Skip to main content
x

कुलकर्णी, श्रीनिवास विनायक

     श्रीनिवास कुलकर्णी यांचा जन्म कृष्णाकाठच्या सांगली जिल्ह्यातील औदुंबर या गावी झाला.त्यांचे  प्राथमिक शिक्षण औदुंबरमध्येच झाले, तर सातवीपर्यंतचे शिक्षण अंकल-खोप येथे झाले. त्यापुढील शिक्षण सांगलीच्या ‘अनाथ विद्यार्थी आश्रम’ या संस्थेत राहून त्यांनी पूर्ण केले. त्यांचे आजोबा व वडील दोघेही चित्रकार होते. या दोघांच्या सान्निध्यात होणारे कलेचे संस्कार आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे, औदुंबरच्या परिसराचा, सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम यांमधून श्रीनिवास कुलकर्णी यांचे संस्कारशील, संवेदनक्षम मन तयार झाले. लेखकाच्या शब्दांत सांगायचे तर, “अक्षर घटवावे, चित्रे काढावीत, वाचन करावे, सर्व समजून घेत असावे आणि स्वतःच्या मर्यादाही ओळखाव्यात हे शिक्षण घरातूनच मिळाले. प्रत्येक शंकेला उत्तर मिळे. निर्माण होणार्‍या प्रत्येक उत्सुकतेला समाधान देणारे- त्यातून पुढचा प्रश्न- त्यावर पुढचे उत्तर- यांतून दिसणार्‍या व न दिसता जाणवणार्‍या गोष्टींच्या तळापर्यंत जाण्याचा छंद.” (ललित, एप्रिल, १९६६) शिक्षण संपल्यावर त्यांनी  प्रथम दोन वर्षे साइन बोर्ड पेंटिंगचा व्यवसाय व नंतर ओगलेवाडी येथील काचकारखान्यात हिशोब खात्यात नोकरी केली . त्यानंतर आजतागायत ‘मौज’ या नियतकालिकाच्या संपादन विभागात काम करीत आहेत.

    बालवयापासून बराच काळ कवितालेखन. कवितेवर आत्यंतिक प्रेम. पहिली कविता मराठी चौथीत असताना, पां.ना.मिसाळ यांच्या ‘बालसन्मित्र’मध्ये प्रसिद्ध. पहिली गोष्ट का.रा.पालवणकरांच्या ‘खेळगडी’च्या शेवटच्या बाललेखांकात प्रसिद्ध. नंतर कविता-लेखनावरच भर. बहुतेक कविता लहान-मोठ्या नियतकालिकांमधून छापून आल्या. कवितालेखन थांबल्याबद्दल नेहमीच खंत, पण कवितेवर नितांत श्रद्धा.

     मात्र श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची खरी ओळख आहे, ती ललितलेखक म्हणून. त्यांचा पहिला ललित लेख ‘मनातल्या उन्हात’ हा १९६० मध्ये ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाला. येथून पुढे त्यांचा ललित लेखनाचा प्रवास सुरू झाला. त्यांचे ललित लेखन पुढीलप्रमाणे आहे. ‘डोह’ (१९६५), ‘सोन्याचा पिंपळ’ (१९७५), ‘पाण्याचे पंख’ (१९८७) आणि ‘कोरडी भिक्षा’ (२०००). हे सर्व संग्रह ‘मौज’ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यांमधील सर्व लेख प्रथम ‘सत्यकथा’ आणि ‘मौज’ या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.

     कोवळे भावविश्व-

     त्यांचा ‘मनातल्या उन्हात’ हा पहिला लेख सत्यकथेच्या ऑगस्ट १९६०च्या अंकात प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर १९६५मध्ये प्रसिद्ध झालेला ‘डोह’ हा पहिला ललितलेख संग्रह यांनी वाचकांना ललित लेखनाचा वेगळाच आविष्कार घडविला. ‘डोह’मध्ये लेखकाच्या बालपणाच्या आठवणी चित्रित झाल्या आहेत. बालवयातील सोनेरी अनुभव येथे साकार होतात. औदुंबरचा परिसर, तेथील निसर्ग -झाडे, पक्षी, कृष्णा नदी, डोह, सुसरी- यांच्या पार्श्वभूमीवर हे लेखन एक वेगळाच रंग घेऊन अवतरते. लेखांच्या शीर्षकांपासूनच हे वेगळेपण जाणवायला लागते. उदाहरणार्थ ‘आम्ही वानरांच्या फौजा’, ‘मृगजळाच्या यक्षघराला’, ‘मनातल्या उन्हात’, ‘शब्दांच्या संध्याकाळी’ इत्यादी. ही शीर्षके कधी बोलकी होतात, तर कधी ती गूढ होऊन वाचकांची उत्सुकता वाढवितात. या सर्व लेखांमधून लहान मुलांचे जे निखळ भाव-विचार-विश्व उभे राहते, ते विलोभनीय आहे. प्रौढ मनाने बालवयात शिरून बालकाच्या कोवळ्या नजरेने टिपलेले हे विश्व कोणालाही मोह घालणारे, हवेहवेसे वाटणारे, स्वप्नवत असे आहे; पण तरीही हे स्वप्नरंजन मात्र नाही.

     ‘सोन्याचा पिंपळ’मधील लेखांमधून साकार होणारे विश्व ‘डोह’पेक्षा अगदी वेगळे आहे. प्रौढ मनाला जाणवणारे, प्रत्ययाला येणारे काही गूढ, येथे अतींद्रिय अनुभव शब्दबद्ध होतात. ‘आस्तिक-आस्तिक’मधील सापांचे विविध अनुभव, ‘धनानि भूमौ’मधील गुप्त धनासंबंधीचे अनुभव, ‘रूपांतर’मधील देहातीततेची जाणीव; असे एक वेगळेच अनुभवविश्व वाचकांसमोर येते. ‘सोन्याचा पिंपळ’ हा लेखही वेगळ्याच पातळीवर घेऊन जाणारा आहे. ‘काळोख चहूकडे’ आणि ‘तळ्याकाठी संध्याकाळी’ हे लेख आकाराने विस्तृत व काहीसे कथेच्या अंगाने गूढरम्य अनुभव सांगणारे आहेत. ‘घंटीवाला’ या लेखात आपल्या छोट्या भावाचा मृत्यूपर्यंत होणारा प्रवास लेखकाने सांगितला आहे. तो वाचताना एकाच वेळी त्रयस्थ, तटस्थ आणि तरीही आत्मनिष्ठ अशा भावनांचा प्रत्यय येतो. ‘डोह’ आणि ‘सोन्याचा पिंपळ’ या दोन्ही संग्रहांचा एक वेगळेपणा म्हणजे यांतील लेखांमधून साकारणारे लेखकाचे वडील आणि स्वतः लेखक यांच्यामधील बाप-लेकाचे प्रगल्भ नाते.

     ‘पाण्याचे पंख’ या संग्रहात घरात आणि सभोवती असणार्‍या, वावरणार्‍या लहान मुलांचे भावविश्व साकारले आहे. ‘अलोक’, ‘पदम’, ‘मनू’, ‘मिकी’ इत्यादी लहान मुलांचे हसणे, खेळणे, बागडणे हे लेखकाच्या नजरेतून टिपताना आपल्या सभोवतालच्या लहान मुलांच्या जगाशी त्यांचे नाते जुळलेले दिसते.

     ‘कोरडी भिक्षा’ या संग्रहात अनेक व्यक्तिचित्रे आली आहेत, आणि त्यांच्या चित्रणातून पुन्हा वेगळे अनुभव वाचकांसमोर उलगडले जातात.

     २०१३ सालच्या एका आधुनिक कालदर्शिकेत कुलकर्णी यांच्या साहित्यातील उतारा समाविष्ट करण्यात आला आहे, हा एक वेगळा प्रयोग मानला जातो. 

     या सर्व लेखनाला जोड मिळाली आहे, ती लेखकाच्या चित्रदर्शी शब्दकलेची. चित्रकलेच्या संस्कारातून येणारी दृश्यमयता, निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणामधून वर्णनात येणारा बारकावा आणि अनुभवाचा तळ गाठणारी पारदर्शी लेखनशैली यांमुळे लेखांमधील आशय एक वेगळीच उंची गाठतो. ललित लेखनाला एक वेगळेच परिमाण देऊन हे लेखन समृद्ध करणारा लेखक म्हणून श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे नाव निश्चितच अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

- डॉ. नंदा आपटे

कुलकर्णी, श्रीनिवास विनायक