कशाळकर, विष्णू अण्णाजी
अलाहाबाद येथे प्रयाग संगीत समितीची स्थापना करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या पं. विष्णू अण्णाजी कशाळकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. लहानपणी कोल्हापूरला अप्पय्याबुवा यांच्याकडे त्यांनी दीड-दोन वर्षे संगीताचे धडे घेतले. घरच्या परिस्थितीमुळे मुन्सफ न्यायालयात नोकरी केली. पण संगीत शिकण्याच्या प्रबळ इच्छेमुळे ते १९०५ साली लाहोरला, गांधर्व महाविद्यालयात दाखल झाले. गाण्याची मनापासून आवड असल्यामुळे विष्णूजींनी उत्तम पगाराची नोकरी सोडून प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. पटवर्धन यांच्या सल्ल्यानुसार पं.विष्णू दिगंबरांकडे लाहोर येथे जाऊन दहा वर्षे गाण्याची रीतसर तालीम घेतली. यासाठी काशीनाथपंत छत्रे यांनी आर्थिक मदतीचा हातभार लावला. त्यांना १९०५ ते १९१५ अशी दहा वर्षे विष्णू दिगंबर पलुस्करांकडून ग्वाल्हेर गायकीची तालीम मिळाली.
उत्तर भारतात संगीताचा प्रसार करण्यासाठी त्या काळी विष्णू दिगंबरांनी अनेक शिष्यांना वेगवेगळ्या गावांत पाठवले, त्यांत अलाहाबाद येथे संगीताचा प्रसार करण्याची जबाबदारी १९१५ साली, विष्णूजी कशाळकर यांच्याकडे सोपविली. मेजर रणजितसिंग यांनी स्थापन केलेल्या कायस्थ पाठशाला महाविद्यालयामध्ये पलुस्करांच्या प्रेरणेने संगीत शिक्षणाचे वर्ग सुरू झाले. विष्णूजी कशाळकर हे तिथे संगीत गुरू म्हणून रुजू झाले.
त्यांनी महाविद्यालयामध्ये जेव्हा सामुदायिक प्रार्थना सुरू केली, तेव्हा सर्व प्राध्यापक प्रार्थनेला हजर राहत असत. त्या काळात अलाहाबादमध्ये प्रतिष्ठाप्राप्त मान्यवरांना कशाळकरांचे शिकवण्याचे कसब आवडले. हळूहळू काही विद्यार्थ्यांनी शिकायला सुरुवात केली. विष्णूजींच्या शिस्तप्रिय, आदर्शवत वागणुकीमुळे त्यांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले. प्रा. सुरेंद्रनाथ देव व मुनशी कन्हैयालाल यांच्या सहकार्याने त्यांनी प्रयाग संगीत समितीची स्थापना केली.
एकदा खुद्द मोतीलालजी नेहरू त्यांचा गायनवर्ग बघायला आले. वर्गामधील व्यवस्था व वागणूक बघून त्यांनी आप्तेष्टांना संगीताच्या वर्गात जाण्यास प्रोत्साहन दिले. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता. विष्णू अण्णाजी कशाळकर यांनी बसवून घेतलेले राष्ट्रीय गीत १४ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य पूर्वसंध्येला दिल्ली नभोवाणी केंद्राहून प्रसारित करण्यात आले. त्यात कृष्णा हाथीसिंग आणि विजयालक्ष्मी पंडित यांनी सहभाग घेतला होता.
प्रयाग संगीत समिती ही संगीताच्या पदवी परीक्षा घेणारी संस्था स्थापन झाल्यानंतर तिला शासनाची मान्यता प्राप्त झाली. या समितीच्या स्थापनेचे ते मुख्य आधारस्तंभ होते. उच्चभ्रू समाजात संगीताला मान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी अलाहाबाद व नजीकच्या क्षेत्रात अनेक संगीत सभांचे आयोजन केले. त्या काळातल्या अनेक गायक-वादकांना त्यांनी आपली कला सादर करण्याची संधी दिली.
अशा सभा- समारंभांना त्यांनी सामाजिक, राजकीय आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून त्यांना भारतीय संगीताच्या उज्ज्वल परंपरेचा परिचय करून दिला, तसेच संगीतातील अनेक विषयांवर चर्चासत्रे आयोजित करून संगीताची शास्त्रीय माहिती अभ्यासकांना उपलब्ध करून दिली.
तत्कालीन वृत्तपत्रे व मासिकांमध्ये संगीत विषयावर लेख लिहून त्यांनी संगीताबद्दलचे जनमानसातील गैरसमज दूर केले. त्यांचे चिरंजीव शांताराम कशाळकर यांना हा संगीताचा वारसा लाभला आहे.