Skip to main content
x

देशपांडे, यशवंत खुशाल

विदर्भातील महानुभाव पंथाचे संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पाहपळला झाला. घरी मालगुजारी होती. परंतु, जेमतेम गुजराण होईल असे उत्पन्न होते. नवीन बाळ जन्माला आले म्हणून आनंद मानण्याइतकी सुबत्तेच्या काळातही परिस्थिती नव्हती. त्यांचे वडील सबरजिस्ट्रार झाल्याची बातमी प्राप्त झाली, म्हणून बाळाचे नाव यशवंतठेवण्यात आले. यशवंत चौथीत असताना शाळा खात्याचे संचालक शाळा तपासावयास आले. त्यांनी प्रत्येकाला तू परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काय करणार?’ असा प्रश्न विचारला, तेव्हा यशवंत याने ‘‘परीक्षा झाल्यानंतर मी पुढे मोठी पुस्तके लिहिणार,’’ असे उत्तर दिले. त्या वेळी संचालकांनी त्याच्या पाठीवर थाप मारून शाबासकी दिली. तेव्हापासून त्यांना लिहिण्याचे वेड लागले. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी शारदेला गणेश पद्यावलीहे सुंदरसे पिंपळपान वाहिले.

त्यांच्या आयुष्यात तीन व्यक्तींनी त्यांना विशेष प्रभावित केले. यवतमाळजवळ असणार्‍या पिंपळगावचे रोहिले साधू, उनकेश्वराचे ब्रह्मचारी बुवा व धनज माणिकवाडा येथील वडांच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले तपस्वी.

गावात कॉलर्‍याची साथ पसरली. गावातील लोक पटापट मरू लागले, तेव्हा बाबांनी साथ निघून जाईल असे सांगितले. तेव्हा योगायोग म्हणा, सर्व व्यवस्थित झाले. तेव्हापासून या बाबांवर त्यांची निष्ठा बसली. थोडक्यात, त्यांचा पिंड धार्मिक, श्रद्धाळू होता. त्यांनी हायस्कूलचे शिक्षण अमरावतीला पूर्ण केले. डॉ. केतकर त्यांचे सहाध्यायी होते. दोघांनाही शिष्यवृत्ती मिळाली.

दोघेही मराठीचे स्कॉलर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे गणेश पद्यावलीहे पुस्तक डॉ. केतकरांच्या पुढाकाराने प्रकाशित झाले. डॉ. देशपांडे यांनी नाट्यलेखनही केले. त्यांनी भारत भूछलसत्यप्रभाही संगीत नाटके लिहिली. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये शिक्षणासाठी दाखल झाले. त्याही ठिकाणी डॉ. केतकर त्यांच्याबरोबर शिक्षण घेत होते.

डॉ. य.खु. देशपांडे बी.ए. करत असताना होळकरांची थैलीहे ऐतिहासिक बखरीवजा पुस्तक त्यांना खडी धामणीयेथील कुळकर्णी यांच्या दप्तरात मिळाले. राजवाड्यांनी हे इतिहास साधनांच्या तिसर्‍या खंडात प्रकाशित केलेले आहे; परंतु ते अपूर्ण होते. यशवंतरावांना हे पुस्तक पूर्णरूपात मिळाल्यामुळे आपणही राजवाड्यांप्रमाणे संशोधनकार्य करावे हा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर वामन कवीची एक महत्त्वाची पोथी त्यांना उपलब्ध झाली. अशा प्रकारे ऐतिहासिक संशोधन क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले.

माझी शांतीहे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर यशवंतराव हे खेर यांच्या वडिलांकडे गेले, तेव्हा त्यांनी यशवंतरावांना सल्ला दिला, की प्रणयप्रधान कादंबर्‍या लिहिण्यापेक्षा भारदस्त विषयावर लिहाल तर देशाला फायदा होईल. माझी शांतीप्रणयप्रधान कादंबरी असली, तरी अभिरुचीस बाधक असे यात काहीही नव्हते. तरीपण खेरांचा विचार त्यांना मननीय वाटला. त्यांनी एम.ए., एलएल.बी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते यवतमाळला आले. त्यांची वकिली करण्याची इच्छा होती; परंतु त्यांचे चुलतबंधू, ज्यांनी त्यांच्या शिक्षणाला मदत केली, त्यांचे मत नोकरी करावे असे होते. त्या वेळी त्यांच्याकडे अनेक शिफारसपत्रे होती, त्यामुळे त्यांना सहजतेने नोकरी मिळाली असती; परंतु वकिलीसारखा स्वतंत्र व्यवसाय करून वाङ्मयीन सेवा करता येईल असे त्यांचे मत होते.

१९०८ मध्ये त्यांनी यवतमाळच्या बारमध्ये प्रवेश केला. त्या वेळी बारमध्ये केवळ बारा वकील होते. वकिली व्यवसायात त्यांचा सुरुवातीला चांगला जम बसला. जवळपास पंधरा वर्षे वकिली व्यवसायाबरोबरच त्यांनी संशोधन व सार्वजनिक चळवळीतही भाग घेतला.

ते यवतमाळच्या राष्ट्रीय शाळेच्या कार्यकारी मंडळात सामील झाले. त्यांनी सरकारनिर्मित बँकेचे कार्यवाह, तालुका बोर्डाचे अध्यक्ष तसेच वि. सा. संघाचे अक्ष्यक्ष म्हणून काम केले. थिऑसॉफिकल सोसायटीचे ते बरेच वर्षे अध्यक्ष होते. थिऑसॉफीच्या अभ्यासामुळे इतर धर्मांतील चांगली तत्त्वे मूळची धार्मिक वृत्ती न सोडता त्यांनी स्वीकारली. त्यांनी राजगृह पावापुरी, शिरपूर, एलिचपूर, भांदक, पावागड येथील जैनांचे प्राचीन अवशेष अवलोकन करून त्यांवर संशोधनपर लेख लिहिले. त्याचप्रमाणे, वर्‍हाडात व मध्यप्रांतात बुद्धाचे जे प्राचीन अवशेष होते, त्यांचे अवलोकन करून त्यांनी लेखमाला सुरू केली. यासाठी ते बुद्धगया, नालंदा, राजगृह व सारनाथ या ठिकाणी गेले. महानुभव पंथासंबंधी त्यांनी चक्रधराचा वेदया विषयावर लिखाण करण्यासाठी माहूर, पेशावर, रिधपूर, रावळपिंडी, हरिपूर येथील मंदिरांत जाऊन तेथील महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा केली. इस्लाम धर्मातील व समाजातील ऐतिहासिक पर्शियन सनदा, परगण्याचे हिशेब, मोगल इतिहासासंबंधी कागदपत्रे, युरोपमध्ये गेले असताना इस्लाम मशिदीचे पेशइमामा यांच्या विनंतीवरून त्यांनी लंडनमधील वोकिंगनावाच्या भागात मुहम्मदाच्या शिकवणीपासून आपल्याला काय घेता येणे शक्य आहे या विषयावर विद्वत्ताप्रचुर व सुश्राव्य भाषण केले. थिऑसॉफीमधील तत्त्वे आत्मसात केली असे नव्हे, तर ती प्रत्यक्ष आपल्या जीवनात त्यांनी उतरविली हेच वरील गोष्टीवरून स्पष्ट होते. डॉ. य.खु. देशपांडे यांनी कोणत्याही पक्षाचे पुढारीपण स्वीकारले नाही; परंतु राजकीय पुढार्‍यांच्या कार्याविषयी त्यांना नेहमीच आदर वाटत असे. १९१९ मध्ये लोकनायक बापूजी अणे, श्री भि.ह. जतकर व सदाशिवराव बल्लाळ यांनी लोकमतनावाचे राष्ट्रीय धोरणाचे मुखपत्र सुरू करण्याचे ठरविले व त्यासाठी निधी जमा करायचा होता. डॉ. देशपांडे हे जहालवादापासून दूर राहणारे व ताबडतोब त्या वेळी मोठी मदत देणे कठीण होते. त्यांनी ५००/ रुपयांची मदत केली; परंतु कधीही आपला या वृत्तपत्रात हिस्सा आहे याची वाच्यता केली नाही.

१९२० ते १९३५ या काळात त्यांचा संशोधनाकडे विशेष कल होता. त्यांना महानुभाव पंथीयांच्या पोथ्या चाळत असताना अतिशय महत्त्वाची पोथी सापडली; परंतु ती सांकेतिक भाषेत असल्यामुळे त्याचा उलगडा होत नव्हता. श्री. भावे यांच्या महाराष्ट्र सारस्वतया ग्रंथात दिलेल्या लिप्यांच्या आधारावर त्यांनी या पोथीचे वाचन करून महानुभाव पंथीयांचा हा पवित्र आद्यधर्मग्रंथ परिसिद्धान्त सूत्रपाठआहे हे कथन केले. यानंतर त्यांनी स्वत:ला महानुभाव साहित्य संशोधनात वाहून घेतले. माहूरचे महन्त दत्तलक्षराज यांचा जयवंतराव लोणकर यांच्या माध्यमातून परिचय झाला. यानंतर त्यांनी माहूर, चांदूर बाजार येथून, तसेच गोपीराजबुवा ऊर्फ महात्मा मुसाफिर यांनी पंजाबातील त्यांच्या प्रवासात बरोबर राहून त्यांना अनेक पोथ्या व ग्रंथ मिळवून दिले. यानंतर डॉ. य.खु. देशपांडे यांचे घर कृष्णवस्त्र धारण करणार्‍या संन्याशांनी फुलून जाऊ लागले. अनेकांना त्यांनी महानुभावपंथ स्वीकारला असे वाटले. १९२६ साली त्यांचा, बृहन्महाराष्ट्रात अपूर्व स्वागत झालेला महानुभावीय मराठी वाङ्मयहा ग्रंथ प्रकाशित झाला. याच वर्षी त्यांनी यवतमाळला शारदाश्रमनावाची संस्था स्थापन केली. त्यामार्फत ऋद्धिपूरवर्णन व विष्णुदासाची कविताभाग पहिला, हे  ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. १९२८ मध्ये शासनाने त्यांची हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशनचे नामनियुक्त (कोऑप्टेड) सदस्य म्हणून नेमणूक केली. इंडियन हिस्टरी कॉग्रेस व ओरिएंटल कॉन्फरन्स (प्राच्यविद्या परिषद) चे ते सदस्य होते. बहुतांश अधिवेशनांत त्यांची उपस्थिती होती.

बडोदा ओरिएंटल कॉन्फरन्समध्ये डॉ. देशपांडे यांनी र्इीववहळीीं अिींर्ळिींळींळशी ळि तळवरीलहर व त्रिवेन्द्रम येथील कॉन्फरन्समध्ये गरळि अिींर्ळिींळींळशी ळि अलिळरश्र र्ींळवरीलहर हे दोन महत्त्वाचे लेख वाचले. १९३५ ते १९५१ या काळात जी अखिल भारतीय इतिहास  परिषदेची अधिवेशने झाली, त्यांत डॉ. देशपांडे यांच्या संशोधन व्यासंगाची प्रभावी छाप पडली. अनेक संस्था व संशोधक विद्वान व्यक्तींशी त्यांचा संबंध आला व त्यांचा संशोधनविषयक दृष्टिकोण अधिकाधिक व्यापक होत गेला.

१९४१ साली डॉ. देशपांडे यांच्या प्रोत्साहनाने वर्‍हाड-मध्यप्रांत जैन संशोधन मंडळही संस्था अस्तित्वात आली. तिचे सल्लागार तेच होते. नागपूर विद्यापीठाने मराठी, हिन्दी, उर्दू  इत्यादी देशी भाषांचे माध्यम ठेवण्याबाबतचा विचार करणारी कमिटी नेमली. त्याचे सभासदत्व डॉ. देशपांडे यांनी स्वीकारले.

भारत इतिहास संशोधन मंडळ’, पुणे या संस्थेचे ते बरेच वर्षे सदस्य होते. डॉ. देशपांडे १९३८ मध्ये जागतिक प्राच्यविद्या परिषद, झ्यूरिच (स्वित्झर्लंड) येथील निमंत्रित प्रतिनिधी म्हणून शारदाश्रमातर्फे गेले. त्याच वेळी बु्रसेल्स (बेल्जियम) या ठिकाणी प्राच्यविद्या परिषदेचे अधिवेशन होते. या परिषदेत त्यांनी आपले संशोधनपर लेख वाचले. यानंतर ते लंडनला गेले. संस्कृतचे प्राध्यापक डॉ. बार्नेट, इंडिया ऑफिस लायब्ररीचे डायरेक्टर डॉ. रॅन्डेल यांच्या सूचनेवरून त्यांना रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनया संस्थेचे सदस्य करण्यात आले. त्यांच्या पूर्ण समारंभात त्यांनी ‘‘शारदाश्रम संस्थेने संशोधनरूपाने आजवर जी सेवा केली, तिचा हा गौरव आहे,’’ असे उद्गार काढले. ‘‘हा माझा सत्कार नसून शारदाश्रमचा आहे,’’ असे प्रांजळपणे कबूल केले. नागपूर विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्सः डी.लिट. ही बहुमानाची पदवी दिली.

१९४५ मध्ये नागपूर विद्यापीठात हस्तलिखित संग्रह करण्याची योजना डॉ. देशपांडे यांच्या प्रोत्साहनाने अस्तित्वात आली. त्यांनी वर्षभर विनावेतन, वर्‍हाड व त्याच्या बाहेर प्रवास करून सुमारे २००० हस्तलिखित ग्रंथ एकत्रित करून विद्यापीठाच्या स्वाधीन केले. त्यामुळे विद्यापीठात संशोधन वाङ्मयाच्या कार्याला चालना मिळाली. अखिल भारतीय इतिहास परिषदेने नागपूर राज्य १८१८ ते १८५८हा भाग डॉ. य.खु. देशपांडे यांच्याकडे सोपविला. तो लिहून त्यांनी १९४८ मध्ये संपादक मंडळाकडे पाठविला. वस्सगुल्ममाहात्म्यया संस्कृत ग्रंथाच्या आधारे हिंदू मंडळाला प्रिव्ही काउन्सेलिंगमध्ये महत्त्व प्राप्त झाले. त्याची विस्तृत प्रस्तावना त्यांचीच होती. वाशिम या ठिकाणी त्यांचा गौरव करण्यात आला. ग्वाल्हेर सरकारच्या सूचनेवरून डॉ. देशपांडे यांनी विक्रमादित्य व्दिसहस्राब्दी उत्सव ग्रंथासाठी विक्रमादित्य ऐतिहासिक की काल्पनिकहा उत्कृष्ट निबंध लिहिलेला होता. डॉ. देशपांडे यांना संस्कृत, हिंदी, उर्दू, फारशी, प्राकृत, अर्धमागधी अपभ्रंश भाषाज्ञान होते. यादवांनंतर ६०० वर्षे मुस्लिमांचा अंमल वर्‍हाडावर होता. त्यामुळे जुने कागदपत्र बहुतेक पर्शियन भाषेत होते. ही ऐतिहासिक कागदपत्रे त्यांनी शारदाश्रमात संकलित केली. त्यासाठी त्यांनी उर्दू व पर्शियन भाषेचा अभ्यास केला. त्यांनी युरोपात जाण्यापूर्वी फ्रेंच भाषेचा अभ्यास केलेला होता.

त्यांना पुढे सर्वांत जुने दोन शिलालेख वणी तालुक्यात कायर येथे सापडले. ते सातवाहनकालीन दुसर्‍या व तिसर्‍या शतकातील आहेत. एक संस्कृतात असून दुसरा प्राकृतात आहे. त्याची लिपी दुसर्‍या शतकातील ब्राह्मी लिपी आहे.

शारदाश्रमावर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. त्यासाठी त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले.  शारदाश्रमामधील ग्रंथसंपदा  घेऊन भटकंती करावी लागली, तरी त्यांचा संशोधनाचा ध्यास कमी झाला नाही.

त्यांनी या जगाचा निरोप घेतला; परंतु यवतमाळ येथील शारदाश्रम त्यांच्या प्रेरणास्रोत म्हणून आज अस्तित्वात आहे.

- प्रा. सी.बी. देशपांडे

संदर्भ
१.डॉ. हुड; ना.ना. ‘विदर्भ संशोधनाचा इतिहास’. ‘डॉ.य.खु. स्मृतिकण’; डॉ. यशवंत खुशाल देशपांडे यांच्या आठवणी.
देशपांडे, यशवंत खुशाल