाकृतींचे त्यांच्या देहबोलीसह केलेले चित्रण या काळातल्या चित्रांमध्ये प्रामुख्याने दिसते. ‘वर्कर’ मालिकेतील कामगारांची ‘मॅन विथ सिलिंडर’, ‘ट्रक’ यासारखी चित्रे, ‘द ट्रेन’, ‘टाऊन’, ‘इंडस्ट्रियल स्केप’ सारखी सार्वजनिक स्थळे आणि माणसे असलेली चित्रे या कालखंडात येतात. ‘इराणी रेस्टॉरंट’ हे पटवर्धनांचे प्रसिद्ध चित्र या काळातलेच आहे.

                त्यांचा १९८६ ते १९९६ हा दुसरा कालखंड मानला तर या काळात पटवर्धनांनी गर्दी व समूह हा विषय केंद्रस्थानी ठेवला. सामूहिक जाणीव आणि त्याचबरोबर प्रत्येकाची स्वतंत्र ओळख या दोन गोष्टींमधला अंतर्विरोध व ताण या चित्रांमध्ये प्रामुख्याने दिसतो. शहरीकरणामुळे निसर्ग आणि माणूस यांच्यातले बदलत चाललेले नातेही या चित्रांमध्ये येते. समीप दृश्य आणि निसर्ग, जवळीक आणि दूरस्थ भावना वा परात्मता अशा द्वंद्वात्मकतेतून पटवर्धनांच्या चित्रांमध्ये नाट्य निर्माण झाले ते याच काळात. ‘पोखरण स्टेशन रोड’, ‘ट्री’, ‘रायट’ यासारख्या चित्रांमधून ही वैशिष्ट्ये प्रामुख्याने दिसतात.

                नंतरचा १९९७ ते २००४ हा तिसरा कालखंड एका अर्थाने दुसर्‍या कालखंडातील जाणिवाच पुढे नेणारा आहे. त्यांनी ‘लोअर परळ’, ‘उल्हासनगर’ यासारखी पॅनोरॅमिक चित्रे याच काळात काढली. प्रतीकांचा आधार घेत केलेली मांडणी, परिचित वस्तूंची काहीशी अतार्किक अशी योजना आणि बाह्य नाट्यात्मतेपेक्षा सांस्कृतिक, सामाजिक बदलांची सूक्ष्म जाण या चित्रांमध्ये दिसते. ‘विटनेस’ चित्रामध्ये रोमँटिक परंपरेत शोभावी अशी कलाकाराची नग्न आकृती आहे आणि त्याच्याभोवती कालचक्राशी व दृश्यकलेच्या इतिहासाचा साक्षीदार या नात्याने संबंधित असलेल्या चित्रप्रतिमा आलेल्या आहेत. आधीच्या कालखंडातल्या पटवर्धनांच्या चित्रांपेक्षा या चित्रातला अद्भुतरम्यतेचा प्रत्यय वेगळ्या प्रकारचा आहे.

                पुढे २००५ नंतरच्या चित्रांमध्ये शहरी जीवनातली असुरक्षितता, हिंसा ‘बायलेन्स सागा’ सारख्या चित्रांमधून आणि ‘एन्डगेम’, ‘किलिंग’ सारख्या रेखाचित्रांमधून येत राहिली. स्वतःचे कलाकाराचे, तसेच कौटुंबिक जग आणि बाहेरचे जग यातले नाते शोधण्याचा प्रयत्न पटवर्धनांच्या या कालखंडातल्या चित्रांमध्ये दिसतो. स्टुडिओशी संबंधित ‘स्टुडिओ घोस्ट्स्’, ‘डिफिकल्टी इन टेलिंग द ट्रूथ’, ‘द एक्लेक्टिक’ सारख्या चित्रांमधून तसेच ‘विंडोज’ मालिकेतून या दोन जगातले साम्यविरोध आलेले आहेत. ‘फॅमिली फिक्शन’, ‘फॅमिली’ सारख्या चित्रांमधून पटवर्धनांनी चित्रनिर्मितीबद्दलचे त्यांना पडणारे प्रश्‍न कौटुंबिक अनुभवाच्या चौकटीत उपस्थित केले आहेत. स्त्री-पुरुष नाते आणि जीवन-मृत्यूचा वेध इथे घेतलेला आहे. ‘रूट मॅप्स’ या २०१२ मध्ये झालेल्या प्रदर्शनात एका व्यापक अर्थाने प्रवास या संकल्पनेचा शोध पटवर्धनांनी घेतला आणि स्थिरता व गतिमानता यांच्यातल्या द्वंद्वात्मक नात्याची मांडणी केली.

                पटवर्धनांच्या चित्रांची दृश्यभाषा अनेक संस्कारांनी आणि तंत्रमाध्यमाच्या जाणीवपूर्वक वापरातून घडलेली आहे. चित्राचे अवकाश खंडित करणे, सलग चित्राऐवजी पॅनेल्समध्ये त्यांची विभागणी करणे, निसर्ग आणि व्यक्तींचा समूह यांची एकत्र मांडणी करुन जवळचे आणि दूरचे नाते प्रस्थापित करणे, विविध कोनांचा (मल्टिपल पर्स्पेक्टिव्हचा) एकाच चित्रात वापर करणे, कधी सपाट तर कधी खोलीचा (डेप्थचा) आभास निर्माण करणारे फसवे परिप्रेक्ष्य वापरणे, आरसे व खिडक्या यांचा अवकाशविभाजनासाठी आणि विस्तारासाठी अर्थपूर्ण वापर करणे, पोत आणि पॅटर्न्सचा वापर करणे, वास्तव तपशिलांचा (टेलिफोन बूथ, दुकानांच्या पाट्या) प्रतिमात्मक वापर करणे अशी त्यांच्या दृश्यभाषेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

                सुधीर पटवर्धनांची १९७९ ते २०१२ पर्यंत सतरा एकल प्रदर्शने देशात विविध ठिकाणी झालेली आहेत. देशात आणि लंडन, न्यूयॉर्कसारख्या अनेक ठिकाणी पटवर्धनांची चित्रे सामूहिक आणि प्रातिनिधिक प्रदर्शनांमध्ये प्रदर्शित झालेली आहेत. अनेक संग्रहालये आणि संग्रहकांच्या कला संग्रहांमध्ये त्यांच्या चित्रांचा समावेश झालेला आहे. त्यांच्या कलानिर्मितीवर जाणकार समीक्षकांनी लेखन केलेले आहे. पटवर्धनांच्या समग्र कलाप्रवासाचा आढावा घेणारे पुस्तक रणजित होस्कोटे यांनी इंग्रजीत, तर पद्माकर कुलकर्णी यांनी मराठीत लिहिले आहे. ‘द क्राफ्टींग ऑफ रिअ‍ॅलिटी’ हे पटवर्धनांच्या रेखाचित्रांवरील पुस्तक रणजित होस्कोटे यांनी लिहिले असून दिलीप रानडे यांनी ‘रेखाचित्रविचार’ या नावाने त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. कवी नारायण सुर्वे आणि सुधीर पटवर्धन यांच्यावर ‘साचा’ या नावाचा एक माहितीपट तयार करण्यात आला आणि २०१२ मध्ये ‘चित्रगोष्टी’ नावाचा पटवर्धनांच्या चित्रांवर आधारित असा नाट्यप्रयोग ‘आविष्कार’ संस्थेतर्फे सादर करण्यात आला. पटवर्धनांनी २००८-०९ मध्ये ‘विस्तारणारी क्षितिजे’ नावाचे प्रदर्शन संयोजित केले होते. या बोधी आर्ट गॅलरी प्रायोजित प्रदर्शनात तीस प्रसिद्ध समकालीन चित्रकारांची चित्रे व कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या व महाराष्ट्रातील आठ शहरांमध्ये हे प्रदर्शन नेऊन प्रदर्शित करण्यात आले. पटवर्धनांनी २०११ मध्ये ‘रेखाविष्कार’ या नावाने दहा चित्रकारांची रेखाचित्रे असलेले प्रदर्शन पुणे आणि मुंंबई येथे आयोजित केले होते.

                माणूसपणाच्या जाणिवा विस्तारणारे चित्रकार म्हणूनच सुधीर पटवर्धन ओळखले जातात.

- रंजना पोहनकर/दीपक घारे

 

संदर्भ
संदर्भः १. कुलकर्णी पद्माकर, ‘माणूसपणाच्या जाणिवा विस्तार-णारा चित्रकार: सुधीर पटवर्धन’, मुंबई, लोकवाङमय गृह, २००७. २. पटवर्धन सुधीर, ‘क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काही अलौकिक ही समजूत भ्रामक’ (मुलाखत - दीपक घारे), २०१२ ‘महाअनुभव’ जानेवारी २०१२. ३. प्रदर्शनांचे कॅटलॉग्ज. ४. पटवर्धन शांता, ‘साथी’ सुधीर, २००७, ‘चिन्ह’ वार्षिक २०१२.
पटवर्धन, सुधीर मनोहर