Skip to main content
x

गोडसे, विष्णुभट बाळकृष्ण

     विष्णुभट गोडसे हे कुलाबा (आता रायगड) जिल्ह्यातील पेण तालुक्यात वसलेल्या वरसई गावचे स्थायिक होते. वडिलोपार्जित घरात एकत्र कुटुंबात ते राहत होते. भिक्षुकी व यजमानाघरची धर्मकृत्ये करणे, हाच त्यांचा जन्मभरचा व्यवसाय होता. वरसईलाच, वेदशास्त्रनिपुण व याज्ञिकात केवळ प्रतिसूर्यच असा लौकिक असलेल्या विद्वान विनायकशास्त्री जोशींकडे गोडसे भटजी रूपावली, समासचक्र, अमरकोश, काव्याचे काही सर्ग हे सारे शिकले आणि नंतर धर्मशास्त्र, नारायणभट्टी, निर्णयसिंधू, प्रयोगपारिजात, स्मृत्यर्थसार इत्यादी ग्रंथांचे अध्ययन करून विद्वान झाले. गरिबीने टोचण्या लावल्यामुळे त्यांनी रात्रंदिवस शिकण्याचा वसाच घेतला होता. त्यांच्या लहानपणापासूनच दारिद्य्र मागील दारी, पुढील दारी फुगड्या घालीत होतेच; म्हणून द्रव्यप्राप्तीसाठी ते याज्ञिकी करू लागले.

     गोडसे भटजी गोरेपान, उंच, भव्य, तेजस्वी होते. स्वभावाने तापट, दरारा वाटावा असे होते. दृढनिश्चयी, धीट, रोखठोक, हजरजबाबी असले तरी काहीसे भोळसटही होते. धर्मशास्त्रात पारंगत असले, तरी पारमार्थिक दृष्टी नसलेले, प्रवृत्तिमार्गाचाच कल असलेले होते. चौकस होते म्हणूनच बंडाच्या धामधुमीत सापडले, तेव्हा बंडवाल्यांकडून बंडाच्या हकिकतींची सविस्तर माहिती मिळवली. असे जरी असले, तरी त्यांना बंडामागे कोणते राजकारण आहे, हे जाणण्याची दृष्टी व समज नव्हती. प्रवासात वाटेत आलेली तीर्थक्षेत्रे, धार्मिक अनुष्ठाने व त्यानिमित्त झालेली भोजने ह्यांचे ते इत्थंभूत आणि चवीने वर्णन करतात. शास्त्री- वैदिकांबद्दल सांगतात पण राजकीय व्यक्ती, शहरे, किल्ले यांच्याबद्दल काही सांगत नाहीत. (अपवाद : झाशी शहर, झाशीचा किल्ला आणि राणी लक्ष्मीबाई ह्यांचा). बायकांबद्दल पुष्कळ गोष्टी वर्णन करतात; ह्याचे कारण त्यांचा भिक्षुकीचा व्यवसाय होय.

     आयुष्याखेरीज  त्यांच्या कर्तृत्ववान मुलामुळे (वेदशास्त्र संपन्न नरहरशास्त्री गोडशांमुळे- गीतेवर गुजराती भाषेत मुंबईला प्रवचने करून त्यांनी लौकिक मिळवला होता.) त्यांना चांगले दिवस आले, पण त्यांचा अंत मात्र करुणाजनक झाला. त्यांनी उत्तरवयात क्षेत्रसंन्यास घेतला होता. पण नातू आजारी पडला- अत्यवस्थ झाला, तेव्हा त्याचा मृत्यू पाहावा लागणार या शंकेने देवळातल्या देवाची पूजा आटपून तडक घरातल्या देवघरात गेले आणि देवाशी नातवाच्या अवस्थेबद्दल भांडू लागले. नंतर देवापुढचे हळदीकुंकू घेऊन सुनेला मुलाच्या (नातवाच्या) कपाळी ते लावायला सांगितले- म्हणाले, “घाबरायचे कारण नाही, मुलगा बरा होईल.” नातू बरा झाला. त्याला आजोळी पाठवून दिले. पण इकडे भटजींना अतिशय थकवा वाटू लागला आणि त्यांनी जे अंथरूण धरले, ते शेवटपर्यंत सोडले नाही. इष्टदेवाचे ध्यान करीत-करीतच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

     ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे मथुरेला ‘सर्वतोमुख’ यज्ञ करणार होत्या- ७/८ लाख रुपये धर्मादाय करणार होत्या. त्या यज्ञात भाग घ्यावा, म्हणजे काही धनप्राप्ती होईल अशा हेतूने ते व रामभटकाका उत्तर हिंदुस्थानात गेले. (त्याच वेळी वरसईतील आणखी काही ब्राह्मण मंडळीही यज्ञानिमित्त गेली होती.) दोघेही बंडात सापडले. त्यांच्यावर अनेक संकटे कोसळली. चोरांनी लुबाडले. मृत्यूच्या भयाने झाशीला लपून बसण्याचा भयंकर प्रसंग ओढवला.

     गोडसे भटजी प्रवासामध्ये आलेल्या विशेष अनुभवांची टिपणे जेव्हाची तेव्हा करून ठेवणारे होते. त्यांना बंडाबाबतची वस्तुस्थिती जशीच्या तशी कळावी, अशी तीव्र इच्छा होती. परंतु २६ वर्षांनी लिहायला बसल्यामुळे सारी टिपणे जवळ राहिली नव्हती, असेही झाले आहे. त्यांनी हे लेखन करण्याचे कारण म्हणजे आपल्या वंशजांना झाला प्रकार समजण्याचे साधन उपलब्ध व्हावे. सुना, लेकी, मुले मोठे झाले की त्यांना आपण लिहिलेला मजकूर गोडसे भटजी वाचून दाखवत असत. हा क्रम जवळपास सहा महिने चालू होता.

     तारीख ३०मार्च १८५७ ह्या दिवशी गोडसे भटजी व त्यांचे काका ह्यांनी उत्तर हिंदुस्थानच्या प्रवासाला सुरुवात केली. महू-उज्जैन-धार, पुन्हा उज्जैन-ग्वाल्हेर असे ते पहिल्या टप्प्यात गेले. २३ ऑक्टोबर १८५७ रोजी ते ग्वाल्हेरहून झाशीला जायला निघाले ते १८२१ नोव्हेंबर, ५७ रोजी झाशीला पोहोचले. मार्च १८५८ अखेर ते झाशीत होते. सर ह्यू रोजची इंग्रजी फौज २१ मार्च १८५८ ते १० एप्रिल १८५८ झाशीच्या लढाईत गुंतली होती. ४ एप्रिल १८५८ ला झाशीचा किल्ला आणि ६ एप्रिल १८५८ रोजी झाशी शहर इंग्रजांनी जिंकले, गोडसे भटजींनी किल्ल्याची अकरा दिवसांची लढाई आणि त्याचबरोबर इंग्रजांनी झाशीत केलेले बीजन (कत्तल) व लूटही प्रत्यक्ष अनुभवली ह्याचे चक्षुर्वेसत्यं असे त्यांनी वर्णन केले आहे. इंग्रजीतील ऐतिहासिक कागदपत्रांशी ताडून पाहता गोडशांचे वर्णन अचूक असून मराठी भाषेतील ‘इतिहासा’चा पक्का दस्तऐवज म्हणून ते महत्त्वपूर्ण आहे. गोडसे झाशी सोडून काल्पीला सरकले, ते २३मे १८५८ रोजी तेथे पोहोचले. ह्या वाटेवर असतानाच एका सकाळी राणी लक्ष्मीबाईसाहेब भेटल्या. ते वर्णन असे :

     “...झुंजूमुंजूचे सुमारास एका विहिरीवर पाणी काढून शौचमुखमार्जन करण्यास बसलो तो पाच-चार स्वार विहिरीवरून जात होते. त्यात झाशीवाली दृष्टीस पडली. तिने सर्व पठाणी पोशाख केला होता व सर्व अंग धुळीने माखले होते. तोंड किंचित आरक्त असून म्लान व उदास दिसत होते. तिला तृषा फार लागली असल्यामुळे घोड्यावरूनच आम्हांस तिने तुम्ही कोण आहा असा प्रश्न केला. तेव्हा आम्ही पुढे होऊन हात जोडून विनंती केली की आम्ही ब्राह्मण आहो, आपणास तृषा लागली असल्यास पाणी काढून देतो. बाईसाहेबांस ओळख पटली व खाली उतरल्या. मी रसी व मडके घेऊन लागलीच विहिरीत सोडणार, तो बाईसाहेब म्हणाल्या की तुम्ही विद्वान ब्राह्मण, तुम्ही मजकरता पाणी काढू नका, मीच काढून घेते. हे तिचे उदारपणाचे शब्द ऐकून मला फार वाईट वाटले, परंतु निरुपायास्तव रसी व मडके खाली ठेवले. बाईसाहेबांनी पाणी काढून, त्या मृण्मय पात्रातून ओंजळीने पाणी पिऊन तृषा हरण केली. दैवगती मोठी विचित्र आहे. नंतर मोठ्या निराश मुद्रेने बोलल्या की मी आर्धा शेर तांदुळाची धनीन, मजला रांडमुंडेस विधवाधर्म सोडून हा उद्योग करण्याची काही जरूर नव्हती. परंतु हिंदुधर्माचा अभिमान धरून या कर्मास प्रवृत्त झाले व याजकरिता वित्ताची, जीविताची सर्वांची आशा सोडली. आमच्या पदरी पातकच फार म्हणून आम्हांस ईश्वर यश देत नाही... काल्पीवरही इंग्रज चालून येत आहेत, तेथे थोडक्यातच जंग होईल; जे अदृष्टात लिहिले असेल ते होईल, असे म्हणून बाईसाहेब उठल्या. आम्हीही उभे राहिलो...”

     काल्पीहून ते ब्रह्मावर्त- चित्रकूट (येथे नानासाहेब पेशवे होते. त्यांच्याकडून काही द्रव्य मिळेल ह्या आशेने गेले. चित्रकूटवरही इंग्रजांची धाड आली.) -बांदा- ब्रह्मावर्त-सूर्ययंत्रक्षेत्र- ग्वाल्हेर पुन्हा ब्रह्मावर्त (नोव्हेंबर १८५८मध्ये)- बेलासिया-  कानपूर- लखनौ- आयोध्या (रामनवमीला ११ एप्रिल १८५९)- काशी- प्रयाग (५जुलै १८५९) - मध्ये विंध्यवासिनी उरकले, पुन्हा ब्रह्मावर्त- ग्वाल्हेर- झाशी- सागर- शांडिल्याश्रय- हुशंगाबाद (ऑक्टोबर १८५९)- इंदूर- सप्तश्रृंगीदर्शन (वणी) - नाशिक - त्र्यंबकेश्वर - पुणे- वरसई अशी त्यांची भ्रमंती (खरे तर फरफटच) झाली. वरसईला ते जानेवारी १८६० मध्ये परत आले म्हणजे ३० मार्च १८५७ ते जानेवारी १८६० जवळ-जवळ तीन वर्षे त्यांचा पायी प्रवास झाला.

     त्यांच्या ‘माझा प्रवास’मध्ये आयुष्याच्या ३३ वर्षांचे इतिवृत्त येते, त्यात ही तीन वर्षे अतिशय महत्त्वाची आहेत. ते लेखक नव्हते, इतिहासकारही नव्हते; पण त्यांच्या हातून आपातत: मौलिक स्वरूपाचे लेखन नियतीने करून घेतले, हा अमृतयोगच होता. सर्व लेखन मोडी लिपीत केलेले असून एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रचलित असलेल्या मराठी भाषेचे त्यातून दर्शन घडते.

- डॉ. चंद्रकांत वर्तक

गोडसे, विष्णुभट बाळकृष्ण