Skip to main content
x

खानोलकर, चिंतामण त्र्यंबक

आरती प्रभू

     विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक लेखन करणारे कवी/लेखक अनेक असतात. आपापल्या परीने ते मोठेही असतात. पण ‘प्रतिभा’ ही निसर्गदत्त/ईश्वरदत्त देणगी असते, असे म्हणायला लावणारे काही मोजकेच कवी/लेखक असतात. आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर) हे अशा मोजक्या साहित्यिकांपैकी एक. ‘मी मातीचे ऋण फेडाया देवाघरून आलो’ असे त्यांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे आणि त्यांचे लेखनकर्तृत्व पाहता या ओळीची सत्यता प्रतीत होते.

     खानोलकर यांचा जन्म बागलांची राई, तेंडोली, ता.वेंगुर्ले, जि.सिंधुदुर्ग येथे झाला. त्र्यंबक विश्राम प्रभुखानोलकर आणि सुंदराबाई या दांपत्याचे हे सहावे अपत्य होते. बागलांची राई येथे चिदानंद स्वामींचा मठ आहे. आपल्याला लाभलेले प्रतिभेचे देणे हा चिदानंद स्वामींचा कृपाप्रसाद आहे, असे खानोलकर मानीत असत. नवीन लेखनाला प्रारंभ करण्यापूर्वी ‘श्री चिदानंद स्वामी प्रसन्न’ असे ते लिहीत असत. त्यांच्या लेखनात हा मठ आणि त्याचा परिसर याचे चित्रण विविध स्वरूपांमध्ये आलेले आहे.

    तेंडोली, वेंगुर्ले, सावंतवाडी, मुंबई, कुडाळ अशा अनेक ठिकाणी स्थलांतर होत-होत खानोलकरांचे बालपण व्यतीत झाले. कुडाळ हायस्कूलच्या ‘बालार्क’ या वार्षिकांकात खानोलकारांची ‘भवितव्य’ ही कविता व ‘मोगर्‍याची वेणी’ ही कथा प्रसिद्ध झाली. यानंतर वर्षभरातच, १९५१ मध्ये त्यांची ‘जाणीव’ ही कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाली. सावंतवाडीतील ‘वैनतेय’ या साप्ताहिकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी सत्यकथेत कविता प्रसिद्ध होण्यास काहीसा विलंब झाला. ‘आरती प्रभू’ या टोपणनावाने पाठविलेली त्यांची ‘शून्य शृंगारते’ ही कविता १९५४ मध्ये प्रसिद्ध झाली. या स्त्रीनामसदृश टोपणनावाचे कुतूहलही काही काळ साहित्यविश्वात होते, मात्र लवकरच सर्वांना योग्य तो खुलासा झाला. कवितालेखनासाठी ‘आरती प्रभू’ हे टोपणनाव मात्र कायम राहिले.

    खानोलकरांनी किशोरवयापासून साहित्यप्रेम जपले आणि या साहित्यप्रेमाने त्यांची संगत अखेरच्या दिवसापर्यंत सोडली नाही. मृत्यूपूर्वी आठवडाभर, ते काही काळ शुद्धीवर आले असता, त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉ.देवल यांच्या आग्रहाखातर त्यांनी ‘अखेरच्या वळणावर यावा। मंद सुगंधी असा फुलोरा। थकले पाउल सहज उठावे। आणि सरावा प्रवास सारा’ ही आपली अखेरची कविता म्हटली. त्यांचा प्रत्येक श्वास जणू साहित्याशी जोडला गेला होता.

    सेहेचाळीस वर्षांच्या आयुष्यात खानोलकरांनी जी विपुल साहित्य निर्मिती केली, ती थक्क करणारी आहे. ‘खानोलकरांचा लिहीण्याचा वेग व निकड एवढी होती की, त्यांच्या लेखनाच्या झपाट्याला एक प्रकाशनसंस्था पुरी पडणे कठीणच होते’ अशी नोंद त्यांचे प्रमुख प्रकाशक श्री.पु.भागवत यांनी केलेली आहे. व्यक्तिगत आयुष्यात फार मोठे चढ-उतार खानोलकरांच्या वाट्याला आले. गर्भावस्थेत असताना त्यांच्या मातेवर गर्भपातासाठी झालेला एका ‘मुळी’चा प्रयोग, वडिलांकडून सतत दुजाभाव, शिक्षणाची परवड, पुढे व्यावसायिक अस्थैर्य, समकालिनांकडून झालेला उपहास, मुलाचा अकाल मृत्यू, काही मित्रांच्या मदतीने मुंबईत लाभलेली नोकरी, नोकरीतही अस्थिरता, शारीरिक व्याधी अशा खाचखळग्यांनी त्यांचे आयुष्य भरलेले होते. हे लौकिक अनुभव आणि कलावंत म्हणून घेतलेले भावानुभव यांची प्रतिक्रिया खानोलकरांच्या लेखनात अपरिहार्यपणे उमटली.

    ‘जोगवा’(१९५९), ‘दिवेलागण’(१९६२) आणि ‘नक्षत्रांचे देणे’(१९७५) या आरती प्रभूंच्या तीनही कवितासंग्रहांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले. ‘नक्षत्रांचे देणे’ला साहित्य अकादमी पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला. त्यांच्या असंग्रहित आणि अप्रकाशित कवितांची संख्याही बरीच मोठी आहे. ‘सनई’ (१९६४), ‘राखी पाखरू’(१९७१), ‘चाफा आणि देवाची आई’ (१९७५), व ‘बाप’ हे खानोलकरांचे चार कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या तेरा कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या. ‘कोंडुरा’ (१९६६), ‘रात्र काळी घागर काळी’(१९६२), ‘अजगर’ (१९६५), ‘पाषाणपालवी’ (१९७६), ‘भागधेय’ या त्यांतील प्रमुख कादंबर्‍या होत. पुस्तकरूपात प्रसिद्ध न झालेल्या आणखीही तीन कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. सर्व साहित्यप्रकारांपैकी सर्वाधिक लेखन त्यांनी नाटकांचे केलेले आहे. दहा प्रकाशित आणि एकोणतीस अप्रकाशित अशी एकोणचाळीस नाटके त्यांनी लिहिली. यांपैकी ‘एक शून्य बाजीराव’ (१९६६), ‘अवध्य’ (१९७२), आणि ‘कालाय तस्मै नमः’ (१९७२) या नाटकांनी खानोलकरांना नाटककार म्हणून नावलौकिक मिळवून दिला. ‘हयवदन’ आणि ‘अजब न्याय वर्तुळाचा’(१९७४) या त्यांनी रूपांतरित केलेल्या नाटकांचाही बराच बोलबाला झाला. काही एकांकिका, ‘गोपाळ गाणी’ हा बालगीतांचा संग्रह तसेच ‘वारा वाजे रुणझुणा’ आणि ‘दीपमाळ’ हे ललित गद्यलेखनही खानोलकरांनी केले.

     स्वतःच्या प्रकृतिधर्माविषयी खानोलकरांनी बरेच चिंतन केलेले होते. ‘प्रत्येक अनुभव म्हणजे चकवा असतो चकवा. त्या चकव्यातून बाहेर पडून तो अनुभव गुलाबाच्या ताटव्यासारखा किंवा मशालीसारखा बाहेर घेऊन येता-येता खूप मोठं दान प्रत्येक कलावंताला द्यावं लागतं. हरवलेली गोष्ट फार मोठी असते, पण सापडलेला अनुभवही त्याहून मोठा असतो,’ असे त्यांनी स्वतःच लिहिले आहे. खानोलकरांच्या कविता, कादंबर्‍या, नाटके अशा सर्वच लेखनामधून हे विधान प्रत्ययाला येते.

     ‘खानोलकर हे मूलतः कवीच आणि ह्या कविपिंडानेच त्यांच्या कथा, कादंबर्‍या आणि नाटके हे इतर आविष्कारही भारले गेले आहेत’ असे समीक्षक माधव आचवल यांनी खानोलकरांविषयी लिहिले आहे. खानोलकर कशाचा शोध घेत आहेत, याविषयी याच ओघात आचवल लिहितात, ‘अस्तित्वाच्या मुळापाशी असलेल्या कोणत्यातरी रहस्याशी ते झुंज घेत असतात. कोणत्या? मला वाटते ‘फेट’ आणि ‘फ्रीविल’- माणसाच्या आशा-आकांक्षांपासून पूर्णपणे अलिप्त असलेली, पूर्वनियोजित, स्वयंभू अशी नियती आणि आपले आयुष्य आपल्याला हवे तसे स्वेच्छेने घडविता येण्याचे माणसाचे स्वातंत्र्य (ज्याला आपण ‘आत्मस्वातंत्र्य’ म्हणू) या दोहोंतले नाते खरोखर काय असते या प्रश्नाशी, या रहस्याशी ते झुंज घेतात.’ या विधानाच्या आधारे खानोलकरांच्या बहुतेक सर्व साहित्याची संगती लावता येते. आचवलांनी ‘जास्वंद’मधील आपल्या लेखात खानोलकरांच्या कादंबर्‍यांपुरती ही संगती लावलीही आहे.

     खानोलकरांच्या एकूणच लेखनात बौद्धीकतेचा बडिवार नाही. भावनेला ते महत्त्वाचे स्थान देतात. भावनेचा ओलावा जपत ते अनुभवाला न्याहाळतात. त्यांच्या या वैशिष्ट्याची नोंद त्यांच्या कवितांच्या आणि नाटकांच्या आधारे स्वतंत्रपणे घेता येते. त्यांना ‘विपरिताची चाहूल’ सतत जाणवत असे. जन्मत्या जीवाला जो दुःखयोग आयुष्यभर सोसायचा असतो, त्याची कृष्णछाया त्यांना जिवाच्या जन्मक्षणापासून दिसू लागते. ‘नियती ही सर्वसाक्षी आणि सर्वभक्षी. आपण तिच्या खेळातले केवळ एक पात्र’ ही जाणीव त्यांना प्रारंभापासून होती आणि तरीही, नियतीशी झुंज घेणे त्यांना अमान्य नव्हते. खरे-खोटे, पाप-पुण्य, योग्य-अयोग्य यांच्या सीमारेषांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला.

     आरती प्रभूंची प्रकृती भावकवीची होती. परिस्थिती, निराशादायक अनुभव, त्यातून अपरिहार्यपणे आलेली गतानुगतिकता, मागितलेले मागणे आणि मिळालेले दान यांतील तफावत अशा अनेक बाबींमुळे त्यांच्यातला भावकवी झाकोळत गेला. कधीकधी विलक्षण कोरडा झाला. तरीही मनाच्या तळाशी असलेला आशावाद, सुस्थिर जीवनाची ओढ व ‘प्रकृती’विषयीचे ममत्व यांच्या खुणा त्यांच्या कवितांमध्ये, नाटकांमध्ये अवश्य राहिल्या.

     ‘नक्षत्रांचे देणे’मधील आरती प्रभूंचा उद्गार व नाटकांमधून येणारा चिं.त्र्यं.खानोलकरांचा उद्गार हा ‘समष्टीतील एका’चा उद्गार आहे. ‘समष्टीतील एका’चा उद्गार कुसुमाग्रजांचा होता व काही प्रमाणात मर्ढेकरांचाही होता. पण या दोहोंच्या उद्गारांहून आरती प्रभूंचा उद्गार वेगळा आहे व या वेगळेपणाची बीजे आरती प्रभूंच्या वेगळ्या अशा वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वात आहेत. ‘आपण माणसे गर्दीत आलो की थोडी खोटी होतो व खोलीत आलो की खरी होतो’ असे ते मानीत. त्यांनी एकांतातील आपल्या व्याकुळतेला कवितारूप दिले, त्यामुळे कवितेत सखोल आत्मपरता अवतरली. नाटक लिहिताना त्यांनी गर्दीतील सुरक्षितता स्वीकारली, त्यामुळे आत्मपरता काहीशी उणावली.

‘बोले अखेरचे तो, आलो इथे रिकामा

सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे’

असे म्हणत-म्हणत ह्या भावकवीने २६ एप्रिल १९७६ रोजी या जगाचा अकालीच निरोप घेतला.

     आरती प्रभूंच्या स्मरणार्थ सावंतवाडीच्या चिंतामणी साहित्य सहयोग या संस्थेने ‘आरती’ या नावाचे वाङ्मयीन मासिक सुरू केले. पंचवीसहून अधिक वर्षे हे मासिक प्रसिद्ध होत आहे. कुडाळ येथे कुडाळ हायस्कूलच्या रंगमंचाला आरती प्रभूंचे नाव दिलेले आहे. तेथे नाट्यविषयक अनेक उपक्रम चालतात. आरती प्रभूंची समग्र वाङ्मयसूची जया दडकर यांच्या ‘चिं.त्र्यं. खानोलकरांच्या शोधात’ या पुस्तकात समाविष्ट आहे.

- डॉ. विद्याधर करंदीक

खानोलकर, चिंतामण त्र्यंबक