माने, लक्ष्मण बापू
लक्ष्मण बापू माने यांचा जन्म निरगुडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे कैकाडी या भटक्या जमातीत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अनेक गावांतून झाले, तर मॅट्रिक फलटण येथून पूर्ण केले. त्यांनी उच्च शिक्षण कोल्हापूरच्या कीर्ती कॉलेजमध्ये घेतले. ‘समाजवादी युवक दला’चे कार्यकर्ते व ‘भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थे’चे अध्यक्ष झाले. १९८८ साली त्यांनी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून कार्य केले.
लक्ष्मण माने यांची ‘उपरा’ (१९८०), ‘बंद दरवाजा’ (१९८४), ‘विमुक्तायन’ (१९९७) ही महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली. विधानसभेत भटक्या, विमुक्तांच्या समस्या मांडणार्या भाषणाचे ‘भटक्याचे भारूड’ हे संपादित पुस्तक प्रकाशित झाले आहे.
भटक्या-विमुक्तांचे शोषण, जुनाट रीती, परंपरा, अंधविश्वास आणि भटक्या-विमुक्तांवर होणारे अन्याय-अत्याचार हे लक्ष्मण मानेंच्या लेखनाचे मूलभूत विषय आहेत. त्यांच्या लेखनातून भटक्या-विमुक्त समाजाचे दैन्य, दुःख त्यांनी चव्हाट्यावर मांडले. १९७२पासून भटक्या-विमुक्तांची चळवळ चालवणारे लक्ष्मण माने आपल्या अनुभवाला शब्दरूप देतात. ‘उपरा’ या आत्मकथनातून केवळ वेदना आणि विद्रोहाचा सूर लावण्याचा लक्ष्मण माने यांचा हेतू नाही.‘उपरा’मध्ये जेवढे लक्ष्मण माने आहेत, तेवढाच कैकाडी समाज आहे. कैकाडी जमातीच्या जातपंचायतीचे आणि समाजजीवनाचे सूक्ष्म तपशिलांसह चित्रण मानेंनी केले आहे. कैकाडी भाषेचा मुक्त वापर माने या आत्मकथनात करतात.
‘बंद दरवाजा’ या पुस्तकात भटके-विमुक्त, गुन्हेगारीचा शिक्का घेऊन अपमानित जगणे जगणार्या समाजाचा आढावा घेतला आहे.‘विमुक्तायन’ या पुस्तकात भटक्या-विमुक्त समाजाचा इतिहास, त्यांच्या समस्या यांची मांडणी करून त्यांनी या पुस्तकात काही शिफारशी सुचवल्या आहेत.
‘उपरा’ या आत्मकथनास साहित्य अकादमी पुरस्कार लाभला (१९८१). पुण्याच्या केसरी-मराठा संस्थेचा तात्यासाहेब केळकर पुरस्कार, फोर्ड फाउण्डेशन, न्यूयॉर्क या संस्थेकडून दोन लाखांची आर्थिक मदत व परदेश दौरा भारती विद्यापीठ पुरस्कार, दैनिक ‘केसरी’मध्ये, ‘पालावरचं जग’ हे सदर चालू असताना पु.ल.देशपांडे यांच्या प्रयत्नांतून डॉ.होमी भाभा फेलोशिप मिळाली. भारत सरकारचा ‘पद्मश्री’ हा पुरस्कार मिळाला.
१९८९साली त्यांनी नंदूरबार येथे झालेल्या चौथ्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व पंधराव्या अस्मितादर्श लेखक, वाचक मेळाव्याचे (रत्नागिरी) अध्यक्षपद भूषविले.
लक्ष्मण मानेंची ही साहित्यिक कामगिरी असली तरी ते स्वतःला कायम कार्यकर्ता समजतात. ते म्हणतात, “मी लेखक नाही. मी स्वतःला रस्त्याच्या कडेचा मानतो. लेखनात मी स्वतःला गुरफटवून घेणार नाही. कारण, मला लेखक बनण्याचे आकर्षण नाही. मी चळवळी मानतो. चळवळ नसेल तर त्या लेखनावर कोणताही अर्थ राहत नाही.”
भटक्या-विमुक्तांच्या स्थितिगतीचे लेखन करताना लक्ष्मण माने आपल्या कृतीतून समाजाच्या विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणत आहेत.