Skip to main content
x

भट, गोविंद केशव

सिक संस्कृत पंडित व मराठी, इंग्लिश आणि संस्कृत या तीनही भाषांतील ललित वाङ्मयाचे व नाट्यवाङ्मयाचे चिकित्सक अभ्यासक असलेल्या गोविंद केशव भट यांचा जन्म नाशिक येथे झाला. इंटर आटर्सला तर्कशास्त्रातील व बी.ए.ला मुंबई विद्यापीठातील सर्व पुरस्कार व शिष्यवृत्त्या त्यांना मिळाल्या होत्या. एम.ए.नंतर महाराष्ट्रामधील व गुजरातमधील विविध सरकारी महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांनी १९७२सालापर्यंत काम केले. निवृत्तीनंतर १९७९सालापर्यंत त्यांनी पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे क्युरेटर व संचालक म्हणून काम केले.

डॉ. भट यांचा पीएच.डी.चा प्रबंध भासाच्या नाटकांविषयी आहे. भरतमुनींचे नाट्यशास्त्र, नाट्याचे विविध पैलू, भास, कालिदास, शूद्रकाची अभिजात नाटके हे त्यांच्या चिंतनाचे व लेखनाचे प्रमुख विषय होते. त्यांच्या सुमारे ३० ग्रंथांपैकी निम्म्याहून अधिक याच विषयांसंबंधी आहेत.

संस्कृत नाट्यातील विदूषकावर त्यांनी संशोधनात्मक निबंध लिहिला होता. त्याला मुंबई विद्यापीठाचे व्ही. एन. मंडलिक सुवर्णपदक मिळाले होते. हा निबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्यावर १९६०मध्ये त्याला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. मुळात इंग्लिशमध्ये असलेल्या या पुस्तकाचे मराठीत व हिंदीत भाषांतर झाले.

मालविकाग्निमित्र, मुद्राराक्षस, उत्तररामचरित व स्वप्नवासवदत्त, वेणीसंहार या नाटकांचे त्यांनी संपादन केले आहे. तर मृच्छकटिक या नाटकाची विस्तृत प्रस्तावना (Preface to Mricchakatika) लिहिली आहे. भास स्टडीज् व भासाच्या एकांकिका ही त्यांची पुस्तके अत्यंत वाचनीय आहेत.

भट यांचे Tragedy and Sanskrit Drama, Sanskrit Drama- a perspective in theary and practice, Theatrical aspects od Sanskrit drama, Bharat Natya Manjiri आणि Natya-Manajri Saurabha ही इंग्लिश पुस्तके नाट्याच्या विविध अंगांची ओळख करून देतात.

भरताच्या रंगमंचानुसार नेपथ्य करून मुद्राराक्षस नाटकाचे प्रयोग श्रीमती विजयाबाई मेहता यांनी मराठी व जर्मन भाषेत केले होते. त्या वेळी भरताच्या रंगमंचाविषयी व सादरीकरणाविषयी विजयाबाई डॉ. भटांशी चर्चा करत असत. ते संस्कृत नाट्याचे प्रगाढ अभ्यासक असल्याने त्यांच्याशी केलेल्या चर्चेचा विजयाबाईंना पुष्कळ फायदा झाला होता.

संस्कृत नाट्यसृष्टी, कालिदास दर्शन व संस्कृत नाटके आणि नाटककार ही त्यांची मराठी पुस्तके त्यांच्या रसिकतेची साक्ष देतात. संस्कृत काव्यशास्त्राची प्रस्तावना हे त्यांचे अत्यंत सुगम व उद्बोधक असे पुस्तक आहे.

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या विसर्जननाटकाचे डॉ. भटांनी माते तुला काय हवंयया नावाने मराठीत भाषांतर केले. आय.एन.टी.ने त्याची निर्मिती केली व नानासाहेब फाटक, दुर्गाबाई खोटे अशा प्रथितयश कलावंतांनी त्यात काम केले होते. त्याचा पहिला प्रयोग बिर्ला मातोश्री सभागृहात, प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर करून केला गेला होता. त्यांच्या गृहदाहया नाटकाला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या नावे परक्याचे धनहे नाटक, ‘पानगळविदिशाहे कथासंग्रह व प्रणय’  ही कादंबरीसुद्धा आहे. विदूषकांवरील लेखांचे त्यांचे वेडगावचे शहाणे हे पुस्तकही वाचनीय आहे. संस्कृत नाट्य, संस्कृत काव्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र अशा विविध विषयांवर ते व्याख्याने देत. त्यांचे वक्तृत्व प्रसन्न व प्रवाही होते. तसेच आपले साहित्यचिंतन श्रोत्यांच्या मनात संक्रांत करण्याचे त्यांचे सामर्थ्यही अलौकिक होते.

डॉ. वीणा लोंढे

भट, गोविंद केशव