Skip to main content
x

सोमण, दत्तात्रेय शंकर

        त्तात्रेय शंकर सोमण यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील नूतन मराठी शाळेत झाले, तर इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथीलच न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले.त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. १९४५ मध्ये त्यांच्या वडिलांची बदली सोलापूर येथे झाल्यामुळे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथील हरिभाई देवकरण प्रशाला येथे झाले. १९४७ मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर इंटरआर्टस्पर्यंत सोलापूरच्या डी.ए.व्ही. महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले. पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बी.ए. आणि एम.ए.ची पदवी घेतली.

       शिक्षण घेत असतानाच दत्तात्रेय सोमण यांनी नोकरीदेखील केली. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ सार्वजनिक बांधकाम खात्यात लिपिक म्हणून काम केले. बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सोमण यांनी पुणे येथील कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले, त्या वेळी ते एम.ए.चा अभ्यास करत होते.

         १९५३ मध्ये ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची भारतीय पोलीस सेवेमध्ये निवड झाली. ऑक्टोबर १९५३ मध्ये ते माउण्ट अबू येथील केंद्रीय पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी दाखल झाले. प्रशिक्षणानंतर दत्तात्रेय सोमण यांची प्रथम नियुक्ती त्या वेळच्या मुंबई राज्यात सूरत येथे झाली. येथे सहा महिने पोलीस खात्याची माहिती घेतल्यावर नवसारी येथे त्यांची स्वतंत्र नेमणूक साहाय्यक पोलीस अधीक्षक या पदावर करण्यात आली.

        ऑगस्ट १९५७ मध्ये सोमण यांची नियुक्ती परभणी जिल्ह्यात साहाय्यक पोलीस अधीक्षक (ए.सी.पी.) या पदावर करण्यात आली. तेथून ऑगस्ट महिन्यात कच्छ जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे असतानाच मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि त्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्यात करण्यात आली.

        अहमदनगर येथे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून तीन वर्षे काम केल्यावर १९६३ मध्ये मुंबई येथे पोलीस उपायुक्त या पदावर ते रुजू झाले. त्या वेळी उत्तर मुंबई या विभाग तीनची संपूर्ण जबाबदारी सोमण यांच्यावर होती. विविध पदांवर काम केल्यावर १९६७ मध्ये सोमण पोलीस उपायुक्त, विशेष शाखा या विभागाचे प्रमुख झाले. या पदावर असतानाच त्यांना भूतान येथे सरकारचा पोलीस खात्याचा सल्लागार म्हणून जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी १९७० ते १९७४ या कालावधीत काम केले. वेगळी भाषा बोलणाऱ्या संपूर्ण वेगळ्या संस्कृतीच्या लोकांबरोबर काम करण्याचा एक अपूर्व अनुभव या काळात सोमण यांना मिळाला. १९७३ मध्ये सोमण यांना पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले.

        यानंतर केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या गुप्तचर विभागात सोमण यांनी १९७४ ते १९७६ दिल्ली आणि मुंबई येथे डेप्युटी डायरेक्टर या पदावर काम केले. तेथून त्यांना पोलीस महानिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात येऊन त्यांच्यावर ‘स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे सतर्कता सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात आली. या संघटनेकडे त्या वेळी खाद्य तेलाची निर्यात, वृत्तपत्रांची छपाई, मळी निर्मिती, साखर उद्योग अशा विविध उद्योगांची मक्तेदारी होती.या संघटनेचे काम नियमांनुसार होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी सोमण यांनी पार पाडली. या व्यापारी संघटनेमध्ये काम करत असताना युरोपमधील काही देश तसेच अमेरिका आणि रशिया या देशांना त्यांनी भेटी दिल्या.

        १९८२ मध्ये दत्तात्रेय सोमण महाराष्ट्रात परत आले. त्या काळात पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर विचार करण्यासाठी सोमण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने आपला अहवाल नियोजित वेळेत, तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण सादर केला.यानंतर सोमण यांची नेमणूक गृहखात्यात 'अवर सचिव' म्हणून करण्यात आली. त्याच वर्षी गोवा येथे राष्ट्रकूल परिषदेचे दोन दिवसांचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनाचे व्यवस्थाप्रमुख म्हणून सोमण यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. १९८४ मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे निर्माण केली गेली होती. त्यांपैकी एका पदावर सोमण यांची नियुक्ती झाली. या पदावर त्यांनी तेरा महिने काम केले, तेथून त्यांची नेमणूक बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त या पदी करण्यात आली.या कार्यकालात त्यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात काम केले, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या साधनसामग्रीची देखभाल करणाऱ्या केंद्रांमध्ये सुसूत्रता निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम सोमण यांनी केले. या पदावर त्यांनी सव्वादोन वर्षे काम केले.

          १९८५ ते १९८७ या काळात सोमण मुंबईचे पोलीस आयुक्त या पदावर होते. १९८४-१९८५ मध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बँकलुटीच्या घटना घडल्या. अशा एकूण नऊ केसेसपैकी सात केसेसचा तपास सोमण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पूर्ण झाला. १९८५ मध्ये दत्तात्रेय सोमण हे मुंबईचे पोलीस आयुक्त या पदावर असताना महत्त्वपूर्ण घटना घडली. कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून कुप्रसिद्ध असलेला चार्ल्स शोभराज दिल्ली येथील तिहार कारागृहातून आपल्या साथीदारांसह पसार झाला. सूर्यकांत जोग त्या वेळी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते. चार्ल्स शोभराजला पूर्वी अटक करणारे पोलीस अधिकारी झेंडे, सूर्यकांत जोग, आणि दत्तात्रय सोमण यांच्या सहकार्याने त्याला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला.एक अप्रतिम तपास कसा असू शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण मानले जाते. चार्ल्स शोभराजला गोवा येथील 'एल पेकेव्हा' या हॉटेलमधून अटक करण्यात आली. या केसची सर्व वृत्तपत्रांनी प्रशंसा केली आणि मुंबई पोलीस हे स्कॉटलंड पोलीस पथकानंतर जगातले दुसऱ्या क्रमांकाचे पोलीस दल आहे अशा शब्दांत मुंबई पोलिसांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी सोमण म्हणाले होते की, "आमची तुलना कोणाशी करू नका. आम्ही जगात पहिल्या क्रमांकाचे पोलीस दल आहोत."

         १९८५ साली राष्ट्रपती पोलीस पदक देऊन दत्तात्रेय सोमण यांचा गौरव करण्यात आला. ज्युलिओ रिबेरो यांनी पोलीस महासंचालक म्हणून केलेल्या नेत्रदीपक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक म्हणून १९८८ मध्ये दत्तात्रेय सोमण हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे पोलीस महासंचालक झाले. त्यांची कारकीर्दही रिबेरो यांच्यासारखीच चमकदार ठरली. या पदावर दहा महिने काम करून ३१ मे १९८८ रोजी ते निवृत्त झाले. संपूर्ण कारकिर्दीत त्यांना ज्या ज्या पदांवर नियुक्ती मिळाली, त्या पदावर त्यांनी मनापासून आणि आनंदाने काम केले. निवृत्तीनंतर ते मुंबई येथे स्थायिक झाले आहेत.

         निवृत्तीनंतरही विविध सामाजिक प्रकल्पांमध्ये /उपक्रमांमध्ये ते कार्यरत होते . मफतलाल मिल,फोर्स कंपनी यांचे डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच मुंबई येथील श्रद्धानंद महिला आश्रमाचे ट्रस्टी तसेच ब्रीच कॅण्डी या हॉस्पिटलाचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. ‘संगीत महाभारती’ या संस्थेचे  ते ट्रस्टी होते तसंच रुबी मिल या कंपनीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 

         अशा ह्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे निधन ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हृदयविकारामुळे  झाले.

- संध्या लिमये

सोमण, दत्तात्रेय शंकर