Skip to main content
x

इनामदार, श्रीनिवास दिगंबर

     श्रीनिवास इनामदार हे बालकवींच्या निसर्ग-चित्रात्मक कवितांचा वारसा जपणारे कवी. लातूर या त्यांच्या मूळ गावी देशपांडे गल्लीत त्यांचे बालपण गेले. त्यांच्या घराण्यात होऊन गेलेल्या ‘सखाराम महाराज’ या सत्पुरुषाचा आध्यात्मिक वारसा त्यांच्या आई-वडिलांनी म्हणजे दिगंबरराव रंगराव इनामदार व यशोदाबाई दिगंबरराव इनामदार यांनी जोपासला होता. त्यामुळे सखाराम महाराजांची समाधी असलेल्या वाड्यात वारकरी नेहमी येत. त्यातूनच संत वाङ्मयाचे संस्कार त्यांना बालपणापासून लाभले. तशातच वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांनी त्यांना पंढरपूरला नेले. तेथे दासगणू महाराजांची भेट झाली. दासगणू महाराजांनी त्यांना आपल्या कीर्तन-आख्यानांची दोन पुस्तके आशीर्वाद म्हणून दिली. ती त्यांनी झपाटल्यागत वाचून काढली. त्यातून आपणही कविता लिहावी, असे त्यांना वाटू लागले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली.

     पुढे त्यांनी  मेळ्यांसाठी गाणीही लिहिली. ती लातूरच्या रा.श्री.दिवाण व बाबासाहेब परांजपे यांना खूप आवडली. त्यांनी इनामदारांना खूप प्रोत्साहन दिले. मग इनामदारांनी मागे वळून पाहिले नाही. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद या बँकेची प्रशासकीय अधिकारी पदावरची नोकरीही त्यांच्या काव्यलेखनाआड आली नाही. वयाच्या चौदाव्या वर्षापासून सुरू झालेले काव्यलेखन अजूनही तेवढ्याच उत्साहाने चालू आहे. त्यांचे आत्तापर्यंत एकोणीस कवितासंग्रह, दोन बालगीत संग्रह, एक नाटक प्रसिद्ध झालेले आहे व अकरा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

     ‘शिवगान’ (१९८२), ‘फूल फुलता राहिना’ (१९८८), ‘नभ मातीच्या कुशीत’ (१९८९), ‘दिंडी जाय दिगंतरा’ (१९९३), ‘निळ्या सूर्याची सावली’ (२००६), ‘प्रकाशयात्री’ (२००७), ‘मोर पंखात मावेना’ (२००७), ‘नादब्रह्म जेथे राहे’ (२००७) आदी काव्यरचना  रसिकमान्य झाली आहे. ‘सत्यं वद गोदावरी’ (१९९४) हे नाटकही त्यांनी आणि विद्याधर करन्दीकर यांनी मिळून लिहिले आहे.

      निसर्ग ही त्यांच्या कवितेची गंगोत्री आहे, तसेच दिव्यत्वाचे आकर्षण, रमणीयतेचा ध्यास, मायभूमीचे आंतरिक प्रेम, संतांविषयीचा आत्यंतिक आदरभाव या प्रेरणांमधूनही त्यांची कविता स्फुरते. निसर्ग त्यांच्या प्रतिभेला खुणावतो. त्याच्याशी नाते जुळणारी संवेदनशीलता आणि निसर्गाच्या तरलतेला पेलणारे शब्दसामर्थ्य त्यांच्याजवळ उपजतच असल्याने त्यांच्या कवितेतील निसर्ग-प्रतिमा आपल्याशी बोलू लागतात. मनःपटलावर उमटलेले निसर्गचित्र ते आपल्या भावोर्मीसह अर्थगर्भ अशा शब्दांनी अतिशय उत्कटतेने रेखाटतात. त्यांचे मन निसर्गात असे रममाण होऊन गेल्याने, निसर्गाशी त्यांचे आंतरिक नाते जोडले जाते. ह्या नात्याचाही प्रत्यय त्यांच्या कवितेमधून येतो. श्री.दि. यांची अशी तरल उत्कटतेने भारलेली कविता, बालकवींची आठवण करून देते.

      निसर्गाप्रमाणेच दिव्य विभूतिमत्त्वांचे त्यांना आकर्षण आहे. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान जीवन चरित्रावरचे तेजस्वी ‘शिवगान’, संत ज्ञानेश्वरांचे हृदयस्पर्शी जीवन-दर्शन घडविणारे ‘कैवल्याचे लेणे’ हे लघु-खंडकाव्य, प्रासादिक वाणीत व प्रसन्न शैलीत रेखाटलेले ‘अपरिग्रहाचा महामेरू’ हे भगवान महावीरांवरील कथा-काव्य, संवेदनाशील मनाने टिपलेला, कलात्म आणि भावात्म अनुभव देणारा ‘निळ्या सूर्याची सावली’ हा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन संग्रामावरील कवितासंग्रह असे उत्तमोत्तम कथा-काव्यसंग्रह त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झाले आहेत.

     एकीकडे निसर्गाच्या निसर्गपणाची जाणीव मूर्तिमंतपणे साकारणारी त्यांची शब्दकळा लावण्यवती आहे, हळुवार आहे, शालीन वळण जपणारी आहे, प्रासादिक आहे, लयबद्ध व तालबद्ध आहे तर दुसरीकडे महामानवांच्या जीवनातील वादळांना शब्दबद्ध करण्याचे सामर्थ्यही तिच्यात आहे. अष्टाक्षरी छंदावर त्यांची हुकमत आहे. त्यातूनच सुश्राव्य अशा गीतासारखा प्रत्यय त्यांची कविता देते. त्यामुळेच तिला रसिकमान्यता लाभलेली आहे. ‘मराठवाड्याचे गदिमा’, ‘कवि-कुलशेखर’ अशा पदव्या रसिकांच्या दरबारात त्यांना प्राप्त झाल्या आहेत, तसेच कै.नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार, कै.यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा भूषण पुरस्कार, राष्ट्रीय सेवाभावी पुरस्कार, इत्यादी पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.

- डॉ.संजय देशमुख

 

इनामदार, श्रीनिवास दिगंबर