Skip to main content
x

भागवत, दुर्गा नारायण

लेखिका म्हणून दुर्गाबाई भागवतांचे योगदान विलक्षण ताकदीचे आहे. त्यांच्या लेखनातून दिसतो तो त्यांचा चिंतनशील व्यासंग, भावगर्भ, लालित्यपूर्ण भाषेचे सौंदर्य, वाचकाला खिळवून ठेवणारी नादमधुर प्रसन्न शैली आणि वाचकाला विचारप्रवृत्त करणारे त्यांचे विषय ही बाईंच्या साहित्यातील त्यांची वैशिष्ट्ये त्यांच्या प्राच्यविद्या क्षेत्रातील लेखनातही दिसून येतात.

जीवनाबद्दलची निस्सीम उत्सुकता आणि ज्ञानाचा असीम ध्यास यांतूनच दुर्गाबाईंचे लेखन समृद्ध होत गेले. संस्कृत आणि इंग्रजी या विषयांत त्यांनी बी.ए.ची पदवी प्रथम वर्गात मिळवली. बी.ए.चा अभ्यास करताना त्यांनी शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्याचा अभ्यास केला होता. त्यामध्ये शंकराचार्यांनी म्हटले होते, की व्यावहारिक आणि पारमार्थिक असे सत्याचे दोन प्रकार असतात. व्यावहारिक पातळीवर ईश्वराचे अस्तित्व असते; परंतु अंतिम अशा पारमार्थिक पातळीवर ईश्वर असा कोणी नसतोच, तिथे असते ते फक्त ब्रह्मज्ञान. हे वाचून बाईंनी शंकराचार्यांच्या आधीच्या बौद्धधर्माचा अभ्यास करण्याचे ठरविले. पण काही तांत्रिक कारणांमुळे बाईंनी अभ्यास केला तो अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडेन्सया विषयाचा. मूळ पाली, संस्कृत आणि अर्धमागधी भाषांतील ग्रंथ वाचून बाईंनी हा प्रबंध पूर्ण केला. तो तपासण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाकडे पाठविण्यात आला. तेथील बौद्धधर्माचे विद्वान जाणकार डॉ. इ.जे. थॉमस, महाबोधि सोसायटी आणि जपानी बौद्ध भिक्षूंनीही या प्रबंधाचे भरभरून कौतुक केले. हा प्रबंध प्रसिद्ध करण्यासाठी थॉमस यांनी शिफारस करून अनुदानही दिले होते. या प्रबंधामध्ये बाईंनी बुद्धपूर्व काळातील संन्याशांच्या जीवनाचा आढावा घेऊन, बौद्धभिक्षूंच्या आचारविचारांसाठी गौतम बुद्धाने घालून दिलेले यमनियम, अपराधांचे स्वरूप, त्यासाठीच्या शिक्षा यांचे विवरण केले. त्याचबरोबर बौद्धसंघाची जडणघडण, कामकाज, बौद्धधर्माची हिंदू आणि जैन धर्मियांचे आचारविचार, कायदे, शिक्षा यांची तौलनिक चर्चा केली. बाईंनी दाखवून दिले आहे, की गौतम बुद्धाने घालून दिलेले कायदे, शिक्षा यांबद्दलच्या विचारांचा आवाका आणि काटेकोरपणा, हिंदुधर्मातील स्मृती, धर्मसूत्रांमध्येदेखील आढळत नाही. पण त्याच वेळी हेदेखील दाखवून दिले, की बुद्धाच्या करुणा, दयावृत्ती पितृसत्ताक संस्कृतीचा प्रभाव कमी करू शकल्या नाहीत.

बौद्ध संघातील भिक्षुणींचे स्थान अत्यंत दुय्यम होते, अपमानास्पद होते. त्यांना होणार्‍या शिक्षा या भिक्षुकांना होणार्‍या शिक्षांपेक्षा फार कठोर होत्या. यानंतर बाईंनी पीएच.डी.साठी सिन्थेसिस ऑफ हिन्दू अ‍ॅण्ड ट्रायबल कल्चर ऑफ सेन्ट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडियाहा विषय निवडला. अभ्यासासाठी त्यांना विद्यापीठाकडून अनुदानही मिळाले. संशोधनासाठी मध्यप्रदेशातील दुर्गम भागातील आदिवासींच्या जीवनशैलीची माहिती मिळवायला गेल्या असता त्यांनी विषारी सुरण खाल्ले आणि बाई ७-८ वर्षे अंथरुणाला खिळून राहिल्या होत्या. बाईंचे मार्गदर्शक डॉ. धुर्ये यांनी बाईंना डॉक्टरेट द्यायला नकार दिला. अनुदानाचे पैसेही बाईंच्या वडिलांनी परत केले. या विषयाचा बाईंचा अभ्यास मात्र भक्कम झालेला होता.

ललित लेखनाबरोबरच बाईंनी प्राच्यविद्येच्या संदर्भात, इंग्रजी, मराठीमधून महत्त्वाचे लेखन केले, त्याला बाईंच्या या दोन्ही संशोधनांचा भक्कम पाया होता. भारतीय प्राचीन वाङ्मयातील लोककथा, प्रेमकथा, शृंगारकथा, कूट-कोडी, एकेश्वरवाद, सम्राट अशोककालीन आणि त्यानंतरच्या काळातील ब्राह्मीलिपीतील एकेश्वरमतवाद, मध्यप्रदेशातील आदिवासींची दैवते, सणवार, परंपरा, नृत्य, संगीत, लोकसाहित्य, काव्य, अशा अनेक विषयांवर भरपूर लेखन केले. मूळ संस्कृत, पाली भाषेतून त्यांनी बौद्धांच्या जातककथांचे मराठीत भाषांतर केले. सिद्धार्थ जातकाच्या चारही खंडांचे मराठीत भाषांतर केले. या सगळ्याच लेखनाला बाईंच्या एम.ए. आणि पीएच.डी.साठी केलेला संशोधन-अभ्यासाचा बळकट आधार होता. हे लेखन सुबोध आणि आकर्षक झाले आहे. बाईंचे हे लेखन म्हणजे पुढील कित्येक पिढ्यांसाठी अमूल्य असा ठेवा आहे.

डॉ. प्रतिभा रानडे

भागवत, दुर्गा नारायण