Skip to main content
x

सुकथनकर, विष्णू सीताराम

     भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने आजवर साधलेले महत्तम संशोधनकार्य ज्या जगातील अखिल संस्कृताभ्यासकांना एकमताने दाद द्यावी लागली, ते म्हणजे भारताचे आर्ष लक्षश्लोकात्मक विराट आर्ष (सौत) महाकाव्य महाभारत याची तयार केलेली चिकित्सित आवृत्ती. वस्तुतः मुळात हे कार्य युरोपात व्हायचे, पण जागतिक महायुद्धामुळे युरोपखंड पेटला होता. अखेर हे कार्य महाराष्ट्रात विद्येच्या माहेरघरी पुण्यात १९१९ साली सुरू झाले. त्याची पूर्तता (प्रतीक अनुक्रमणिका व उपसंहार वगळता) झाली ती १९६६ साली, तत्कालीन राष्ट्रपती जगत्पंडित, तत्त्वज्ञ, वाग्वैद्य सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या शुभहस्ते. अगदी प्रथम मुख्य संपादक म्हणून प्रा. उद्गीकर यांनी या कामाचा श्रीगणेशा केला; पण १९२३ साली संस्थेचे पाचवे मानद सचिव विष्णू सीताराम सुकथनकरांनी प्रमुख व खर्‍याखुर्‍या अर्थाने (उद्गीकरांचा किरकोळ अपवाद वगळता) प्रमुख संपादक म्हणून कार्यधुरा स्वतःच्या मजबूत खांद्यावर घेतली. तेव्हा एकूण १,२५९ हस्तलिखिते (भारतातील, भारताबाहेरील, ताडपत्रांवर व भूर्जपत्रांवर, जुन्या कागदांवर विविध लिपींमध्ये लिहिलेली) पडताळून व त्याच्या जोडीला क्षेमेन्द्राची महाभारतकथामञ्जरी, यवद्वीपीय महाभारत संस्करण, पर्शियन भाषेत ‘रज्मनामा’ हा बदायुनीने अकबराच्या सांगण्यावरून महाभारताचा केलेला अनुवाद, तसेच विराटपर्वाचे गुजराथी भाषांतर साहाय्याला घेऊनच कोणते पाठ स्वीकारायचे, कोणते तळटिपात किंवा परिशिष्टात टिपायचे, चिकित्सित व ग्रह्य पाठांचे निकष कोणते, या सर्व बाबींचा साकल्याने, साक्षेपाने, सूक्ष्मतेने व सावधानतेने ऊहापोह करून सुकथनकर महाभारत महर्षींनी स्वतःचा महान ‘उपोद्घात’ (झीश्रिशसिाशरि) लिहिला. या उपोद्घातातील निकषांच्या आधारेच इतर पर्वसंपादकांनीही आपापल्या वाट्याला आलेल्या पर्वांच्या चिकित्सित आवृत्त्या तयार केल्या. सर्वांचा चिकित्साधर्म, धर्म एकच- ‘सुकथनकरं शरणं गच्छामि’. असे हे भगवान बुद्धसमान पाठचिकित्सा धर्मसंस्थापक विष्णुशास्त्री सीताराम सुकथनकर.

     विष्णू सुकथनकर यांचे शालेय शिक्षण मुंबईला, उच्च शिक्षण प्रथम इंग्लंडला ऑक्स्फर्ड विद्यापीठात, नंतर स्कॉटलंडला एडिम्बरा येथे व अखेरीस जर्मनीला बर्लिन येथे झाले. बर्लिनला सुकथनकरांना हाइन्रिश ल्युडर्ससारख्या प्रकांड चिकित्सक विद्वानाच्या बोधपर, आदर्श, अभ्यासपूर्ण व्याख्यानश्रवणाचा लाभ घडला. आपल्या शिष्यावर चिकित्सित आवृत्तीची जबाबदारी सोपवल्याविषयी हाइन्रिश ल्युड्र्सने समाधान व्यक्त केले. डॉ. मॉरित्स विन्टरनिटझ् यांनी इटलीत रोमला भरलेल्या पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेच्या अधिवेशनात आवेशाने व आग्रहाने महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीची आवश्यकता सांगितली होती. या झेकोस्लोव्हाकीय संस्कृत अभ्यासकाने पुढे लंडनला इंडिया ऑफिस लायब्ररीतील महाभारताची दक्षिण भारतातील हस्तलिखिते अभ्यासून स्वतःच्या चिकित्सक आवृत्तीची नमुनाप्रत तयार केली, तर तिकडे जर्मनीतील उपलब्ध महाभारताची हस्तलिखिते पडताळून बर्लिनच्या प्राध्यापक हाइन्रिश ल्युडर्स यांनी सुकथनकर यांच्या चिकित्सक आवृत्तीची नमुनाप्रत सिद्ध केली.

     भांडारकर संस्थेत उद्गीकरांनी विराटपर्वातील जरत्कारू आख्यानातील काही अंशाची चिकित्सित नमुनाप्रत तयार केली. ही प्रत छापून संस्थेतर्फे जगभरातील विद्वानांना त्यांच्या अभिप्रायांसाठी पाठवण्यात आली. सर्वांनी ‘हिरवा कंदील’ दाखवल्यावरच काम पुढे चालू झाले व लवकरच सुकथनकरांकडे सुपुर्द झाले.

     ‘भारत’ म्हणजे ‘महाभारत’ व महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे शिल्पकार म्हणजे वाग्वैद्य वि.सी. सुकथनकर हे एक सुनिश्चित समीकरण आहे.

     सुकथनकरांनी ‘न्यू इंडियन अ‍ॅन्टिक्विरी’ या संशोधन नियतकालिकात अनेक संशोधनपर लेख लिहिले. महाभारताखेरीज भासाच्या नाटकांसंबंधीही त्यांनी उत्तम संशोधन केले. स्वप्नवास्तवदत्तेची स्वतःची आवृत्तीही काढली.

     सन १९३४च्या आधी त्यांनी मुंबई विद्यापीठात विल्सन फिलॉलॉजिकल व्याख्यानमाला गुंफली. मुंबई विद्यापीठातच त्यांची महाभारताविषयीची ‘द मीनिंग ऑफ महाभारत’ ही दोन व्याख्याने झाली आणि  अखेरचे तिसरे त्यांच्या आकस्मिक निधनानंतर विद्यापीठात वाचले गेले. महाभारताचा आध्यात्मिक रूपकार्थ त्यांनी या व्याख्यानातून उलगडून दाखवला.

     सुकथनकर पाठनिर्धारणेबाबत स्वतः घालून दिलेल्या निकषांबाबत विलक्षण ठाम होते. आदिपर्वात ‘महाभारत’ या नामाचे निर्वचन देणारा एक श्लोक येतो. डॉ. मॉरित्स विन्टरनिट्झच्या (पुढे डॉ. म.अ. मेहेंदळे यांनीही हेच मत उचलून धरले.

श्लोक पुढीलप्रमाणेे ः-

      महत्वाभ्दारवत्त्वाच्च (सुकथनकर स्वीकृत पाठ, तर विन्टरनिट्झ-मेहेंदळे संमत पाठ भारतत्त्वाच्च) महाभारतमुच्यते।

अर्थात चिकित्सा-औदर्याने सुकथनकरांनी स्वगृहित पाठाखालीही अनिश्चितता निदर्शक गोमूत्र रेखा काढली आहे. 

      शं. बा. जोशी यांनी एका लेखात असे प्रतिपादन केले आहे की, पाठचिकित्सा शास्त्राची धारदार कातरी लावून आयुष्यभर सुकथनकरांनी ज्या लोकप्रसिद्ध (र्तीश्रसरींश) महाभारत आवृत्तीची प्रचंड काटछाट केली, ती त्यांची त्यांनाच आयुष्याच्या अखेरच्या काळात काहीशी पटेनाशी झाली. केवळ एवढेच नव्हे, तर स्वतःच्या ‘उपोद्घाता’त (झीश्रिशसिााशरि मध्ये) स्वीकारलेले चिकित्सित पाठ संहिता शास्त्राचे निकषदेखील त्यांना निर्दोष वाटेनासे झाले होते.

     सुकथनकरांच्या चिकित्सक वृत्तीची प्रशंसा करणारे त्याच तोलामोलाचे एक पंडित म्हणजे वाग्वैद्य दामोदर धर्मानंद कोसंबी. सुकथनकर मृत्युशय्येवर असताना या आपल्या मुमुर्षू प्रिय पंडित मित्राला भेटायला कोसंबी गेले. आसन्नमरण सुहृदाला थोडेसे खुलवावे म्हणून गमतीने ते म्हणाले, ‘‘सुकथनकर, आयुष्यभर तुम्ही मूळ महाभारताच्या फेररचनेत गुंग होतात. समजा, मी म्हणतो उद्या मध्य आशियात तुर्फान प्रांतात तुमच्या संग्रही असलेल्या जुन्यातल्या जुन्या पोथीपेक्षाही अधिक जुनी पोथी तुम्हाला कोणी आणून दिली, तर मला सांगा की, तुम्ही उभी केलेली चिकित्सित प्रत या पोथीच्या तुलनेत नेमकी कोठे बसेल?’’ सुकथनकरांना विनोदबुद्धी अंमळ कमीच होती. ही गंमत आहे, हे न लक्षात घेता त्यांनी प्रतिप्रश्‍न केला, ‘‘दामोदरजी, माझ्या संग्रहातील जुन्यात जुन्या पोथीहूनही अलीकडची म्हणजे त्या उत्प्रेक्षित पोथीचा काळ काय?’’ कोसंबी म्हणाले, ‘‘समजा, इ.स. तिसरे शतक, गुप्त-युग!’’ ‘‘तर मग, दामोदरजी मी तुम्हाला निक्षून सांगतो की, माझी चिकित्सित प्रत व ही पोथी तंतोतंत सारखीच असेल. केवळ काही शब्द ज्यांच्या खाली मी नागमोडी रेघ काढली आहे, ते सोडून.’’ काय हा संशोधकाचा आत्मविश्वास? दा.ध. कोसंबींच्या डोळ्यात पाणी आले.

    सुकथनकरांच्या निधनाने व्यथित झालेले, सभापर्वाची चिकित्सत आवृत्ती संपादणारे अमेरिकेतील येल (धरश्रश) विद्यापीठातील वाग्वैद्य प्रा. फ्रँकलिन एजर्टन यांनी विशेषपत्र लिहूनच (अइजठख. तश्रि. २४, १९४८ झ. १३६) आपला सुकथनकरांविषयीचा ऋणनिर्देश व्यक्त केला, तर कृष्णमूर्तीशास्त्रींनी संस्कृतात ‘शोकोद्गार:’ या शीर्षकाखाली सुकथनकरांना मानवंदना सादर केली.

डॉ. मो.गो. धडफळे

सुकथनकर, विष्णू सीताराम