Skip to main content
x

गवस, राजन गणपती

     सेवादलाचे व पुढे युवक क्रांती दलाचे संस्कार घेऊन उपेक्षितांसाठी काम करणार्‍या राजन गवस यांचे साहित्यही उपेक्षितांच्या वेदना, ताण-तणाव उत्कटपणे प्रकट करते. ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला २००१ साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. दलित चळवळीतील अंतर्विरोध स्पष्ट करणारी ‘तणकट’ (१९९८), देवदासींच्या जीवनावरची ‘चौंडकं’(१९८५), जोगत्यांच्या प्रश्नासंबंधीची ‘भंडारभोग’ व साहित्यक्षेत्राशी संबंधित ‘कळप’(१९९७) या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.

     गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ येथे जन्मलेल्या गवस यांचे मूळ गाव करंबळी (जि.कोल्हापूर) आहे. गडहिंग्लज येथून बी.ए.ची पदवी घेऊन शिवाजी विद्यापीठातून १९८२ साली एम.ए. केले. भाऊ पाध्ये यांच्या लेखनावर त्यांनी पीएच.डी. केली.

     महाविद्यालयीन काळातच लेखनास सुरुवात करून त्यांनी  ‘हुंदका’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. पुढे ते कादंबरीलेखनाकडे वळले. ‘देवदासी’ तसेच ‘माकडवाला संघटना’ या दोन चळवळींत सक्रिय सहभाग घेणार्‍या गवस यांनी देवदासी व माकडवाला यांच्या जीवनाचे जवळून निरीक्षण केले व तेच त्यांच्या साहित्यातून साकारले. ‘तिरकसपणातील सरळता’ हे रंगनाथ पठारे यांच्या कादंबर्‍यांचे विवेचन (१९९५), ‘मराठीचे आशययुक्त अध्यापन’ (१९९२) ही त्यांची इतर पुस्तके होत.

     साहित्य अकादमीसहित अन्य मानाचे पुरस्कारही त्यांना लाभले. ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ पुरस्कार, ‘भैरू रतन दमाणी’  पुरस्कार यांचेही ते मानकरी ठरले. ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’, ‘धिंगाणा’, ‘चांगदेव चतुष्टय’ या त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार लाभले. १९९२ साली संस्कृती प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्यातर्फे दिला जाणारा ‘संस्कृती प्रतिष्ठान’ पुरस्कार त्यांना मिळाला. मॉरिशस विद्यापीठाच्या ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेज’ या समितीवर ३ वर्षे मराठी भाषेचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केले. ‘रिवणावायली मुंगी’(२००१), ‘आपण माणसात जमा नाही’ (२००९) हे त्यांचे अलीकडे प्रकाशित झालेले कथासंग्रह असून भालचंद्र नेमाडे यांच्या चार कादंबर्‍यांवरील परीक्षणांचे निवडक लेखही त्यांनी संपादित केले आहेत.

- सुहास बारटक्के

गवस, राजन गणपती