Skip to main content
x

पुसाळकर, अच्युतराव दत्तात्रेय

डॉ. अच्युतराव दत्तात्रेय पुसाळकर क्युरेटर - डायरेक्टर म्हणून मुंबईच्या भारतीय विद्या भवनातून निवृत्त होऊन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये दाखल झाले होते. याआधीचे क्युरेटर प्रा. गोडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने तेथे पुसाळकरांची नियुक्ती संस्थेने केली होती. अच्युत पुसाळकर यांचा जन्म डोंगर या रत्नागिरीतील कोकण - खेड्यात झाला. चार भावंडांत अच्युतरावांचा दुसरा क्रमांक होता. पुण्यातील स.प. महाविद्यालयातून १९२७ साली संस्कृत विषय घेऊन ते बी.ए. झाले. त्यातील विशेष प्रावीण्यामुळे त्यांना अनसूयापुरस्कार मिळाला. १९२९ साली ते मुंबईमधून एम.ए. झाले. त्यांना एम.आर जयकर मीमांसापुरस्कार मिळाला. मीमांसा विषयाच्या गोडीमुळे शि.प्र. मंडळीच्या मीमांसा विद्यालयात त्यांनी किंजवडेकर शास्त्री आणि कात्रे शास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने अध्ययन केले. डॉ. वि.स. सुखटणकर त्या वेळी भांडारकर संस्थेत महाभारताची चिकित्सक आवृत्ती संपादन करीत होते. त्यांच्याकडे अच्युतरावांनी भास ः ए स्टडीया विषयावर १९४१ साली पीएच.डी. प्राप्त केली. मधल्या काळात ते पुण्याच्या लॉ कॉलेजमधून एल.एल.बी. झाले; पण त्यांनी कोर्टाची पायरी चढून प्रॅक्टिस केली नाही.

अध्ययन व अध्यापनाचा छंद असलेल्या या विद्याव्रतीचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला. त्यांना मंडलीक गोल्डप्राइझ (मुंबई विद्यापीठ, १९३२), ‘भगवानलाल इंद्रजीप्राइझ (मुंबई विद्यापीठ, १९३४), ‘भारतीय विद्या भवन मुन्शीसुवर्णपदक (१९४४), ‘एशियाटिक सोसायटीरजत प्राइझ (१९५६) आणि १९७१ मध्ये राष्ट्रपतींकडून संस्कृत पंडितसन्मान आणि आजीवन विद्यावेतन लाभले.

भांडारकर इन्स्टिट्यूटच्या पदावर काम करण्यापूर्वी, १९३६-१९५९ असा प्रदीर्घ काळ ते मुंबईच्या भारतीय विद्या भवनचे सहसंचालक होते. याच काळात त्यांनी हिस्टरी अ‍ॅण्ड कल्चर ऑफ इंडियन पीपलया महान ग्रंथमालेचे लेखन व सहसंपादन केले. एकूण दहा खंडांपैकी पाच ते दहा हे खंड डॉ. पुसाळकरांचे लेखनकर्तृत्व मानायला हवे. भांडारकर संस्थेतील वास्तव्यात त्यांनी भारतीय पुराणांचा अभ्यास केला. तत्पूर्वी एपिक्स अ‍ॅण्ड पुराणजनावाचा मार्गदर्शक ग्रंथ, ‘भास ः ए स्टडीहा पीएच.डी.चा ग्रंथ, ‘हिस्टरी ऑफ बॉम्बे’, असे अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांच्या नावावर प्रसिद्ध झाले होते. डॉ. नम्बियार आणि डॉ. जी.के. पै हे पुराणावर पीएच.डी. करणारे त्यांचे अखेरचे दोन विद्यार्थी होत. एकीकडे लेखन, संशोधन, अध्यापन आणि प्रशासन असा कार्यभाग चालू असताना अ.भा. संस्थांच्या संचालक मंडळांवर ते मार्गदर्शक म्हणून काम करीत होते, त्यांमध्ये अ.भा. प्राच्यविद्या परिषद, हिस्टरी काँग्रेस, एशियाटिक सोसायटी, भारत इतिहास संशोधक मंडळ आणि पुण्यातील अन्य संस्कृत संस्थांशी त्यांचा निकटचा परिचय होता.

भांडारकर इन्स्टिट्यूटच्या निजाम अतिथिगृहात ते एकटेच राहत असत. त्या वेळी त्यांचे धाकटे बंधू, जे एक मोठे कारखानदार होते, त्यांचा पुण्यात बंगला होता. पण वानप्रस्थाश्रमी विद्वान, साधनेत गुंतल्यामुळे ते भांडारकर संस्थेतच राहत. सतत वाचन, रेडिओवरील बातम्यांतून जगाशी संपर्क, याव्यतिरिक्त अन्य काही छंद नव्हते. ते पुसाळकर कुटुंबात राहत नसले तरी रोजचा जेवणाचा डबा वहिनीकडून पोहोचता होत असे. पुण्यात राहून सभा, संमेलने, परिषदा, अध्यक्षपद अशा लौकिक जीवनापासून ते दूर असत.

चौघी भावंडे. वडिलांच्या मृत्यूनंतर मोठ्या बंधूंचे पाचगणीत निधन झाले, तेव्हा अच्युतरावांना कुटुंबाचा आधार व्हावे लागले. आईची इच्छा, त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारावा अशी होती; पण अच्युतरावांना संन्यास घेऊन रामकृष्ण परमहंसांच्या कार्यात जायचे होते. आईच्या आग्रहाखातर त्यांनी संन्यास घेतला नाही; पण त्यांनी वानप्रस्थीजीवन जगले आणि अध्ययन-अध्यापन हेच ध्येय मानले. भांडारकर संस्थेतील अध्ययन, अध्यापनात ते अग्रेसर होतेच; पण त्यांच्या काळात संस्थेत डॉ. राष्ट्रपती राधाकृष्णन, राष्ट्रपती झाकीर हुसेन येऊन गेले. अनेक मान्यवर विद्वान जेव्हा विदेशातून येत, त्या सर्वांचे स्वागत स्वतः पुसाळकर जातीने करीत. संस्थेतच राहत असल्याने त्यांच्या या कर्तव्याला वेळेचे मोजमाप नसे. आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळून निष्ठेने विद्याव्यासंग, वागण्यात एकटेपणा, सामूहिक जीवनाची आवड नाही, अशा वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे ते स्वरूप होते. त्यांनी १९६१ ते १९७२ अशी जवळजवळ बारा वर्षे संस्था सांभाळली. १९७३ साली मुंबईला परतल्यावर दुर्धर रोगाने झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. १९७४ साली दिल्लीचे महान विद्वान डॉ. सत्यव्रत शास्त्री यांनी डॉ. पुसाळकर स्मृतिग्रंथ संपादन करून त्यांच्या प्रचंड कार्याचे दर्शन घडवून दिले.

पुसाळकरांचे कर्तृत्व अबोल असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर डॉ. दांडेकरांनी, त्यांच्या बसण्याच्या जागी, एक मोठे छायाचित्र स्वखर्चाने लावले.

वा.ल. मंजूळ

पुसाळकर, अच्युतराव दत्तात्रेय