Skip to main content
x

घोरपडकर, वसंत शंकर

संत शंकर घोरपडकर यांचा जन्म आजोळी, पुणे जिल्ह्यातील ओतूर या गावी झाला. पखवाजवादनाची तालीम त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली. इंदूर येथील सुप्रसिद्ध पखवाजवादक नानासाहेब पानसे यांचे ते शिष्य होत. शंकर घोरपडकर यांना तबला, सारंगी आणि गाण्याचेही चांगले ज्ञान होते. लहानपणापासूनच वसंत घोरपडकर घरामधल्या संगीतमय वातावरणात वाढले.  ते १९४४ पर्यंत म्हणजे त्यांच्या वडिलांच्या निधनापर्यंत त्यांच्याकडून पखवाज आणि तबलाही शिकले.
ते १९४५ मध्ये मॅट्रिक झाल्यावर तबला व पखवाजाची साथ करू लागले होते, तरीही चरितार्थासाठी १९५० सालापासून ते पुणे महानगरपालिकेत नोकरी करू लागले. त्यांनी १९८२ मध्ये गणनाधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर पखवाजवादनावर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित केले व नंतर स्वतंत्र वादन, साथसंगत आणि विद्यादानाचे कार्य केले.
घोरपडकरांचे १९५० पासूनच पुणे आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम सुरू झाले. पखवाजवादनातील सर्वोच्च श्रेणीचे कलाकार असलेल्या घोरपडकरांचे आकाशवाणी व दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणांमध्येही कार्यक्रम झाले. स्वतंत्र वादन आणि धृपद गायनाची साथसंगत अशा दोन्ही प्रकारे त्यांनी आपले पखवाजवादन विकसित केले. इंदूर, अहमदाबाद, मुंबई, सिंगापूर, मलेशिया आणि फ्रान्स येथेही त्यांनी पखवाजवादन सादर केले. अत्यंत निगर्वी आणि विनम्र स्वभाव असलेल्या घोरपडकरांची तबलावादक पं. सुरेश तळवलकरांबरोबर सहवादनाची ध्वनिफीत प्रसिद्ध आहे. त्यांचे २००२ मध्ये चौताल, धमार, तेवरा, मत्त, झंपा आणि विश्व या तालांतील एकलवादन आणि पखवाजवादनाची माहिती सांगणाऱ्या मुलाखतीचा समावेश असलेल्या दोन ध्वनिचकत्यांचा संचही कलापिनी संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला.
पुण्यातील प्रसिद्ध जोगेश्वरी मंदिराच्या पूजेची व्यवस्था गेली अनेक वर्षे बघणाऱ्या घोरपडकरांनी त्यांच्या वडिलांप्रमाणेच पुण्यातील बेलबाग मंदिरात ४५ वर्षे सेवा म्हणून पखवाजवादन केले.
पं. घोरपडकरांनी धृपद गायक डागर बंधू, उ. सैफुद्दिन डागर, पं. फाल्गुनी मित्रा, उ. झिया मोइन्नुद्दिन डागर आणि भरतनाट्यम नर्तिका सुचेता भिडे यांना साथ केली. त्यांच्याकडून मिळालेल्या बंदिशींचा समावेश अनेक कथक नृत्यांगनांनी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये केला. याशिवाय त्यांनी पखवाज आणि पखवाजवादनातील बंदिशी या विषयांवर पुणे, मुंबई, गोवा, औरंगाबाद या ठिकाणी सप्रयोग व्याख्यानेही दिली. ख्यालगायनाच्या प्रसारामुळे जशी धृपद गायकी मागे पडली, तसा पखवाजाचाही वापर कमी होऊ लागला. अशा वातावरणात पखवाजाला स्वतंत्र वाद्याचे स्थान मिळवून देण्यात पं. घोरपडकरांनी मोलाची कामगिरी केली आहे.
घोरपडकरांनी पखवाजावर प्रस्तार, रेले, परण (पखवाजातील जोरदार वाजणारी रचना), तिहाई असे प्रकार वाजवून रसिकांना लुब्ध केले. पखवाजावर हाताने ठेका वाजवून वेगवेगळ्या रचनांची पढंत करणे (तोंडाने बोल म्हणणे) हे त्यांचे वैशिष्ट्य होते. पानसे घराण्यातील मात्राभेद परण (समेनंतर अर्ध्या मात्रेच्या फरकाने सुरू होणारे परण) ते वाजवतच; पण त्याशिवाय त्या घराण्यात प्रचलित नसलेल्या श्री गणेश परण, दत्त परण, दुर्गा परण आणि शिव परण या ईशस्तुतिपर परणांची त्यांनी रचना केली.
नानासाहेब पानसे घराण्याच्या समृद्ध परंपरेतील सौंदर्यपूर्ण रचनांचा संग्रह असलेले पं. घोरपडकर हे एक
  महत्त्वाचे कलाकार होते. घराण्यातील रचनांचे सौंदर्य आणि त्यांच्या साहित्यातील विविधता व श्रीमंती त्यांनी जपली व विद्येचा दर्जा राखला हे पं. वसंत घोरपडकर यांचे पखवाजवादनातील योगदान आहे.
त्यांना इंदूरच्या धृपद कला केंद्राचा ‘नानासाहेब पानसे’ पुरस्कार १९९९ मध्ये
  मिळाला. त्यानंतर २००५ मध्ये मित्र फाउण्डेशन, पुणे; २००७ मध्ये महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद; मृदंगज्ञान संस्था, देवाची आळंदी; २००८ मध्ये भारत विश्वज्ञान पीठम्, पुणे, तसेच दिल्ली पब्लिक स्कूल, पुणे या संस्थांतर्फे पखवाजवादनातील तपश्चर्येबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. घराणेदार विद्येची अत्यंत निष्ठेने जपणूक करून आपल्याला मिळालेली पखवाजवादनाची कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य पं. वसंत घोरपडकर ६० वर्षांहून अधिक काळ करत होते. त्यांचे वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी पुण्यात निधन झाले

      अरविंद परांजपे

 

घोरपडकर, वसंत शंकर