Skip to main content
x

कसबे, रावसाहेब राणोजी

प्रज्ञाशील विचारवंत रावसाहेब कसबे यांचा जन्म औरंगपूर ता.अकोले जि.अहमदनगर येथे झाला. त्यांचे वडील राणोजी व आई दगडाबाई. वडील गावातील एक प्रतिष्ठित गृहस्थ होते. ते गवंडी काम करत. अस्पृश्य वर्गातील असूनही स्पृश्य वस्तीतील स्त्री-पुरुष त्यांना मान देत. ते गावातील निवाडे करत, तंटे सोडवत. परिणामी गावातील सार्‍याच समाजाचे लोक त्यांचा आदर करत. पण राणोजी अस्पृश्य असल्यामुळे त्यांना दुरूनच पाणी देत. वेगळे जेवण वाढत.

कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे मॅट्रिक (एस.एस.सी.) होताच रावसाहेबांची नोकरीसाठी धडपड सुरू झाली. काही दिवस सिद्धार्थ विद्यालय, संगमनेर येथे त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. संगमनेर महाविद्यालयातून ते पदवीधर झाले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे एम.ए.साठी प्रवेश घेतला. याच कालावधीत त्यांचे भाचे पद्मश्री दया पवार यांच्या शिफारसीमुळे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात त्यांना नोकरी मिळाली. नोकरी करत एम.ए.चा अभ्यास करू लागले. याच दरम्यान १९६५ साली नगरला बौद्ध साहित्य संमेलन झाले. घनश्याम तळवटकर त्याचे अध्यक्ष, कुसुमाग्रज उद्घाटक तर रावसाहेब कसबे स्वागताध्यक्ष होते. त्यांनी अत्यंत प्रभावी भाषण केले. त्यांच्या भाषणामुळे ते कौतुकाचा विषय ठरले. त्या वेळी त्यांचे वय पंचवीस वर्षे होते.

१९७२ साली मराठवाडा विद्यापीठातून गुणानुक्रमे प्रथम आले व एम.ए.होताच संगमनेर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे १९८७ साली पुणे विद्यापीठातून पीएच.डी. झाले. निवृत्त होईपर्यंत इथेच प्रपाठक, प्राध्यापक अशी पदे संभाळली. निवृत्तीनंतर डॉ.आंबेडकर अध्यासन, पुणे विद्यापीठ येथे पुण्याचे प्रमुख प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

विद्यार्थीदशेपासूनच त्यांना वाचन, लेखन, व्याख्यान यांत रुची होती. सखोल व चतुरस्र वाचन, चिंतन; चिकित्सक प्रवृत्ती; इंग्रजी, मराठी, संस्कृत, पाली ह्या भाषांचे उत्तम ज्ञान यांमुळे त्यांच्याकडून समृद्ध ग्रंथरचना झाली व सार्‍या महाराष्ट्रात एक प्रज्ञाशील विचारवंत म्हणून त्यांचा लौकिक पसरला. आजपर्यंत त्यांचे सहा मौलिक ग्रंथ प्रसिद्ध झाले, ते असे-

‘झोत’ (१९७८), ‘डॉ.आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना’ (१९७८), ‘आंबेडकर आणि मार्क्स’ (१९८५), ‘आंबेडकरवाद: तत्त्व आणि व्यवहार’ (१९८९), ‘हिंदू-मुस्लिम प्रश्‍न व सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद’ (१९७३), ‘मानव आणि धर्मचिंतन’ (१९९६). याशिवाय त्यांनी काही पुस्तिका लिहिल्या व संपादनेही केली. महाराष्ट्रभर अनेक कार्यशाळांमध्ये ते सहभागी झाले. नामांतराच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला.

डॉ.कसबेंवर बाबासाहेबांचा जबरदस्त वैचारिक प्रभाव आहे. ती त्यांची निष्ठा आहे. पण ते आंधळे भक्त नाहीत, तर डोळस चिंतक आहेत. रावसाहेबांच्या विचारांचे परिशीलन करताना बाबासाहेबांच्या विधानाची प्रचिती येते. म्हणूनच ते व्यक्तिपूजक न राहता त्या विचारांची हंसक्षीर न्यायाने मांडणी करतात. त्यांच्या जवळपास सर्वच ग्रंथांतून आंबेडकरी विचारांची प्रस्फुरणे उठतात. डॉ.आंबेडकरांचा राष्ट्रवाद, त्यांची समतावादी मूल्ये, त्यांच्या संकल्पनेतील लोकशाही, भारतीय समाजव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचे भवितव्य, लोकशाही समाजवाद, राज्य समाजवादी अर्थव्यवस्था, धर्मांतर, त्यांच्या आंदोलनांचे संदर्भ, सामाजिक व राजकीय चळवळींची बांधणी व या सर्वांतून त्यांनी फुंकलेले मानवमुक्तीचे रणशिंग अशा अनेकानेक संदर्भांची दखल घेत बदलत्या काळानुरूप आंबेडकरी विचारांच्या तत्त्वांची व व्यवहाराची मांडणी करतात. धर्म व धम्म या दोन्ही संकल्पना भिन्न अर्थांच्या कशा आहेत, हे तर समजावून सांगतातच पण समाज-परिवर्तनाच्या धम्माचे दृष्टीने असलेले धम्माचे मोलही प्रतिपादन करतात. राजकीय क्रांतीसाठी, सामाजिक व धार्मिक क्रांती किती महत्त्वाची असते, हे आंबेडकरी विचारांच्या अनुषंगाने डॉ.कसबे यांनी अत्यंत प्रभावीपणे व संयमशीलपणे मांडले. रावसाहेब कसबे गेली साडेतीन तपे दलित चळवळीचेच नव्हे तर, एकूणच परिवर्तनवादी चळवळीचे दिशादर्शक राहिले आहेत.

भारतीय राज्यघटनेची समीक्षा आजपर्यंत अनेकांनी केली. आपापल्या ताकदीप्रमाणे व मानसिकतेनुसार केली. डॉ.आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार म्हणून तर त्यांच्या श्रद्धेपोटी अनेकांनी तिचे आंधळे गुणगान गाइले. त्यातील त्रुटींकडे आणि घटनेची निर्मिती होत असताना बाबासाहेबांच्या सातत्याने होणार्‍या कोंडीकडे मात्र कोणी लक्ष दिले नाही. या जाणिवेतूनच डॉ.रावसाहेब कसबे यांनी घटनेची डोळस चिकित्सा केली आणि “बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी लोकशाही आणि सध्याच्या राज्यघटनेने उभा केलेला लोकशाहीचा राजकीय सांगाडा हे एक नव्हेत”, असे ठामपणे सांगत “बाबासाहेबांना अभिप्रेत असणार्‍या लोकशाही राज्यघटनेत समाजवादी अर्थव्यवस्थेचा समावेश तर असावाच परंतु देशाची अर्थव्यवस्था कोणत्याही एका वर्गाच्या हातात जाणार नाही, त्याच्या तरतुदीही असाव्यात.” असे आग्रही प्रतिपादन करतात.

हिंदू-मुस्लिम मूलतत्त्ववादी हे समाजात दुहीचे बीज कसे पेरत आहेत, त्याची परखड चिकित्सा रावसाहेबांनी केली आहे. परिणामी कठोर टीकाही झाली. त्या टीकेस त्यांनी शांतपणे उत्तरे दिली. लोकशाही व समाजवादी मूल्यांवर निष्ठा असणार्‍या सर्व विचारवंतांनी हिंदू राष्ट्रवादाचे आक्रमक रूप पाहून त्यास आव्हान देण्यासाठी सुसंघटित झाले पाहिजे, अशी त्यांची विचारसरणी आहे.

रावसाहेबांचे व्यक्तिमत्त्व धीरगंभीर व अत्यंत संयमशील आहे. आक्रस्ताळेपणाचा व नाहक बडेजावाचा त्यात मागमूसही नाही. अनेक आंबेडकरी विचारवंत मार्क्स नाकारतात; पण रावसाहेब त्या विचारांचा समन्वय साधतात. प्रगतीच्या दिशेने जाणार्‍या समाजवादी भारताला मार्क्स नाकारून चालणार नाही. प्रत्यक्ष बाबासाहेबांनीही तो नाकारला नाही. अशा स्थितीत मानवमुक्तीचा युटोपियाच ठरलेल्या या विचारात समन्वयाची किमया रावसाहेबांनी साधली आहे. “तुम्हांला मार्क्सवादी म्हणायचे की आंबेडकरवादी की समाजवादी?” या प्रश्‍नाला ते शांतपणे उत्तर देताना “कोणीही माणूस पूर्णपणे मार्क्सवादी, आंबेडकरवादी किंवा समाजवादी असण्याची सूतराम शक्यता नाही. तुम्ही फक्त मला रावसाहेब कसबे या नावाने संबोधा,” असे नम्रपणे सांगतात.

आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९१), युगांतर प्रतिष्ठान नाशिकचा जीवन गौरव पुरस्कार (१९९९), सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार पुणे (२०००), ना.मे.लोखंडे पुरस्कार, पुणे (२०००), दलित साहित्य अकादमी, दिल्लीचा पुरस्कार आणि याशिवाय अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. सुगावा पुरस्कार (२०१४),कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता  पुरस्कार (२०१६) असे पुरस्कारही त्यांना लाभले आहेत. 

- वासुदेव डहाके 

कसबे, रावसाहेब राणोजी