Skip to main content
x

माटे, मधुकर श्रीपाद

    प्राध्यापक मधुकर श्रीपाद माटे यांच्या गेल्या अर्धशतकाच्या काळातील, ज्ञानक्षेत्रातील कार्याचा विचार करताना तीन-चार ठळक अशा शाखा दिसतात, की ज्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, भर घातली आहे. पहिली शाखा ‘ज्ञानदान’ ही आहे. १९५४पासून डेक्कन महाविद्यालयामधील ‘पुरातत्त्व आणि प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती’ या विषयाच्या विद्यार्थ्यांना, प्राचीन भारताचा इतिहास, प्राचीन समाजव्यवस्था, प्राचीन भारतीय कला-शिल्प हे विषय, त्यांच्या निवृत्तीपर्यंत म्हणजे पस्तीस वर्षे ते शिकवत होते. हे विद्यार्थी पदव्युत्तर वर्गातील असत. ते पीएच.डी.चे मार्गदर्शकही होते.

     विद्यार्थ्यांबरोबर नेहमी विचारांची देवघेव करणे, त्यांना प्रश्न विचारण्यास उद्युक्त करणे हा त्यांच्या अध्यापनपद्धतीचा विशेष होता. याविषयी ते एके ठिकाणी म्हणतात की, ‘या संग्रहातील निम्मे तरी निबंध अशा वैचारिक भूमिकेचा आधार होता. भारतातील राजकीय सत्तांचा उदय व र्‍हास, महापुरुषांची कर्तबगारी व त्यावरील मर्यादा या तेथील भौगोलिक परिस्थितीने, भूपृष्ठरचनेने ठरतात; वंश, धर्म, जात, अर्थ या आजपर्यंत निर्णायक ठरवण्यात आलेल्या घटकांइतकीच किंबहुना काही अधिकच निर्णायक ठरतो ‘भूगोल’, असा विचार ते मांडतात आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देतात. १६७७मध्ये गोवळकोंड्याच्या सुलतानांशी सख्य करून आल्यावर, विजापूर दरबारच्या सेवेत असणार्‍या मालोजी घोरपडे या सरदारास, या जुटीत सामील होण्याचे आवाहन महाराजांनी एका दीर्घ पत्रात केले असून त्यातले सर्वांत महत्त्वाचे वाक्य, ‘दक्षणचे राज्य दक्षिणियांचे हाती राहावे ते करावे, उत्तरेचा पठाण नको.’

     प्रा. माटे यांचे दुसरे कार्यक्षेत्र म्हणजे पुरातत्त्व विद्या आणि त्यातले संशोधन. १९५२पासून त्यांचे गुरू प्रा. ह. धी. सांकलिया यांचे त्यांना सतत मार्गदर्शन व उत्तेजन मिळाले, याचा ते अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. पुरासंशोधनात ज्या-ज्या गोष्टींची दखल घ्यावी लागते, अन्वयार्थ लावावा लागतो, त्यात अभिलेख, वास्तुशिल्प, मूर्तिशिल्प, चित्रकला, नाणी अशा सगळ्यांचा समावेश करण्यात येतो. त्याशिवाय पुरातत्त्व संशोधनाचे अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचे साधन म्हणजे उत्खनन. माटे यांना दोन्ही अंगांचा उत्तम परिचय झाला. त्यांचा डॉक्टरेट पदवीचा प्रबंध ‘मराठा आर्किटेक्चर’ असा आहे. राजवाडे यांनी भले इतिहासात कोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात याची नोंद केलेली असेल मात्र त्यांच्यानंतर जे मराठी इतिहास-संस्कृती यांचे अभ्यासक आले; त्यांनी आपल्या गुरूच्या या सांगण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे महाराष्ट्राला, विशेषत: मराठेशाहीला, शिल्प, चित्र यांचे वावडेच होते असा समज रूढ झाला.

     प्रा. माटे यांनी महाराष्ट्रात सर्वत्र फिरून, मराठेशाही दुर्ग, नगरे, वाडे, मंदिरे अशा सर्वांची नोंद व वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला आणि खास ‘मराठी’ म्हणावी अशी शिल्पकला येथे निर्माण झाली आहे, हे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांच्याच उत्तेजनाने लघुचित्रे, भित्तिचित्रे, पोथीचित्रे या सगळ्यांचा शोध व अभ्यास त्यांच्या शिष्यांनी केला व मराठी चित्रशैली अस्तित्वात होती, हे सप्रमाण सिद्ध केले.

     आपल्याला प्राप्त झालेल्या उत्खनन विद्येचा उपयोग करून पुरातत्त्वविद्येत, देवगिरी येथे त्यांनी नऊ वर्षे उत्खनन केले. यादवकाळापासून ते अठराव्या शतकापर्यंत नगर आखणी, वाडे, मंदिरे, भूमिगत पाणीपुरवठा, दुगर्रचना अशा गोष्टी हाती घेऊन त्यांनी मध्ययुगीन नागरसंस्कृतीचा पूर्ण पट उलगडला.

     अहमदनगर, विजापूर ही राजधानीची शहरे होती मात्र तेथे एकोणिसाव्या-विसाव्या शतकात नवनवी बांधकामे होत गेली आणि मध्ययुगीन नगररचना, नागरसंस्कृती लुप्तच झाली होती. देवगिरी-दौलताबाद येथील नगररचनेचे अवशेष पुरातत्त्व विभागाने सुरक्षित राखले म्हणून येथील अवशेष हे मध्ययुगीन संस्कृतीचे एकमेव साक्षीदार ठरतात.

     येथे गवसलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनांपासून स्फूर्ती घेऊन माटे यांनी, प्राचीन शिल्पशास्त्रे, शिलालेख आणि प्रत्यक्ष अवशेष यांचा शोध घेऊन जवळपास दोन हजार वर्षांच्या काळातील भारतीय समाजाने उपलब्ध पाण्याचा केलेला वापर, त्याचे तंत्र व मंत्र हे सर्व अभ्यासकांसमोर मांडले. अशा रितीने इतिहास व पुरातत्त्व या दोन्हीच्या साहाय्याने माटे यांनी मध्ययुगीन मराठी/दख्खनी संस्कृती उजेडात आणली आहे, असे म्हणता येते.

     पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळाचे ते १० वर्षे कार्यवाह होते. मराठी व इंग्लिश भाषेमध्ये त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. मराठा आर्किटेक्चर, इस्लामिक आर्किटेक्चर ऑफ डेक्कन, टेम्पल्स अ‍ॅड लिजन्डस् ऑफ महाराष्ट्र, वॉटर मॅनेजमेंट व हायड्रालिक टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया, तारिफे-इ-हुसेनशाही, प्राचीन भारतीय कला, प्राचीन कलाभारती, मध्ययुगीन कलाभारती, मध्ययुगीन महाराष्ट्र : सामाजिक आणि सांस्कृतिक ही त्यांची आजपर्यंत प्रसिद्ध झालेली ग्रंथसंपदा आहे.

   — डॉ. गिरीश मांडके

माटे, मधुकर श्रीपाद