Skip to main content
x

गोरेगावकर, भगवंत कृष्णराव

गोरेगावकर बंधू (गोरेगावकर ब्रदर्स)

धुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शिल्पकलेच्या क्षेत्रात दोघा शिल्पकार बंधूंनी एकत्र येऊन स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात व्यवसाय केल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे मुंबईच्या गावदेवी परिसरातील ‘गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओ’ हे आहे. हा स्टूडिओ १९३३ ते १९७० अशी तब्बल सदतीस वर्षे कार्यरत होता. हा स्टूडिओ चालविणारे हे दोन भाऊ बी.के. गोरेगावकर व एन.के. गोरेगावकर या नावांनी प्रसिद्ध होते. या स्टूडिओमध्ये स्मारकशिल्पांची व्यावसायिक कामे एकत्रितपणे करत असतानाच ते स्वतंत्रपणे स्वान्तसुखाय शिल्पनिर्मितीही करीत असत व त्यांची अशी शिल्पे पारितोषिकप्राप्त ठरली होती.

मूर्तिकलेच्या कामात मूर्ती घडविण्यापूर्वी बरीच तयारी करावी लागते. त्यात सांगाडा तयार करणे, त्यावर माती लिंपणे, मुख्य पुतळा आकारास आणणे, त्याचे मोल्डिंग, कास्टिंग व फिनिशिंग अशा अनेक कामांचा समावेश असतो. एन.के. गोरेगावकर हे पूर्ण वेळ स्टूडिओची जबाबदारी सांभाळत. बी.के. गोरेगावकर आपली जे.जे. स्कूलमधील विभाग प्रमुखाची जबाबदारी सांभाळून उर्वरित वेळात व शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ही कामे करीत.

असे असूनही या भावंडांत व्यवसाय सांभाळत असताना मतभेद निर्माण झाले नाहीत. दोघे मिळून आलेले काम पार पाडीत असत. उपलब्ध असलेल्या या दोघा बंधूंच्या स्वतंत्र कामावरून असे दिसते, की बी.के. गोरेगावकर हे मातीकामात अधिक निष्णात होते, तर एन.के. गोरेगावकर हे तांत्रिक बाबतीत जास्त निपुण व कार्यक्षम असावेत. दोघांनीही एकमेकांची बलस्थाने ओळखून सहकार्याने आयुष्यभर व्यावसायिक कामे केली.

शिल्पकार म्हात्रे यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिल्पकलेच्या क्षेत्रात शिरलेले व शिल्पकार करमरकर यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून स्मारक-शिल्पांसोबतच सर्वसामान्यांची विविध आविर्भावांतील भावपूर्ण शिल्पे घडविणारे शिल्पकार म्हणून बी.के. गोरेगावकर ख्यातनाम होते. याशिवाय त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिल्पकला विभागाचे विभाग प्रमुखपद भूषविले व अनेक तरुण शिल्पकारांना मार्गदर्शन केले.

भगवंत कृष्णराव गोरेगावकर यांचा जन्म मुंबईच्या गावदेवी परिसरात सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाजात झाला. त्यांचे वडील कृष्ण हरिश्‍चंद्र गोरेगावकर हे त्यांच्या समाजातील एक प्रतिष्ठित गृहस्थ व पेशाने ते सॉलिसिटर होते. त्यांच्या आईचे नाव राधा होते. त्यांचा विवाह शालिनी परळकर यांच्याशी झाला होता. त्यांच्या समाजातील चित्रकार एन.जी. मंत्री व शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांची कलानिर्मिती वडील कृष्णराव यांच्यामुळे भगवंताला लहानपणापासूनच पाहावयास मिळाली. लहानपणी ते अनेकदा गिरगावात चौपाटीजवळ असलेल्या म्हात्र्यांच्या स्टूडिओत जात व म्हात्र्यांनी दिलेल्या मातीच्या गोळ्याला आकार देत बसत. यातून त्यांना मूर्तिकलेबद्दलची आवड निर्माण झाली. याशिवाय त्यांनी चित्रकार हळदणकर यांच्या ‘हळदणकर्स फाइन आर्ट इन्स्टिट्यूट’मधून चित्रकलेच्या एलिमेंटरी व इंटरमीजिएट परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन घेतले होते.

शालेय शिक्षणानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेऊन बी.ए.ची पदवी १९२६ मध्ये संपादन केली. त्यानंतर ते आपल्या वडिलांच्या व्यवसायात सहभागी होऊन कायद्याचा अभ्यास करू लागले. याच दरम्यान त्यांचे धाकटे बंधू नानाभाई (एन.के. गोरेगावकर) हे शालेय शिक्षण संपवून मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकला विभागात शिक्षण घेऊ लागले होते. त्यांच्या गावदेवी परिसरातील घरातही ते शिल्पकलेचा अभ्यास करीत असत. त्यातून भगवंतची मुळातच असलेली शिल्पकलेची ओढ वाढत गेली व तेदेखील आपल्या धाकट्या भावासह शिल्पे तयार करू लागले. कोणत्याही प्रकारचे रीतसर शिक्षण न घेतलेल्या भगवंतची शिल्पे समाजात कौतुकाचा विषय होऊ लागली. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १९२८ च्या वार्षिक प्रदर्शनात त्यांनी केलेले एक अर्धव्यक्तिशिल्प पाठविले. विशेष म्हणजे त्याचा दर्जा पाहून परीक्षकांनी त्याला रौप्य पदक प्रदान केले. यातूनच बी.के. गोरेगावकरांची शिल्पकलेची आंतरिक ओढ उफाळून आली व त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

चित्रकार धुरंधर व हळदणकर यांचा सल्ला घेऊन त्यांनी आपले क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला व कायद्याचा अभ्यास आणि सॉलिसिटरच्या व्यवसायात शिरण्याची कल्पना सोडून शिल्पकलेला वाहून घेण्याचे ठरविले. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांनीही त्यांच्या या निसर्गदत्त आवडीस प्रतिसाद देऊन पुढील शिक्षण घेण्यास मदत केली. धुरंधर यांच्या शिफारशीने व बी.के. गोरेगावकरांच्या कामाचा दर्जा बघून जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन प्रिन्सिपल सॉलोमन यांनी त्यांना पाच वर्षांचा अभ्यासक्रम असलेल्या शिल्पकला पदविकेच्या थेट शेवटच्या वर्षाला प्रवेश दिला. त्या वेळी त्यांचे धाकटे बंधू नानाभाई (एन.के. गोरेगावकर) हेदेखील त्याच वर्गात शिकत होते.

खूप परिश्रम घेऊन बी.के. गोरेगावकरांनी जी.डी.एम. (गव्हनर्मेन्ट डिप्लोमा इन मॉडेलिंग) ही अंतिम परीक्षा १९२९ मध्ये उत्तम प्रकारे उत्तीर्ण केली. या काळात तेथे अभ्यागत व्याख्याता म्हणून शिकवणार्‍या गणपतराव म्हात्र्यांनी त्यांचे ‘मॉडेलिंग क्लासमधील सर्वात हुशार विद्यार्थी’ असे कौतुक केले होते. याच वर्षी त्यांना जे.जे.च्या वार्षिक प्रदर्शनात पारितोषिक मिळाले, तसेच १९२९ व १९३० च्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांत प्रशस्तिपत्र व पारितोषिक मिळाले.

यानंतर बी.के. व एन.के. गोरेगावकर बंधूंना परदेशात जाऊन शिल्पकलेेचे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती, ती त्यांच्या वडिलांनी पूर्ण केली व ते १९३० मध्ये कलाशिक्षणासाठी रवाना झाले. युरोपमधील दोन वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी पॅरिस, रोम व लंडन येथील अकॅडमीत छोेटे अभ्यासक्रम पूर्ण केले. प्रो. व्हॉनेर यांच्या स्टूडिओत १९३१ मध्ये ते दगडी पुतळ्याच्या खोदकामाची व ज्युलिस लॅमी या फाउण्ड्रीत ब्रॉन्झ धातूच्या ओतकामाची पद्धत शिकले. रोममधील शिल्पकला प्रदर्शनात १९३२ मध्ये बी.के. गोरेगावकरांच्या शिल्पाला कांस्यपदक मिळाले. ते १९३२ च्या अखेरीस भारतात परतले. दोघा भावांनी ‘गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओ’ सुरू केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी त्यांच्या ज्ञातीच्या संस्थेसाठी, तसेच मुंबईतील उद्योगपतींसाठी व्यक्तिशिल्पे तयार केली. हळूहळू गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओची कीर्ती वाढू लागली व त्यांच्याकडे स्मारकशिल्पांची कामे येऊ लागली. याच काळात १९३३ मध्ये बी.के. गोरेगावकर यांच्या ‘द न्यूजपेपर बॉय’ या घरोघरी वर्तमानपत्र टाकणार्‍या मुलाच्या शिल्पाला बॉम्बे आर्ट सोसायटीचे ‘गव्हर्नर्स प्राइझ’ मिळाले. याच दरम्यान त्यांची सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागात शिक्षक म्हणून नेमणूक झाली व पुढील काळात त्यांनी या विभागाचे विभाग प्रमुखपदही सांभाळले.

१९३३ मध्ये स्थापन झालेल्या ‘गोरेगावकर ब्रदर्स आर्ट स्टूडिओ’ने पुढील काळात अनेक व्यावसायिक अर्धपुतळे, पूर्णाकृती पुतळे, संगमरवर व ब्रॉन्झ धातूत तयार केले. या पुतळ्यांत शेठ वालचंद हिराचंद दोशी, शेठ सुरजी वल्लभदास, शेठ चतुुर्भुज नेमजी, बडोद्याचे संस्थानिक प्रतापसिंह गायकवाड, गुरुदेव रानडे, पंडिता रमाबाई अशी अनेक व्यक्तिमत्त्वे होती. पोलीस आयुक्त सर पेट्रिक केली यांचा पूर्णाकृती संगमरवरी पुतळा १९३६ मध्ये मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटसमोरच्या पोलीस मुख्यालयात बसविण्यात आला. त्यामुळे गोरेगावकर बंधूंची प्रसिद्धी झाली. याशिवाय त्यांनी नागपूर येथील डॉ. हेडगेवार व डॉ. मुंजे यांचे पूर्णाकृती पुतळे तयार केले. त्यांना १९५५ मध्ये पुण्यातील झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या कामासाठी इतर शिल्पकारांसोबत आमंत्रित करण्यात आले. यासाठी गोरेगावकर बंधूंनी दोन वेगवेगळी मॉडेल्स स्वतंत्रपणे तयार केली व समितीस दाखवली. त्यांतील एक मॉडेल पसंतीस उतरले व ज्येष्ठ शिल्पकार करमरकरांच्या मार्गदर्शनाखाली बी.के. व एन.के. गोरेगावकर यांनी हे १४ फूट उंचीचे शिल्प साकार केले.

त्यांनी घडविलेली सर्वसामान्य व्यक्तींची भावपूर्ण शिल्पे हे त्यांच्या पिढीच्या बॉम्बे स्कूलचे खास वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. यांत ‘कष्टकरी’, ‘श्रमिक’, ‘झुरका ओढणारा’, ‘अंधे को दे दाता’, ‘टू द स्कूल’ हा दौत व दफ्तर घेऊन शाळेत जाणारा मुलगा, ‘न्यूजपेपर बॉय’, ‘चिनी माणूस’, ‘टू द मार्केट’ अशी अनेक शिल्पे असून त्यांत त्यांच्या शिल्पकलेतील प्रावीण्यासोबतच या शिल्पांमधून त्यांच्यातील माणुसकीचे व संवेदनशील मनाचे प्रतिबिंब दिसते. त्यांनी केलेले विणकाम करणार्‍या त्यांच्या पत्नीचे अर्धशिल्प हे सूक्ष्म अवलोकनासोबतच त्या स्त्रीची या कामातील एकाग्रता व त्या विणकामामागची भावना व्यक्त करणारे आहे. ‘टू द मार्केट’ या शिल्पात एक कष्टकरी, गरीब शेतकरीण हातात टोपली व त्यात फळे घेऊन विकण्यासाठी निघाली आहे. तिच्या सोबत असलेला लहान मुलगादेखील घरात पाळलेला कोंबडा विकण्यासाठी घेऊन जात आहे. दोघांच्याही चेहर्‍यांवर खिन्नतेसोबतच घरातल्या या वस्तू विकून पैशांची गरज भागेल का, असे भावही दिसतात. 

बी.के गोरेगावकर उंच व सुदृढ बांध्याचे, स्वभावाने शांत, विचारी व निर्व्यसनी होते. व्यवस्थितपणा व शिस्त हा त्यांचा स्थायिभाव होता. बालपणापासून उतारवयापर्यंत त्यांच्या रोजनिशी लिहिण्यात कधीही खंड पडला नाही. याशिवाय त्यांनी त्यांच्या ज्ञातीच्या विविध मंडळांवर विश्‍वस्त म्हणून काम केले. आयुष्याच्या अखेरच्या काळात ते अर्धांगवायूच्या विकाराने आजारी झाले व वयाच्या शहात्तराव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

- सुहास बहुळकर

गोरेगावकर, भगवंत कृष्णराव