Skip to main content
x

लिंबाळे, शरणकुमार हणमंता

     शरणकुमार हणमंता लिंबाळे यांचा जन्म अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत व चपळगावच्या ग्रामीण विद्यालयात झाले. १९७४ साली ते एस.एस.सी. झाले. दयानंद महाविद्यालयामधून १९७८ साली बी.ए. झाल्यावर त्यांनी एम.ए.पीएच.डी. पदव्या संपादन केल्या.

     ‘अक्करमाशी’ या आत्मनिवेदनात ते म्हणतात, “मला माझा इतिहास माझ्या आईपुरता सांगता येईल. जास्तच झालं तर आईच्या आईपुरता. यापलीकडे मला माझं कूळ नाही... माझी आई महार, तर वडील लिंगायत. आई झोपडीत, तर बाप माडीत. वडील जमीनदार तर आई भूमिहीन. मी अक्करमाशी. गाव, भाषा, आई, वडील, जात, धर्म या सर्वच बाबतींत मी दुभंगलेला. व्यक्तिमत्त्व हरवलेला... माझा जन्मच अनैतिक ठरवला गेला.... माझे शब्द म्हणजे माझे अनुभव. आयुष्यातून अनुभवांना वजा केले तर शिल्लक काय राहील? एक सजीव कलेवर. माझी आई समाजव्यवस्थेची बळी आहे याचं आकलन मला दलित चळवळ व दलित साहित्यातून झालं. मी अक्करमाशी म्हणून, मी अस्पृश्य म्हणून, मी दरिद्री म्हणून जे जीवन जगलो; तेच शब्दांत मांडलं आहे. ही आत्मकथा जशी माझी आहे, तशी मी ज्या समाजात वाढलो आणि ज्या गावात जगलो, त्यांचीही आहे.”

     ‘राणीमाशी’ हे त्यांचे ‘भावविश्व’ आहे. ते निवेदन करतात, “राणीमाशी एक मधमाशी, जिच्याबरोबर नराचा संयोग झाला की तो मरतो. वापरणं व मारणं ही तर राणीमाशीची प्रवृत्ती, जी माणसातही असते. अशी माणसं मला भेटली, ज्यांच्यामुळं ही पानं भरली.” त्यांच्या विविध साहित्यांत ‘उत्पात’ (१९८२) व ‘श्वेतपत्रिका’ (१९८९) हे कविता संग्रह; ‘हरिजन’ (१९८८), ‘रथयात्रा’ (१९९२), ‘दलित ब्राह्मण’ (१९९७) हे कथासंग्रह; ‘भिन्न लिंगी’ (१९९१) व ‘उपल्या’ (१९९८) या कादंबर्‍या; ‘अक्करमाशी’ (१९८४), ‘बारामाशी’ (१९८८), ‘पुन्हा अक्करमाशी’ (१९९९) ही आत्मनिवेदने प्रकाशित असून ‘अक्करमाशी’चे हिंदी, कन्नड, पंजाबी व इंग्लिश ह्या भाषांत अनुवादही झाले, आहेत.

     त्यांच्या संपादित साहित्यात ‘दलित प्रेम कविता’ (१९८६), ‘भारतीय रिपब्लिकन पक्ष’ (१९९२), ‘मराठी वाङ्मयातील नवीन प्रवाह’ (१९९३), ‘ज्ञानगंगा घरोघरी’ (२०००) आदी ग्रंथांचा समावेश आहे. अन्य साहित्यात ‘भारतीय दलित पँथर’ (१९९२) या वैचारिक लेखनाचा व ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ (१९९६) या समीक्षात्मक लेखनाचा विशेष उल्लेख करावा लागेल.

     - संपादक मंडळ

लिंबाळे, शरणकुमार हणमंता