Skip to main content
x

साठे, रामचंद्र दत्तात्रेय

            रामचंद्र दत्तात्रेय साठे यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गुंटुर येथे  झाला. शालेय वयाचे झाल्यानंतर त्यांना पुणे येथील शिवाजी सैनिकी शाळेत पाठविण्यात आले. नंतर ते डेहराडून येथील ‘डेहराडून स्कूल’ या निवासी शाळेत शिकले. रामचंद्र ऊर्फ राम साठे हे  १९५५ मध्ये स्थापन झालेल्या स्कूलच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होत. शाळेत असताना ते क्रिकेट, हॉकी व टेनिस या खेळांचे कर्णधार होते. ते शाळेचेही गटनायक होते. नंतर राम साठे यांनी सैनिकी शिक्षण घेण्याचे ठरविले व त्याप्रमाणे डेहराडून येथील भारतीय सैनिकी संस्थेमधून १९४१ मध्ये ते किंग्ज कमिशन घेऊन उत्तीर्ण झाले. त्यांची नेमणूक त्या वेळच्या बर्मा विभागात सैन्यातील अभियांत्रिकी पदावर झाली.

           त्यानंतर वयाच्या तेविसाव्या वर्षी साठे यांची नेमणूक चीनमधील भारताचे त्या वेळचे प्रतिनिधी के.पी.एस. मेनन यांचे सैनिकी साहाय्यक म्हणून करण्यात आली.

           १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा साठे ह्यांची नेमणूक नानकिंग येथे होती. त्यानंतर मात्र के.पी.एस. मेनन यांनी स्वत:बरोबर त्यांना विदेश सेवा विभागात नेले. त्यांची या सेवेतील पहिली नेमणूक ही दक्षिण सिनकिआंगची राजधानी कशगर येथे होती. ही जागा ‘जगाचे छप्पर’ म्हणून ओळखली जाते.

           त्यानंतर स्टॅलिनच्या राजवटीत राम साठे रशियामध्ये होते. नंतर केनियाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या उदयाच्या वेळेस ते केनयात होते. त्यानंतरची त्यांची नेमणूक ही अफगाणिस्तानात होती. त्यानंतर जर्मनीमधील हॅम्बर्ग येथे ते काही काळ होते. तेथे त्यांनी परराष्ट्रातील व्यापाराचा अनुभव घेतला. पुढे काही काळ त्यांनी परराष्ट्र खात्यातील व्यापार विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले.

            राम साठे यांची विविध देशांत परराष्ट्र खात्यामार्फत नेमणूक झाली होती. १९६२ मध्ये ते आफ्रिकेतील टांगानिका येथे भारतीय उच्चायुक्त म्हणून रुजू झाले. १९६५ मध्ये त्यांनी राष्ट्रीय महाविद्यालयात (प्रबोधिनी) प्रवेश घेतला. तेथे ते एक वर्षभर होते.

            यानंतर १९६६ मध्ये ते परत चीनला गेले. राम साठे यांच्या सेवेतील बराच काळ हा चीन व इराण या दोन देशांत गेला. या दोन्ही देशांसंबंधी परराष्ट्र धोरण ठरविण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. १९६६ ते १९६९ या  तीन वर्षांच्या त्यांच्या चीन येथील वास्तव्यात चीनमध्ये खूप उलथापालथ सुरू होती. १९६९ मध्ये दिल्ली येथे परत येऊन त्यांनी परराष्ट्र खात्यातील अर्थ विभाग सांभाळला.

            १९७२ मध्ये त्यांची नेमणूक इराण येथे झाली. त्या वेळेस इराणमधील वातावरण हे भारतविरोधी होते. परंतु साठे यांच्या कार्यकाळात हळूहळू वातावरण निवळत गेले. ते तिथे असताना भारत व इराण दरम्यान आर्थिक संबंध निर्माण झाले. त्यातील  एक महत्त्वाचे म्हणजे कुद्रेमुख लोह खनिज प्रकल्प.इराणनंतर फ्रान्स येथे ते राजदूत म्हणून नेमले गेले. परत १९७९ मध्ये एका वर्षासाठी त्यांची नेमणूक चीनमध्ये झाली.त्यानंतर राम साठे यांची नेमणूक परराष्ट्र खात्याच्या सचिव पदावर झाली.

           १९८२ मध्ये ते परराष्ट्र खात्यामधून निवृत्त झाले. परंतु पुढे त्यांची नेमणूक जर्मनीमध्ये राजदूत म्हणून करण्यात आली. तेथील कार्यकाळ संपल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले.

- आशा बापट

साठे, रामचंद्र दत्तात्रेय