Skip to main content
x

भवाळकर, तारा चिंतामण

तारा चिंतामण भवाळकर या लोकसाहित्य, लोककला, नाट्यसंशोधन व नाट्यसमीक्षा या क्षेत्रांतील मान्यवर संशोधिका आहेत. १९६७साली मराठी साहित्य या विषयात एम.ए.ची पदवी संपादन केलेल्या भवाळकरांनी मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण (प्रारंभ ते १९२०)या विषयावर १९८२साली पीएच.डी. पदवी संपादन केली त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार प्राप्त झाला. ज्ञानक्षेत्राच्या ओढीतून त्यांनी अध्यापनाचा पेशा स्वीकारला. त्यांनी १९५७ ते १९७० या काळात माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून विद्यादानाचे कार्य केले. तसेच त्यांनी १९७० ते १९९९ या काळात सांगली येथील श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर अध्यापनाचे कार्य केले. विद्यावाचस्पती या पदवीसाठी त्यांनी मार्गदर्शक म्हणूनही काम केले. लोकसाहित्य क्षेत्रातील मान्यवर दुर्गा भागवत आणि डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुरुस्थानी मानले. मराठी रंगभूमीचे पूर्वरंग शोधून लोकनागर रंगभूमीचे साक्षेपी संशोधन करणार्‍या अग्रगण्य संशोधकांत त्यांनी आपल्या लेखनाने स्वतंत्र ठसा उमटवला.

स्त्रीवादी साहित्यहा डॉ. तारा भवाळकर यांच्या चिंतनाचा  विषय आहे. त्यांची लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा’ (१९९०), ‘स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’ (१९९४), ‘मायवाटेचा मागोवालोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिमा’ (२००२) ही पुस्तके स्त्रीवादी दृष्टीकोनातून मराठी लोकसाहित्याचा अभ्यास करण्यार्‍यांसाठी मूल्यवान संदर्भ ग्रंथ ठरले आहेत.

लोकसाहित्य, लोककला आणि नाटक हा अभ्यासविषय असणार्‍या डॉ. भवाळकर यांनी १९७५साली राणीसाहेब रुसल्याया एकांकिकेचे लेखन केले. त्यानंतर मधुशालाया हरिवंशराय बच्चन यांच्या काव्याकृतीचा काव्यानुवाद त्यांनी केला. एकूण ३५ ग्रंथ त्यांच्या नावावर असून यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा’, ‘लोकनागर रंगभूमी’, ‘महामाया’, ‘मिथक आणि नाटक’, ‘मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद’, ‘लोकसंस्कृतीची शोधयात्रा’, ‘लोकांगण’, ‘मातीची रूपे’, ‘नाट्याचार्य खाडिलकर चरित्रहे त्यांचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ. लोकसाहित्याच्या अभ्यासदिशाहे त्यांचे पुस्तक लोकसाहित्याचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बहुमोल असेच आहे. लोकसाहित्यांतर्गत जानपद गीतातील स्त्रीचे सत्त्व आणि स्वत्व ताराबाईंनी आपल्या वैविध्यपूर्ण लेखणीतून प्रकट केले.

भवाळकरांनी आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे, परिसंवाद यांतून शोधनिबंध सादर केले. अनेक परिसंवादांचे अध्यक्षपद भूषवले. मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिरमध्ये २०११मध्ये आयोजित झालेल्या पहिल्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे बीजभाषण त्यांनी केले. अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे १९९१साली झालेल्या भारतीय समाज, संस्कृती आणि स्त्रीया विषयावरील चर्चासत्रात खास निमंत्रणावरून भाग घेऊन, त्यांनी भारतीय संस्कृतीतील स्त्री-प्रतिमा या विषयावर शोधनिबंध सादर केला. या निमित्ताने त्यांनी अमेरिका, इंग्लंड आदी राष्ट्रांचा दौरा केला.

मराठी वाङ्मयकोश, मराठी ग्रंथकोश, मराठी समाजविज्ञानकोश, मराठी विश्वकोश, शिल्पकार चरित्रकोश आदी महत्त्वाच्या कोशनिर्मितीत भवाळकर यांचा मोलाचा सहभाग आहे. विविध साहित्यसंमेलनांची अध्यक्षपदेही त्यांनी भूषवलेली असून त्यात इस्लामपूर- जागर साहित्य संमेलन, उचगाव (बेळगाव) महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलन, कारदगा-महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलन, अलिबाग (आवास)- कोंकण मराठी साहित्य परिषद, पहिले महिला साहित्य संमेलन, जळगाव सूर्योदय साहित्य संमेलन यांचा समावेश होतो. साहित्यविषयक उपक्रम आणि संस्थात्मक उपक्रम यांमध्येही डॉ. भवाळकर यांचा मोलाचा सहभाग असतो. अनेक मानसन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यात लोकसंचितया पुस्तकासाठी मिळालेला महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (१९९२), ‘अखिल भारतीय दलित साहित्य अ‍ॅकॅडमी’, दिल्ली या संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरववृत्ती (१९९४), विशेष कर्तृत्वात स्त्रीसाठी असलेला मंगल पुरस्कार’ (१९९५), ‘मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वादया पुस्तकासाठी श्री. ना. बनहट्टी पुरस्कार’ (१९९६) तसेच वि. म. गोखले पुरस्कार’ (१९९६), ‘माझीये जातीच्यापुस्तकाकरता वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव या संस्थेतर्फे विशेष वाङ्मय पुरस्कार, ‘मराठी नाटक : नव्या दिशा नवी वळणेसाठी वाङ्मय समीक्षा पुरस्कारआणि साहित्यप्रेमी भगिनी, पुणे तर्फे दिलेला कै. मालतीबाई दांडेकर जीवनगौरव  पुरस्कार’ (२००४) शरश्चंद्र चटोपाध्याय पुरस्कार, विशेष सन्मानवृत्ती: म. राज्य साहित्य संस्कृती मंडळ, ‘रत्नशारदा पुरस्कार’; सह्याद्री दूरदर्शन वाहिनी, निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, ‘गार्गीपुरस्कार; श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई, दे.भ. रत्नाप्पाअप्पा कुंभार स्मृतिमंच; ‘साहित्य रत्नपुरस्कार, सु.ल. गद्रे पुरस्कारआदीं सुमारे २९ पुरस्कारांचा समावेश आहे.

कर्नाटकातील यक्षगान, महाराष्ट्रातील दशावतार, लळीत, विष्णुदास भावे यांची नाटके, भागवत मेळे, लोककलांच्या शैलींचा वापर करून मराठी प्रायोगिक रंगभूमीवर आलेली प्रायोगिक नाटके या सर्व विषयांवरील डॉ. तारा भवाळकर यांचे लेखन लोकसाहित्य आणि लोक नागर रंगभूमी यांना नवे परिमाण देणारे आहे.

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

भवाळकर, तारा चिंतामण