Skip to main content
x

वाळिंबे, विनायक सदाशिव

     विनायक वाळिंबे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले. त्यांनी ‘अग्रणी’, ‘केसरी’, ‘ज्ञानप्रभात’, ‘लोकशक्ती’ या वृत्तपत्रांत पत्रकारिता केली. केसरीतील त्यांची कारकीर्द (रविवार आवृत्ती संपादक) विशेष गाजली. त्यांनी लंडनला पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि त्या अनुभवावर आधारित सदर लेखन त्यांनी ‘सह्याद्री’मधून केले. पत्रकारिता करतानाही राजकीय सूत्र हे विशेष अधोरेखित झाले, कारण राजकीय स्वरूपाचे लेखन करणारे ते एक महत्त्वाचे लेखक मानले जात. राजकीय विषय केंद्रस्थानी धरून साहित्यनिर्मिती करणारे लेखक, जातिवंत पत्रकार म्हणून विनायक वाळिंबे यांची नोंद महत्त्वाची ठरते.

     ‘व्होल्गा जेव्हा लाल होते’ (१९६८) हे त्यांचे पुस्तक अतिशय गाजले. ‘इंदिराजी’ (१९९४), ‘बेंगलोर ते रायबरेली’ (१९७७), ‘रायबरेली आणि त्यानंतर’ (१९७८) ही इंदिरा गांधींवरची त्यांची अभ्यासपूर्ण पुस्तके विशेष गाजली. राजकीय पार्श्वभूमीवरील वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण पुस्तके म्हणजे ‘इस्रायलचा वज्रप्रहार’, ‘तीन युद्धकथा’, ‘स्टॅलिनची मुलगी’ (१९६८), ‘पराजित अपराजित’ (१९७१), ‘दुसरे महायुद्ध’, ‘हिटलर’ (१९८२), अशी ५०पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. खेरीज ‘वुई द नेशन’ या पालखीवालांच्या पुस्तकाचा अनुवाद, राजमाता विजयाराजे सिंदियांचे ‘आत्मकथा राजमाता’, ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’, ‘ट्वेंटी टू फेथफुल डेज’चा अनुवाद, ‘इन जेल’ या कुलदीप नय्यर यांच्या खळबळजनक पुस्तकाचा अनुवाद, ‘ऑल द जनता मेन’ जनार्दन ठाकूर यांच्या पुस्तकाचा अनुवाद, असे अनेक अनुवाद त्यांनी केलेले आहेत. त्याशिवाय त्यांनी ‘अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्याची संस्मरणीय कहाणी’चे दोन भाग (१९७७) हे स्वतंत्र इतिहास लेखनही केलेले आहे.

     स्वतंत्र रचना असोत वा अनुवाद, राजकीय वास्तव, विदेशातला राजकीय इतिहास, त्या इतिहासाचे छाप काटे, महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती, राजकीयदृष्ट्या परिवर्तनाचा कालखंड हे आशय त्यांच्या केंद्रस्थानी होते.

- डॉ. सुवर्णा दिवेकर

वाळिंबे, विनायक सदाशिव