Skip to main content
x

इनामदार, हेमंत विष्णू

     संत साहित्याचे अभ्यासक डॉ. हेमंत विष्णू इनामदार यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव गावी झाला. वडील विष्णू हरी उर्फ तात्या प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक होते आणि विविध विषयांचे व्यासंगी, प्राचीन काव्याचे अभ्यासक होते. त्यांच्या सहवासात वाङ्मयाच्या आवडीचे बीज हेमंत यांच्या बालमनात नकळत रुजले. आई रुक्मिणीबाई यांनाही कविता करण्याचा छंद होता. त्यांचे अक्षर सुंदर, टपोरे आणि मोत्यासारखे होते. आपल्या मुलाच्या (हेमंताच्या) काही पुस्तकांच्या सुरेख मुद्रणप्रती त्या हौसेने लिहून द्यायच्या. आई-वडिलांचे उत्तम संस्कार घेऊनच हेमंतरावांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवले. त्यांचे बालपण निसर्गरम्य कोकण भूमीतील रेवदंडा येथे आत्या यशोदा आचार्य यांच्या मायेच्या छायेत सुखासमाधानाने गेले. आत्याचे यजमान गणेश माधव उर्फ आबा आचार्य हे रेवदंडा हायस्कूलचे शालाप्रमुख होते. आबा हे विवेकी, विचारी, शिस्तप्रिय आणि हाडाचे शिक्षक होते. शिक्षक आर.जी.जोशी यांनी राष्ट्रभक्तीचे धडे स्व-आचरणातून दिले. मराठीचे अभंग सर, इंग्रजीचे दामले सर, हे इनामदारांचे विशेष आवडते शिक्षक होते. या सार्‍यांच्या सहवासात जीवनातील सात वर्षे जडणघडणीची गेली. ह.भ.प.बुवा नवरे यांनी रात्री झोपताना रामायण-महाभारतातील कथा, संतकथा नेमाने सांगितल्या. मनाच्या श्लोकांमुळे उत्तम श्रवणसंस्कार झाले. रेवदंडा हे त्यांच्या आयुष्यातील आनंदमय स्मृतिस्थळ बनले. स्वकष्टांनी आणि अभ्यासू वृत्तीने त्यांनी शिक्षणात एम.ए., एल.एल.बी., पीएच.डी. पर्यंत मजल मारली.

संत साहित्य आणि संत विचार यांचा वेध घेताना ते खोलवर, मुळापर्यंत जाऊन भिडले. संत साहित्यात अखंड अवगाहन करत राहिले. संत साहित्याचे अध्ययन-अध्यापन, संकलन, संपादन, मार्गदर्शन यांत ते सदैव कार्यमग्न राहिले. त्यांच्या लेखनात सहजता, सुबोधता, प्रासादिकता आणि मुख्य म्हणजे अर्थपूर्ण प्रवाहिता नेमकेपणाने उतरली. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. ‘संत नामदेव’ (नामा म्हणे), ‘भागवत धर्माची मंगल प्रभात’, ‘संत सावता दर्शन, (१९७०), ‘श्री ज्ञानेश्वर व संतमंडळ’, ‘ज्ञानदेवे रचिला पाया’, ‘एकनाथकालीन मराठी साहित्य’, (१९८३) ‘श्री नामदेव चरित्र’, ‘काव्य आणि कार्य’, ‘आश्रमहरिणीचे अंतरंग’, ‘मराठेशाहीचा उत्तरकाळ’ अशी अकरा स्वतंत्र पुस्तके, संपादित सोळा ग्रंथ, नियतकालिकांचे संपादन (महाराष्ट्र साहित्य पुस्तिका, धर्मभास्कर, अबोली) याशिवाय विशेष प्रसंगी लेख, विविधांगी लेखनसंपदा म्हणजे त्यांच्या भरघोस साहित्य योगदानाची साक्ष होय. सकळ संत व्यासपीठ, गीता धर्म मंडळ, या संस्थांच्या कार्यातही त्यांनी मोलाची साथ दिली. भक्तिमंदिरातील नंदादीप, वेध ज्ञानेशाचा, अभंग नवनीत, आस्वाद ज्ञानेश्वरीचा, नामा म्हणे हे त्यांचे  ग्रंथ विशेष गाजले.

प्राचीन साहित्याभ्यासकांच्या श्रेयनामावलीतील सर्वमान्य नाममुद्रा आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात त्यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकर्तृत्वाने आगळा-वेगळा ठसा उमटवला आहे. यशस्वी प्राचार्य, कुशल अध्यापक, प्रभावशाली वक्ता, चिंतनशील अभ्यासक आणि विचारांची बांधिलकी जपणारा अभ्यासू लेखक म्हणून त्यांची खास ओळख आहे.       

- डॉ. ललिता गुप्ते

 

इनामदार, हेमंत विष्णू