Skip to main content
x

साळसकर, विजय सहदेव

          विजय सहदेव साळसकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव येथे झाला. त्यांनी मुंबई येथील दालमिया महाविद्यालयात बी.कॉम. व मुंबई विद्यापीठातून एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना सायकल चालवण्याचे वेड होते. त्यांनी सायकलने मुंबई-गोवा, मुंबई-दिल्लीपर्यंत प्रवासही केला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच वर्षे त्यांनी ‘न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी’त मासिक ७५० रु. पगारावर नोकरी केली.

         गुन्हेगारी जगाबद्दल मुळातच चीड असल्यामुळे १९८३ मध्ये ते पोलीस दलात रुजू  झाले. १९८३ मध्ये  साळसकर यांनी नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले.

         विजय साळसकर हे मुंबई पोलीस दलात ‘एन्काउण्टर स्पेशलिस्ट’ या नावाने ओळखले जायचे. त्यांनी आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे पंचाहत्तरहून अधिक गुंडांना ठार केले होते. दि. २६ नोव्हेंबर  २००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते दहशतवाद्यांचा सामना करत असताना धारातीर्थी पडले. विजय साळसकर यांना त्यांची देशभक्ती व शौर्याबद्दल मरणोत्तर ‘अशोकचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. विजय साळसकर यांनी १९८३ मध्ये राजू शहाबुद्दीन याचा पहिला एन्काउण्टर केला. त्याच्यावर बलात्कार व खुनाचे अनेक आरोप होते. त्यांना या शौर्याबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ देण्यात आले होते. त्यानंतर साळसकरांनी आपल्या कारकिर्दीत अमर नाईक, जग्गू शेट्टी, साधू शेट्टी, कुंदनसिंग रावत, झाहूर रमाखंडा अशा कुविख्यात गुंडांना तसेच अरुण गवळीच्या टोळीतील अनेक गुंडांना ठार केले. अखेरच्या काळात ते मुंबई पोलीस दलात खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख होते.

- शैलेश राजपूत

साळसकर, विजय सहदेव