लाड, पुरुषोत्तम मंगेश
पुरुषोत्तम मंगेश लाड यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या आजोळी सावंतवाडी येथे झाले. १९२२मध्ये मॅट्रिक परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळाल्या. मराठी व संस्कृत भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. बी.ए.च्या परीक्षेत अर्थशास्त्र आणि इतिहास या विषयांत ते सर्वप्रथम आले. १९२७मध्ये ते लंडन येथे गेले. तेथे त्यांनी परीक्षा दिल्या व ते अर्थशास्त्रज्ञ झाले. नंतर ते आय.सी.एस. उत्तीर्ण होऊन भारतात परत आले.
असिस्टंट कलेक्टर म्हणून सुरतमध्ये त्यांची नेमणूक झाली. नंतर अहमदनगर, धुळे, रत्नागिरी, ठाणे, बेळगाव, पुणे या ठिकाणी सत्र न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९३७मध्ये ते विलायतेला गेले व बॅरिस्टर होऊन भारतात परतले. नभोवाणी आणि माहिती मंत्र्यांनी त्यांना आपल्या खात्याचे सचिवपद दिले. त्यांनी आकाशवाणीच्या कार्यक्रमात खूपच सुधारणा घडवून आणल्या. कोकणी विभाग सुरू करून विविध कार्यक्रम करण्यात येऊ लागले. या कार्यक्रमांना साहित्यिक स्पर्श व्हावा, म्हणून त्यांनी प्रादेशिक सल्लागार मंडळाची नेमणूक केली. लाड यांनी साहित्यिक कारकिर्दीला सुरुवात केली व ‘प्रतिभा’ या लोकप्रिय नियतकालिकामधून ‘चिकित्सक एम.ए.’ या टोपण नावाने पुस्तक परीक्षण करीत लेख प्रसिद्ध केले. त्यांनी लिहिलेल्या सहा लेखांचा संग्रह ‘कृत्तिका’ या नावाने प्रकाशित झाला. ‘मधुपर्क’ या नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ते लिहीत असलेले संत तुकारामांचे समग्र चरित्र प्रकृति अस्वास्थ्यामुळे अपूर्णावस्थेतच राहिले. वयाच्या ५२व्या वर्षी मेंदूच्या विकारामुळे त्यांचे निधन झाले.
— संपादित