Skip to main content
x

अहिवासी, जगन्नाथ मुरलीधर

भारतीय लघुचित्र शैलीपासून प्रेरणा घेऊन त्यातील वैशिष्ट्यांचा व तंत्राचा वापर करीत आधुनिक काळात, विसाव्या शतकात ज्या चित्रकारांनी स्वत:ची अशी चित्रशैली विकसित केली, त्यात जगन्नाथ मुरलीधर अहिवासी हे नाव ‘भारतीय कलाशैलीचे अध्वर्यू’ म्हणून प्रामुख्याने घेतले जाते. स्वत:च्या भारतीयत्व जपणार्‍या कलानिर्मितीसोबतच के.के. हेब्बर,  शंकर पळशीकर, ए.ए. आलमेलकर, वजुभाई भगत अशा अनेक मान्यवर चित्रकारांना सुरुवातीच्या काळात प्रेरणा देऊन त्यांच्यावर भारतीयत्वाचे संस्कार करणारे कलाशिक्षक म्हणूनही अहिवासी प्रसिद्ध आहेत.

उत्तर प्रदेशातील मथुरेजवळच्या बलदेव गावातील सुसंस्कृत घराण्यात त्यांचा जन्म झाला. वयाच्या चौथ्या वर्षीच जगन्नाथच्या आईचे निधन झाले व वडिलांनीच त्यांचा सांभाळ केला. त्यांचे वडील मुरलीधर  गुजरातमधील पोरबंदर येथे उत्तम संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. ‘हवेली कीर्तनकार’ म्हणून त्यांची ख्याती होती. संगीतमय, आध्यात्मिक व धार्मिक वातावरणात जगन्नाथचे बालपण गेले. हवेली संगीत व कीर्तन परंपरेचे माहेरघर असलेल्या उदयपूरजवळच्या नाथद्वारा येथील पारंपरिक भित्तिचित्रे व पूजाचित्रांचा अहिवासींवर बालपणीच संस्कार झाला.

जगन्नाथाने मोठे अधिकारी व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु लहानग्या जगन्नाथची मात्र चित्रकलेकडे ओढ होती. त्यामुळे आपण चित्रकार व्हावे असे त्यांनी लहानपणापासून ठरवले होते. सुदैवाने त्यांना शालेय वयात मालदेव राणा नावाचे उत्तम कलाशिक्षक लाभले. ते त्यांचे चित्रकलेतील पहिले गुरू होते. मालदेव राणांनी जगन्नाथला चित्रकलेतील तत्कालीन आधुनिक कला शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले व त्यासाठी मुंबईला कलाशिक्षणासाठी जाण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला अहिवासींनी गिरगावातील केतकर आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. एकाच वर्षात पहिल्या दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी १९२४  मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकण्यास सुरुवात केली आणि पेंटिंगची जी.डी. आर्ट ही पदविका १९२६ मध्ये प्रथम वर्गात, प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. शिक्षणाच्या काळात त्यांना ‘डॉली करसेटजी’ हे मानाचे पारितोषिक व इतर अनेक बक्षिसे मिळाली.  त्यांना १९२७ मध्ये शैक्षणिक काळात सातत्य आणि विशेष नैपुण्याबद्दलचे प्रतिष्ठेचे ‘मेयो पदक’ देण्यात आले. याच वर्षी ते सुरत येथे भरलेल्या चित्रप्रदर्शनात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

अहिवासी शिकत होते त्या काळात कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन हे भारतीय परंपरेबद्दल आत्मीयतेने विचार करणारे प्राचार्य संस्थाप्रमुख होते व त्यांनी भारतीय परंपरेची जोपासना करणार्‍या व भारतीयत्व जपणार्‍या ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या कला चळवळीस प्रोत्साहनही दिले होते. त्यासाठी खास वर्ग सुरू करून जी. एच्. नगरकरांची त्यावर नेमणूकही केली होती. नगरकरांकडे  भारतीय पुनरुज्जीवनवादी शैलीचा अभ्यास केलेल्या अहिवासींनी नगरकरांचा प्रभाव बाजूला ठेवून स्वत:ची शैली विकसित केली. त्यात आधुनिकतेसोबत भारतीय लघुचित्रशैलीचे प्रत्यंतर येत असे.

अहिवासींची चित्रे भारतीय लघुचित्रशैलीतील जैन, राजस्थान व विशेषत: कांग्र शैलीपासून प्रेरणा घेऊन विकसित होत होती. त्यांच्या या  कलाशैलीतील रेषेचे लावण्य व लालित्य या गुणांकडे सॉलोमन आकर्षित झाले. शिवाय बंगाली पुनरुज्जीवनवादी शैली व बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूलमधील चित्रकार नगरकर व इतरांनी अंगीकारलेल्या ‘वॉश टेक्निक’पेक्षा वेगळीच भासणारी अहिवासींची जाड व अपारदर्शक जलरंगातील चित्रे बघून ते प्रभावितही झाले होते. त्यामुळे सॉलोमन यांनी अहिवासींना १९२० मध्ये सुरू केलेल्या ‘म्यूरल डेकोरेशन’ क्लासची शिष्यवृत्ती दिली (१९२७). याच काळात सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टला दिल्ली येथील ‘इम्पीरिअल सेक्रेटरिएट’ येथील म्यूरल डेकोरेशनचे प्रतिष्ठेचे काम मिळाले होते व त्या चित्रात भारतीयत्वाचा आग्रह धरणार्‍या अहिवासींना सहभागी करून घेण्यात आले. या कामातील दोन अर्धवर्तुळाकार चित्रांचे काम तरुण अहिवासींना देण्यात आले. त्यात त्यांनी ‘पेन्टिंग व ड्रामा’ या दोन विषयांवरील चित्रे काढली. त्यातील त्यांच्या ‘ड्रामा’ या चित्रावर काहीसा, पाश्‍चिमात्य वास्तववादी रेखनशैलीचा वापर व नाट्यपूर्ण रचना असलेल्या नगरकरांच्या शैलीचा प्रभाव आढळतो, तर दुसरे चित्र ‘पेंटिंग’ यात मात्र सर्वस्वी राजस्थानी व कांग्र लघुचित्र शैलीचा प्रभाव असून, त्यात हाताळणी व रचनेच्या दृष्टीने काहीसा आधुनिक पद्धतीचा वापर आहे.

अहिवासींचा भारतीय पारंपरिक लघुचित्र परंपरेकडील ओढा व त्यातील प्रभुत्व लक्षात घेऊन सॉलोमन साहेबाने या पद्धतीचा भारतीयत्व जपणारा एक खास वर्गच १९२९ च्या दरम्यान सुरू केला होता. त्यावर अहिवासींची शिक्षक म्हणून नेमणूक केली. अहिवासींचे संस्कृत, ब्रजभाषा व ‘गीतगोविंद’सारख्या काव्यावर प्रभुत्व होतेच. या ‘इंडियन क्लास’चे वातावरण अहिवासींची श्रद्धा व आग्रहानुसार शुचितेचे व खास भारतीय पद्धतीचे ठेवण्यात आले. त्यामुळे वर्गात शिरण्यापूर्वी पादत्राणे बाजूला काढून ठेवावी लागत. वर्गात पाश्‍चिमात्य पद्धतीचे डाँकी व इझल्सऐवजी सतरंजीवर ठेवलेल्या बैठ्या डेस्कचा वापर असे. डेस्कवर बोर्ड ठेवून, सतरंजीवर मांडी घालून बसावे लागे. पारंपरिक पद्धतीने प्रथम आसनसिद्धी, त्यानंतर रेषासिद्धी आणि रंगसिद्धी अशा पद्धतीने चित्र तयार होई. त्यामुळे या वर्गातील वातावरण वेगळेच व भारलेले असे. अशा या पूर्णपणे भारतीय वातावरणात कुंचला कसा धरावा, रंग कसा वापरावा येथपासून ते आपल्या रंगसाहित्याबद्दल आपुलकी असावी व चित्र-साधनांची शुद्धता कशी जपावी व त्यांचा अनादर करू नये, अशा अनेक गोष्टी शिकविल्या जात. स्वत: अहिवासी एका उंच आसनावर लोडाला टेकून गादीवर बसत. त्यांचा पेहराव पूर्णत: भारतीय असे. ते फेटा, लांब कोट, धोतर आणि साध्या वहाणा वापरीत. अधूनमधून खादीची टोपीही घालत. चित्रकार शंकर पळशीकर आपल्या या गुरूंबद्दल लिहितात, ‘‘अहिवासींच्या वागण्या-बोलण्यात नेहमीच लय जाणवे आणि ती आम्हांला स्पर्श करून जाई. ते करेक्शन देऊ लागले की ती लय त्यांच्या रेषेतून झरत असे. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचे रंग मात्र मर्यादित असत. पण अगदी थोडे रंग वापरूनही जास्तीतजास्त उत्कटता आणि लावण्य चित्रात आणण्यात त्यांचा हातखंडा होता.’’

१९३६ मध्ये सॉलोमन निवृत्त झाले आणि जेरार्ड हे जे.जे. स्कूलचे प्रमुख झाले. त्यांचा ओढा पाश्‍चिमात्य जगातील कला चळवळी व आधुनिकतेकडे होता. भारतीय पारंपरिक पद्धतीची कलामूल्ये व आधुनिक कलामूल्ये यांच्या भूमिकेतील मतभेदामुळे जेरार्ड व अहिवासींचे मतभेद झाले. परंतु त्यांचा हा वर्ग मात्र सुरूच राहिला.

भारतातील कलाजगत त्या काळात झपाट्याने बदलत होते. १९४० ते ५० या काळातील विद्यार्थी त्यांच्या या कर्मठ व पारंपरिक भूमिकेशी सहमत नव्हते; तरीही ते आदर ठेवून गप्प बसत. पण पुढील काळात मात्र १९५० च्या दरम्यान सूझा, तय्यब मेहता, बाबूराव सडवेलकर अशा काही विद्यार्थ्यांनी अहिवासींच्या कॉम्पोझिशनच्या वर्गात बसण्याचे नाकारले व परिणामी त्यांची वेगळी व्यवस्था करावी लागली. आपण चालविलेला भारतीय शैलीचा हा वर्ग फार दिवस जगेल की नाही अशी शंका अहिवासींना जेरार्ड संचालक झाल्यापासून सतावतच होती. पण १९५६ मध्ये अहिवासी निवृत्त होईपर्यंत तो वर्ग सुरू राहिला व त्यांच्या निवृत्तीनंतर त्या वेळचे प्राचार्य जे.डी. गोंधळेकर यांनी तो बंद केला. त्या वेळी ‘आता तर भारतीय परंपरेची मुळेच  उखडली गेली’, असा विषाद अहिवासींना सेवानिवृत्तीनंतरही वाटला व तो त्यांनी अनेकांजवळ व्यक्त केला होता.

जे.जे.मधून निवृत्त झाल्यानंतर अहिवासींना बनारस विद्यापीठात आमंत्रित करण्यात आले. तेथे त्यांनी विभागप्रमुख म्हणून १९५७ ते १९६६ या काळात काम केले. जे.जे.त असताना मुंबईत त्यांचा फार मोठा मित्रपरिवार होता व त्या काळचे कलासमीक्षक कन्हय्यालाल वकील आणि तत्कालीन पत्रकार डॉ. डी. जी. व्यास यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. परंतु या दोघा विचारवंतांच्या परंपरावादी दृष्टिकोनाचा अहिवासींवर प्रभाव होता. त्यामुळे ‘अहिवासींच्या वैचारिक व कलाविषयक भूमिकेत काळाच्या पावलाबरोबर जी उत्क्रांती व्हायला हवी होती, ती होऊ शकली नाही. परिणामी, त्यांचे निर्मितीचे क्षेत्रही फार मर्यादित राहिले,’ असे आपले मत चित्रकार पळशीकर यांनी अहिवासींच्या मृत्यूनंतरच्या एका लेखात नोंदविले आहे.

अहिवासींनी अंजिठा, वेरूळ, घारापुरी, बाघ, बदामी, सित्तनवसल येथे भेटी देऊन तेथील भित्तिचित्रांचा अभ्यास केला होता. यामुळेच दिल्लीच्या ललित कला अकादमीने बदामी व सित्तनवसल येथील भित्तिचित्रांच्या प्रतिकृती करण्यासाठी त्यांना निमंत्रित केले. ही चित्रे इतकी अप्रतिम साकारली की अकादमीने १९५६ साली त्यांचा ‘विशेष सुवर्णपदक’ देऊन गौरव केला होता.

‘मीरेचा मेवाड त्याग’ या चित्रासाठी युनेस्कोच्या जागतिक चित्रप्रदर्शनात अहिवासी यांना प्रथम पुरस्कार मिळाला व भारत सरकारने हे चित्र खरेदी केले. त्याच दरम्यान चीन सरकारनेसुद्धा हे चित्र अहिवासींकडून नव्याने बनवून विकत घेतले होते. अहिवासींची अनेक चित्रे देशविदेशांत संग्रहित करण्यात आली असून ‘मेसेज’ व ‘माय फादर’ ही चित्रे मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात संग्रहित करण्यात आली आहेत. १९६१ मध्ये भारतीय शिल्प व चित्रांच्या रेखाटनांचे ‘रेखांजली’ हे अहिवासींचे पुस्तक जे.एम. नवलाखी आणि कंपनी, मुंबई यांनी प्रकाशित केले.

अहिवासी हे भारतीय शैलीचे चित्रकार म्हणून प्रसिद्ध असले तरी ते काव्य, संगीत व साहित्य या विषयांतही कार्यरत होते. अभिनव कला केंद्र या मुंबईतील संस्थेचे ते अध्यक्ष होते. याशिवाय त्यांनी जुनागढ व कोलकाता येथील गुजरात साहित्य संमेलनातील कलाविभागाचे अध्यक्ष म्हणून काम केले. ब्रजभाषेतील कीर्तन संग्रहाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले व मीरत येथील ब्रजभाषा संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. १९७१ मध्ये अहिवासींच्या निवडक बारा चित्रांचा संच ‘चित्रमंजूषा’ या नावाने प्रसिद्ध झाला होता.

- प्रा. सुभाष पवार, सुहास बहुळकर

संदर्भ
१. ग्लॅडस्टन सॉलोमन, डब्ल्यू.ई.;‘बॉम्बे रिव्हायव्हल ऑफ इंडियन आर्ट’; १९२४.

२. पळशीकर, शंकर; ‘सत्यकथा’; १९७४.

३. धोंड, प्रल्हाद अनंत;‘रापण’;मौज प्रकाशन;१९७९.
अहिवासी, जगन्नाथ मुरलीधर