Skip to main content
x

मंगलमूर्ती, माधव केशव

         माधव केशव मंगलमूर्ती यांचा जन्म मध्यप्रदेशातील (त्या काळातील मध्यप्रांत) जबलपूर येथे झाला. त्यांचे वडील केशव मंगलमूर्ती हे आय.सी.एस. अधिकारी होते. ते नागपूर येथे काही काळ न्यायाधीश होते. नागपूर विद्यापीठाचे उपकुलगुरुपदही त्यांनी भूषवले.

      माधव यांच्या आईचे नाव मालती असे होते. मंगलमूर्ती यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरमधील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. नागपूर येथील गव्हर्नमेंट ऑफ सायन्स महाविद्यालयातून त्यांनी गणित या विषयात एम.एस्सी. केले. वडील आय.सी.एस. असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत आपण काम करावे असे वाटत असे.

       १९६१ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. भारतीय परराष्ट्र सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ते तिसऱ्या स्थानावर होते. भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हेदेखील या तुकडीमध्ये होते.

        नोव्हेंबर १९६२ मध्ये त्यांची प्रथम नियुक्ती अर्जेंटिनाची राजधानी बुएनो आयरीस (Buenos Aires) येथील भारतीय दूतावासात तृतीय सचिव (थर्ड सेक्रेटरी) म्हणून करण्यात आली. स्पॅनिश भाषा शिकणे हा येथील नियुक्तीचा मुख्य उद्देश होता.

          स्पॅनिश भाषा अवगत केल्यानंतर माधव मंगलमूर्ती यांची नियुक्ती चिली देशाची राजधानी सॅटियागो येथे द्वितीय सचिव या पदावर करण्यात आली. पेरू आणि कोलंबिया या चिलीच्या शेजारील देशांशी भारताचा परराष्ट्र व्यवहार सॅटियागो या शहरातूनच चालत असे. त्याची जबाबदारी मंगलमूर्ती यांच्यावर होती. १९ जुलै १९६५ रोजी मंगलमूर्ती यांना पदोन्नती देण्यात येऊन त्यांची नियुक्ती कराची येथे द्वितीय सचिव, राजकीय (सेकण्ड सेक्रेटरी, पोलिटिकल) या पदावर करण्यात आली.

            त्यानंतर पुढील एक ते दीड महिन्यातच भारत-पाक युद्ध सुरू झाले. पाक सरकारने भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना स्थानबद्ध केले. त्यांच्या सामानाची/कागदपत्रांची कसोशीने तपासणी करण्यात आली. अशा मोक्याच्या प्रसंगी मंगलमूर्ती यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने भारत सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गुप्त कागदपत्रे पाकिस्तानच्या हाती सापडणार नाहीत याची काळजी घेतली. युद्धसमाप्तीनंतर साडेतीन वर्षांच्या कालावधीसाठी मंगलमूर्ती यांची नेमणूक पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे करण्यात आली.

             १९६८ मध्ये मंगलमूर्ती यांची नियुक्ती दिल्ली येथे अंडर सेक्रेटरी, परराष्ट्र मंत्रालय या पदावर करण्यात आली. १९६९ ते १९७२ या काळात त्यांच्यावर परराष्ट्र  मंत्रालयाच्या आग्नेय आशिया (साउथ-ईस्ट आशिया) या विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी होती. १९७३ मध्ये मंगलमूर्ती यांची नियुक्ती जिनिव्हा येथे  पर्मनन्ट मिशन ऑफ इंडिया टू यूएन ऑफिस इन जिनिव्हा या कामासाठी काउन्सेलर म्हणून करण्यात आली. या वेळी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये होणाऱ्या नि:शस्त्रीकरणाच्या संदर्भातील अनेक बैठकांमध्ये त्यांनी ब्रिजेश मिश्र यांच्यासह सहभाग घेतला. १९७४ मध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली. त्यावेळी मंगलमूर्ती यांना संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताची अणुचाचणीमागची भूमिका पटवून द्यावी लागली.

              १९७५ ते १९७७ या काळात मंगलमूर्ती इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे काउन्सिलर, डेप्युटी हेड ऑफ मिशन या पदावर कार्यरत होते. १९७७ मध्ये ते हाँगकाँगचे कमिशनर या पदावर कार्यरत होते. हाँगकाँग ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वसाहत होती. तसेच चीनमधील घडामोडी जाणून घेण्यासाठीही हाँगकाँगला ‘विंडो टू चायना’ असे म्हणत असत. या देशाबरोबरचे व्यापार, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच प्रकारच्या संबंधांची जबाबदारी मंगलमूर्ती यांनी सांभाळली होती. या पदावर ते १९८० पर्यंत कार्यरत होते.

                 १९८१ मध्ये मंगलमूर्ती यांची नियुक्ती दिल्ली येथे करण्यात आली. जॉइंट सेक्रेटरी, कंट्रोलर जनरल ऑफ इमिग्रेशन, चीफ पासपोर्ट ऑफिसर अशा विविध जबाबदाऱ्या त्यांच्यावर देण्यात आल्या. भारतातील सर्व पासपोर्ट कार्यालयांचे व्यवस्थापक त्यांच्या नियंत्रणाखाली होते. या काळात मध्य आशिया आणि इतर राष्ट्रांमध्ये भारतामधून मोठ्या प्रमाणावर कामगार नेले जात असत. या कामात कामगारांची फसवणूक तर होत नाहीना, हे पाहणे ही जबाबदारी पासपोर्ट ऑफिसर म्हणून मंगलमूर्ती यांनी पूर्ण केली.

               १९८१ ते १९८५ या काळात मंगलमूर्ती दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेजचे सीनियर डायरेक्टर ऑफ स्टाफ,  फॅकल्टी या पदावर होते. या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आय.ए.एस.,आय.पी.एस.,आय.एफ.एस.अशा महत्त्वपूर्ण पदांवर असणारे अधिकारी ‘अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग’साठी येत असत. परदेशातील काही अधिकारीही हे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असत. या सर्वांसाठीच्या अभ्यास कार्यक्रमाचे (स्टडी प्रोग्राम) नियोजन करण्याची जबाबदारी मंगलमूर्ती यांच्याकडे होती.

              १९८५ ते १९८९ या कालावधीत मंगलमूर्ती क्यूबा येथे राजदूत होते. त्या वेळी अलिप्त राष्ट्रवादी देशांच्या बैठकांना ते उपस्थित राहत असत. या वेळी त्यांना क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्या निमित्ताने त्यांना कम्युनिस्ट चळवळ जवळून पाहता आली.

              १९८९ ते १९९४ या पाच वर्षांतील त्यांची स्वित्झर्लंडमधील बर्न येथे राजदूत म्हणून झालेली नियुक्ती त्यांच्या कार्यकाळात  सर्वांत महत्त्वपूर्ण ठरली. याच काळात बोफोर्स घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू होती. या कालावधीत भारतातील सत्ताबदलामुळे बदलत्या राजकीय भूमिकांमुळे मंगलमूर्ती यांना बोफोर्स चौकशी सुरू असताना खूप दबावाखाली काम करावे लागले.

                या कालावधीत स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये ते सहभागी होत असत. स्वित्झर्लंडची भारतातील गुंतवणूक व पर्यटन, बँकिंग या क्षेत्रांतील दोन्ही देशांचे संबंध यांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. परराष्ट्र व्यापारात महत्त्वपूर्ण मानला जाणारा ‘डबल टॅक्सेशन करार’ मंगलमूर्ती स्वित्झर्लंडचे राजदूत असताना दोन्ही देशांमध्ये झाला.

                १९९४ मध्ये मंगलमूर्ती यांची नियुक्ती दक्षिण आफ्रिकेचे उच्चायुक्त (हाय कमिशनर) या पदावर करण्यात आली. हा देश त्या वेळी नुकताच स्वतंत्र होऊन नेल्सन मंडेलांच्या अध्यक्षतेखालील सरकार सत्तेवर आले होते. भारताचा नेल्सन मंडेला यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्यामुळे पूर्वीच्या सरकारचे भारताशी शत्रुत्व होते. या ठिकाणची नोकरशाही गौरवर्णीयांची, तर सत्ता कृष्णवर्णीयांची, अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेसोबतचे भारताचे राजनैतिक संबंध दृढ करण्याचे महत्त्वाचे काम मंगलमूर्ती यांनी केले. दोन्ही देशांमधील राजनैतिक, सांस्कृतिक, व्यापारविषयक आणि संरक्षणविषयक संबंधांचा पाया घालण्याची जबाबदारी मंगलमूर्ती यांनी पूर्ण केली. जून १९९६ मध्ये द. आफ्रिकेचे उच्चायुक्त या पदावरून ते अठ्ठावन्नाव्या वर्षी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर काही वर्षे त्यांनी हिंदुजा फाउण्डेशन चॅरिटेबल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून काम केले. सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत.

- संध्या लिमये

मंगलमूर्ती, माधव केशव