Skip to main content
x

हिरेमठ, शांतवीरय्या गदिगेया

          शांतवीरय्या गदिगेया हिरेमठ यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र त्यांच्या डोक्यावरून हरपले होते, त्यामुळे हिरेमठ यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. लहानपणापासून स्वावलंबी जीवन जगत, त्यांनी कष्ट करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ते फर्गसन महाविद्यालयामधून शासकीय इंजिनीअरींग कॉलेजमध्ये गेले. त्यांनी १९३७ साली मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी द्वितीय श्रेणीत प्राप्त केली.

          १९३८ साली राज्याच्या मेकॅनिकल विभागाची सुरुवात झाली, त्याचे हिरेमठ हे खर्‍या अर्थाने संस्थापक ठरले. ही संघटना त्यांनी अगदी छोट्या उपविभागापासून बांधून महाराष्ट्रभर पसरवली . याच विभागाने पुढे महाराष्ट्र राज्यात अनेक विकासाची कामे केली.

         नाशिक जवळील गंगापूर हे देशातील पहिले मातीचे धरण त्यांनी अवजड यंत्रसामग्री वापरून व स्थानिक अर्धशिक्षित तरुणांना हाताशी घेऊन पूर्ण केले. यानंतर लगेच त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती करून 'कोयना जलविद्युत प्रकल्पात' अवजल भुयार खोदण्याची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर सोपविली. हेही आव्हान त्यांनी स्वीकारून पाच वर्षात शासनाच्या विभागातर्फे या भुयाराचे काम कमी खर्चात करून शासनाचा आर्थिक फायदा करून दाखविला. कोयना प्रकल्पातील कामामुळे ते भारतभर प्रकाशझोतात आले. अशी यांत्रिकी संघटना विकसित केल्याबद्दल इतर राज्यांनी त्यांचे कौतुक करून त्यांचे मार्गदर्शन स्वीकारले.

          यानंतर १९५९ साली त्यांना यांत्रिकी मंडळ स्थापन करण्यास सरकारने पाचारण करून त्याची धुरा अधीक्षक अभियंता म्हणून त्यांच्या स्वाधीन केली. या यांत्रिकी मंडळाचे मुख्यालय पुण्यात होते. हिरेमठांनी त्यांच्या प्रशासकीय कुशलतेने महाराष्ट्र राज्यभर यंत्रणेचे जाळे पसरवले. दापोडी येथील शासकीय कर्मशाळेचा विकास मोठ्या प्रमाणात करून राज्यभर धरणासाठी लागणारे पोलादी दरवाजे व पोलादी वक्राकार झडपा तयार करण्याची सुसज्ज यंत्रणा व त्याबरोबरच तंत्रज्ञ तयार केले. अशा कर्मशाळा नांदेड व अकोले या ठिकाणीही बांधण्यात आल्या व त्या त्या विभागातील मशिनरींच्या दुरुस्तीचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. यांत्रिकी मंडळाचा विस्तार १९५९ ते १९६६ या सात वर्षात मोठ्या झपाट्याने झाला व कर्मचारी व तंत्रज्ञ यांची संख्या ३५०० पर्यंत पोहोचली. राज्यातील सर्व मातीची धरणे उदा.वीर (जिल्हा पुणे) मुळा, घोड, सिद्धेश्वर, येलदरी इत्यादी धरणे, बांधण्याचे काम अवजड यंत्रसामग्री वापरून यांत्रिकी मंडळाने करून दाखविली. मातीची धरणे, कोयना प्रकल्पातील अवजल भुयाराचे काम व राज्यातील धरणांसाठी बनविलेली पोलादी द्वारे व रेडियल गेटस ही हिरेमठ यांच्या जीवनातील सर्वोच्च कामगिरी होय. १९३८ साली छोट्या उपविभागापासून सुरू केलेल्या संघटनेची धुरा आपल्या द्वितीय अधिकार्‍याकडे १९६६ साली सोपवताना तिच्यात दोन यांत्रिकी मंडळे व १६ यांत्रिकी विभाग समाविष्ट होते.

          १९६६ साली ‘भारत फोर्ज’ कंपनीच्या फोर्जींगचा कारखाना उभारण्याचे काम चालले होते. त्या कपनीचे अध्यक्ष नीलकंठराव कल्याणी यांनीे हिरेमठ यांना आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. प्रदीर्घ तीस वर्षांच्या सेवेनंतर, निवृत्तीस ५ वर्षे अवकाश असतानाच हिरेमठ यांनी शासकीय सेवा सोडली आणि ‘भारत फोर्ज’ कंपनीत ते रुजू झाले. आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात केले. पुढे अल्पावधीत ही कंपनी भारतभर नावाजली गेली त्यात हिरेमठांचा सिंहाचा वाटा होता. परंतु याच सुमारास त्यांना अती श्रमामुळे हृदयविकाराचा त्रास झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भारत फोर्जमधील काही वर्षं  त्यांना मनाविरुद्ध काढावी  लागली. त्यानंतर १९७३ मध्ये अचानक त्यांना सिपोरेक्स इंडिया कंपनीचे प्रमुख बी.जी.शिर्के यांनी आपल्याकडे बोलावले. तिथे त्यांनी  जनरल मॅनेजर म्हणून कार्यभार स्वीकारला. पुढील १० वर्षे त्यांनी नेमाने उत्तम इंजिनीअरिंग कौशल्याने सिपोरेक्स कंपनीला परदेशांच्या नकाशावर विराजमान केले. मध्यपूर्वेत सौदी अरेबिया, इराक इत्यादी ठिकाणी निर्यात करून कंपनीने खूप नफा व नाव कमावले. उत्पादनाची व  निर्यातीची सर्व जबाबदारी हिरेमठांनी चोखपणे पार पाडली. अशा तऱ्हेने प्रकृतीची उत्तम तऱ्हेने काळजी घेत वयाच्या ७० वर्षापर्यंत ते सिपोरेक्समध्ये कार्यरत राहिले.

         स्वत:चा कारखाना असावा या हेतूने त्यांनी चिंकवे हा गाड्यांकरिता सुटे रबरी भाग बनविण्याचा कारखाना वयाच्या ७० व्या वर्षी विकत घेतला. त्यात कमालीची सुधारणाही केली. परंतु लघुउद्योगाचे अर्थशास्त्र सांभाळणे त्यांना त्या वयात जमले नाही. त्यांनी अकरा वर्षे अथक परिश्रम करून, कारखाना चालू ठेवून कामगारांचे हित जपले परंतु त्यावेळी कारखानदारीची वाईट वर्षे व अवास्तव व्याजदर या कारणांमुळे तो कारखाना १९९४ मध्ये विकून टाकण्याचा निर्णय त्यांंनी घेतला.

         त्यांना खेळांची आवड होती. क्रिकेट, टेनिस व बॅडमिंटन हे खेळ ते उत्तम खेळत. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. जगदीश हिरेमठ हे त्यांचे चिरंजीव आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ आहेत तर मोठे चिरंजीव मृत्युंजय पाटबंधारे खात्यात व महांतेश हे इंजिनिअरींगमध्ये डॉक्टरेट मिळवून उपग्रह निर्मिती व त्याचे अवकाशात प्रक्षेपण या क्षेत्रात अमेरिकेत नावाजलेले आहेत.

- मृत्युंजय हिरेमठ

हिरेमठ, शांतवीरय्या गदिगेया