Skip to main content
x

कोगजे, राजाभाऊ केशव

       राजाभाऊ केशव कोगजे यांचा जन्म पुण्यात, मामाच्या घरी झाला. राजाभाऊंचे वडील केशवराव मूळचे रत्नागिरीचे व आई सुशीलाबाई पुण्याच्या होत्या. वडील रेल्वेत नोकरीला असल्याने कुटुंबाचे गावोगावी स्थलांतर होत असे.

बालवयातली गानप्रतिभा बघून आरंभी राजाभाऊंच्या वडिलांनी त्यांना गायनाचे धडे दिले. नंतर जबलपूरला पं. गोविंदबुवा मुलतापीकरांकडे रीतसर शिक्षण सुरू झाले. गोविंदबुवांनी राजाभाऊंना ग्वाल्हेर घराण्याची तालीम दिली. पण गोविंदबुवांची प्रकृती ठीक राहत नसल्यामुळे त्यांनी राजाभाऊंना पुण्याला, पं. विनायकबुवा पटवर्धनांकडे जाण्यास सांगितले.

राजाभाऊ १९३९ मध्ये आपल्या जन्मग्रामी गांधर्व महाविद्यालयात दाखल झाले. पं. विनायकबुवांचे योग्य मार्गदर्शन, भरपूर रियाज, आत्मविश्वास यांच्या बळावर विविध गीतशैलींवर अधिकार संपादन करून राजाभाऊंनी ग्वाल्हेर घराण्याचे गायक म्हणून आपले नाव प्रस्थापित केले. ख्यालाबरोबरच ठुमरी व टप्पा गायकीचेही शिक्षण त्यांनी बाई रसूलनबाईंकडून घेतले. ते हार्मोनियमही उत्तम वाजवत.

नागपूर आकाशवाणीवर त्यांनी १९४७ ते १९५२ पर्यंत स्टाफ आर्टिस्ट म्हणून काम केले. प्रारंभापासूनच राजाभाऊ नागपूर आकाशवाणीचे ‘अ’ दर्जाचे गायक होते. भारतातल्या अनेक केंद्रांतून त्यांचे कार्यक्रम होत असत. राजाभाऊंचे कार्यक्रम भारतभर झाले आणि नंतर सर्वोच्च दर्जाचा सन्मान मिळविणारे ते एकमेव वैदर्भीय ठरले.

नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये १९५४ साली संगीत विषय सुरू झाला. तिथे १९५५ मध्ये प्रा. राजाभाऊ कोगजे संगीताध्यापक म्हणून नियुक्त झाले. राजाभाऊंची शिकविण्याची हातोटी उत्तम होती. रागातल्या जागा, शब्दार्थ, लयकारी, राग सांभाळून वाचक आलापी व तनाईत क्रिया हुबेहूब साधल्या पाहिजेत हा त्यांचा कटाक्ष असे. त्यांच्या प्रमुख शिष्यांत राजा बोबडे, अरुण कशाळकर, नारायण मंगरूळकर, पुष्पा शास्त्री, अनिरुद्ध देशपांडे, सरिता भावे इ. उल्लेखनीय आहेत.

राजाभाऊ विभागप्रमुख म्हणून कार्य करून यथावकाश  सेवानिवृत्त झाले. राजाभाऊंना स्व. शंकरराव प्रवर्तकांनी ‘संगीत शेखर’ पदवी देऊन गौरवान्वित केले होते.

नारायण मंगरूळकर

कोगजे, राजाभाऊ केशव