Skip to main content
x

कुलकर्णी, धोंडूताई गणपत

धोंडूताई गणपत कुलकर्णी यांचा जन्म कोल्हापूर येथे  एका कलाप्रेमी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सोनाताई होते. त्यांचे वडील शालेय शिक्षक होते व ते ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकले होते. कोल्हापूरसारख्या सांगीतिक वातावरण असलेल्या शहराचा त्यांना फायदा झाला. ज्या काळात पांढरपेशा समाजात गायनाचे शिक्षण किंवा गायनाला अजिबात प्रतिष्ठा नव्हती, त्या काळात धोंडूताईंच्या वडिलांनी त्यांना गायनाचे शिक्षण देण्याचे धाडस दाखविले आणि धोंडूताईंनी त्याचे चीज केले.
सुरुवातीला जयपूर घराण्याचे अध्वर्यू उ. अल्लादिया खाँ यांचे भाचे नथ्थन खाँ यांच्याकडे धोंडूताई तीन वर्षे शिकल्या व त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली. वयाच्या आठव्या वर्षापासून त्या आकाशवाणीवर गाऊ लागल्या. नंतर उ. अल्लादिया खाँ यांचे पुत्र भूर्जी खाँसाहेबांकडून त्यांनी १९४० ते १९५० अशी दहा वर्षे शिक्षण घेतले व या काळात त्या स्वतंत्रपणे मैफलीही करू लागल्या. त्या व भगिनी शकुंतला या सहगायनही करत असत.
त्या १९५७ पासून बडोद्याच्या दरबार गायिका लक्ष्मीबाई जाधव व अल्लादिया खाँसाहेबांचे नातू अजिजुद्दिन खाँ ऊर्फ बाबा यांच्याकडे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन शिकल्या. केसरबाई केरकर यांची तालीम मिळावी म्हणून त्यांनी व वडिलांनी खूप प्रयत्न केले. कोल्हापूरचे घर विकून ते मुंबईत स्थायिक झाले. अखेरीस त्यांना यश मिळून त्यांना केसरबाईंची तालीम १९६२ ते १९७१ या काळात लाभली. केसरबाईंच्या त्या एकमेव शिष्या होत.
जयपूर घराण्यातील खास खुला आकार, पेचदार आलापचारी व बोलतान, वक्रगतीची तानक्रिया, अनवट व जोडरागांची पेशकश ही धोंडूताईंच्या गायकीची वैशिष्ट्ये आहेत. आपले स्वतःचे गायकीबद्दलचे विचार कसोशीने जपणाऱ्या आणि लोकप्रियता मिळविण्यासाठी तडजोड न स्वीकारणार्‍या काही गायिकांपैकी धोंडूताई आहेत. आपल्या कलामूल्यांबाबत धोंडूताई अतिशय जागरूक आहेत. जयपूर परंपरेत आपले वेगळे काही करावे असे त्यांना वाटत नाही. आपल्या गायकीची खोली आणि गांभीर्य ज्याने-त्याने जपावे, अशा मताच्या त्या आहेत. हलक्या तडजोडी त्यांना मान्य नाहीत. आपली विशुद्ध संगीतकला जोपासण्यासाठी त्या संसारविन्मुख झाल्या. व्रतस्थ राहून कला जोपासणे याचा पुढच्या पिढीसाठी एक आदर्श त्यांच्या व्यक्तित्वात दिसतो.
आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार म्हणून धोंडूताईंनी अनेक वर्षे गायन केले. केसरबाई केरकर संगीत संमेलनात त्यांचे प्रतिवर्षी गायन होते व संमेलनाच्या अखेरीस गाण्याचा मान त्यांचा असतो. त्यांच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या. ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९९०),
  ‘आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी’ पुरस्कार (२००४), ‘देवगंधर्व’ पुरस्कार (२०१०), इ. देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. नमिता देवीदयाल या धोंडूताईंच्या शिष्येने धोंडूताई, केसरबाई व अल्लादिया खाँ यांच्या संगीतपरंपरेवर ‘म्युझिक रूम’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. २०१४ साली त्यांचे निधन झाले.  

डॉ. शुभदा कुलकर्णी

 

कुलकर्णी, धोंडूताई गणपत