Skip to main content
x

बनहट्टी, राजेंद्र श्रीनिवास

     राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी यांचा जन्म नागपूर येथे झाला. नागपूर विद्यापीठातून इंग्रजी विषयात आणि पुणे विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात त्यांनी एम.ए. केले आहे. सुविचार प्रकाशन मंडळ, पुणे याचे संचालक व ‘रसिक’ दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत.

     कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन अशा अनेक साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. शाळेत असल्यापासूनच बनहट्टींनी गोष्टी लिहायला प्रारंभ केला. हस्तलिखित मासिकातून, महाविद्यालयीन नियतकालिकांतून त्यांचे लेखन सुरुवातीला प्रसिद्ध झाले. १९५६मध्ये नागपूरच्या राजाराम वाचनालयाने भरविलेल्या कथास्पर्धेसाठी लिहिलेल्या ‘पिता’ या कथेपासून त्यांच्या कथालेखनाला खरी सुरुवात झाली. या स्पर्धेत या कथेला पहिले पारितोषिक मिळाले व ती कथा नागपूरच्या ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘हसणारी मुलगी’, ‘पहाट’, ‘इमारत’, ‘हरवलेले बालपण’ अशा अनेक कथा त्यांनी लिहिल्या आणि आजपर्यंत सातत्याने त्यांचे कथालेखन सुरूच आहे.

     ‘समानधर्मा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह सप्टेंबर १९७१मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘खेळ’, ‘आंब्याची सावली’ (१९७८), ‘गंगार्पण’ (१९८४), ‘अवेळ’ (१९८५), ‘कृष्णजन्म’ (१९८८), ‘लांडगा’ (१९८९), ‘युद्धपर्व’  (१९९२), ‘प्रेक्षक’, ‘मध्यंतर’ (१९९४) इत्यादी संग्रह प्रसिद्ध झाले.

     ‘शंभूराव’ हा व्यक्तिरेखांचा संग्रह, तसेच ‘नवलाई’ (१९९५) हे ऑस्ट्रेलियाच्या प्रवासातील अनुभवांवरील पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

     ‘अपूर्णा’ (१९६५), ‘अखेरचे आत्मचरित्र’ (१९८२), ‘मरणानंतरचे मरण’ (१९८५) या कादंबर्‍या व ‘जीवन त्यांना कळले हो।’ आणि ‘माणूस म्हणतो माझे घर’ ही दोन नाटके त्यांनी लिहिली आहेत.

     ‘सत्यकथा’, ‘ललित’, ‘किस्त्रिम’, ‘केसरी’, ‘अक्षर’, ‘मेनका’, ‘दीपावली’, ‘हंस’ अशा अनेक मासिकांतून आणि ‘तरुण भारत’, ‘स्वराज्य’, ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘साप्ताहिक सकाळ’ अशा विविध दैनिकांतून व साप्ताहिकांतून त्यांनी सातत्याने दर्जेदार कथालेखन केले आहे.

     अकरा कथासंग्रहांतील ८२ कथा आणि इतर अप्रकाशित कथा असे विपुल कथालेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या अधिकाधिक कथा आणि दीर्घकथा ‘हंस’मधून प्रकाशित झाल्या आहेत.

     ‘समंध’ ही त्यांची दीर्घकथा १९८२मधली आहे; पण १९८५पासून त्यांनी ‘शेजारी’, ‘कृष्णजन्म’, ‘युद्धपर्व’, ‘भीष्माची बायको’, ‘लग्न’, ‘लांडगा’ यांसारख्या अनेक दीर्घकथा लिहिल्या. ‘कृष्णजन्म’ या त्यांच्या गाजलेल्या संग्रहात तीन दीर्घकथा आहेत. याशिवाय ‘निवडक लघुकथासंग्रह’ व ‘निवडक दीर्घकथासंग्रह’ प्रकाशित झाले आहेत. या दीर्घकथा म्हणजे बनहट्टींच्या पृथगात्म व वैशिष्ट्यसंपन्न लेखन प्रतिभेचा मनोरम आविष्कार आहे.

     मराठीतील इतर दीर्घकथांपेक्षा बनहट्टींच्या दीर्घकथा अगदी वेगळ्या आहेत. त्यांच्या कथा मूलतः व्यक्तिकेंद्री आहेत. दीर्घकथांतील अनुभवक्षेत्रही वेगळे आहे. माणसाच्या मनाची सारी सूक्ष्मातिसूक्ष्म आंदोलने टिपणारी उत्कंठावर्धक निवेदनपद्धती हा त्यांच्या लेखनाचा विशेष आहे.

     ‘कृष्णजन्म’, ‘अखेरचे आत्मचरित्र’ (कादंबरी) आणि ‘खेळ’, ‘सुरुवात’, ‘शेजारी’ यांसारख्या कथांचे इंग्रजी, गुजराती, हिंदी भाषांमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.

      त्यांनी अनेक सन्माननीय पदे भूषविली आहेत- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे ते १९८५ ते १९९२  या काळात कार्याध्यक्ष व १९९५ ते १९९८ ह्या काळात अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ते १९८८ ते १९९२ या कालावधीत अध्यक्ष होते. १९९०मध्ये ते साहित्यसभा, इंदूर शारदोत्सव व अमृत महोत्सव ह्या समारंभाचे ते अध्यक्ष होते. तसेच तिसरे कोथरूड उपनगर साहित्य संमेलन, पुणे (१९९५) याचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. २००२ मध्ये पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    ‘अखेरचे आत्मचरित्र’ला १९८२चा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ‘गंगार्पण’ला १९८४चा सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ‘कृष्णजन्म’ला १९८८चा सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि शंकर पाटील कथा पारितोषिक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे (१९८८) व ग.रा.बाळ पारितोषिकही मिळाले आहे. ‘मध्यंतर’ला  १९९४मध्ये पानवलकर स्मृती प्रतिष्ठानचा श्री.दा.पानवलकर पुरस्कार व १९८९ मध्ये ‘लांडगा’ला सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा महाराष्ट्र राज्य पुरस्काराने आणि आनंदीबाई शिर्के पारितोषिकाने (महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा) सन्मानित करण्यात आले.

    सखोल जीवनानुभवाची अभिव्यक्ती, मनोविश्लेषणात्मक, संयत भावाविष्कार, सहज स्वाभाविक लेखनशैली हे बनहट्टींच्या कथालेखनाचे विशेष आहेत.

    - प्रा. मंगला गोखले

बनहट्टी, राजेंद्र श्रीनिवास