Skip to main content
x

वैद्य, अरुणकुमार श्रीधर

           भारतीय सैन्याचे तेरावे सरसेनापतीपद (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) भूषविणाऱ्या अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील अलिबागचे जिल्हाधिकारी होते. अरुणकुमार यांचे प्राथमिक शिक्षण अलिबाग येथील टोपीवाला इंडस्ट्रीयल हायस्कूलमध्ये झाले. काही काळ पुण्याच्या रमणबाग शाळेतही त्यांचे शिक्षण झाले. मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात सैन्यात जाण्याची ओढ निर्माण झाली. १९४४ साली त्यांना सैन्यात तातडीची नियुक्ती (इमर्जन्सी कमिशन) मिळाली.

१९४५ साली त्यांना भारतीय सैन्याच्या चिलखती दलात कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली आणि त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभागही घेतला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात नवव्या डेक्कन हॉर्स या चिलखती तुकडीचे ते सातवे कमांडर होते. भारतीय सैन्यातील ही एक सर्वांत जुनी चिलखती तुकडी (रेजिमेंट) होय. आधी ही घोडदळाची तुकडी होती आणि नंतर तिच्याकडे शर्मन रणगाडे देण्यात आले होते. अरुणकुमार यांनी अहमदनगर येथील आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूलयेथे प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षणाच्या दरम्यान सुरुंग पेरलेल्या हौदातून पाण्यातील अडथळे ओलांडत असताना सुरुंगाच्या वायरीला पायाचा स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत अरुणकुमार बेशुद्ध होऊन पडले होते, पण काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांत जाऊन मिसळले. त्यांचे मनोधैर्य पाहून निक्सन नावाच्या ब्रिटिश मेजरने हा तरुण सैन्यात मोठा अधिकारी होईलअसे म्हटले होते, ते बोल पुढे खरे ठरले.

१९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या अरुणकुमार यांनी डेक्कन हॉर्सचे नेतृत्व केले होते. दि.६ ते ११ सप्टेंबरच्या काळात त्यांच्या तुकडीने पंजाब प्रांतातील असल उतार व चिमा या भागात अनेक मोहिमा लढल्या. या वेळी पाकिस्तानकडे अमेरिकन बनावटीचे पॅटन रणगाडे होते, तर भारतीय सेनेकडे जुने अमेरिकन शर्मन रणगाडे होते. परंतु प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करत अरुणकुमार यांनी आपल्या कुशल नेतृत्वाचा परिचय घडविला. आपल्या तुकडीची घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करत खेमकरण विभागात ३६ पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा उडविला. या लढाईत पाकिस्तानी सैन्याने सुमारे शंभरेक रणगाडे मागे सोडून माघार घेतली. या लढाईनंतर पाकिस्तानला नाक मुठीत धरून युद्धविराम पत्करावा लागला. अरुणकुमार वैद्य यांना या शौर्यासाठी दि.६ सप्टेंबर १९६५ रोजी महावीर चक्रप्रदान करण्यात आले.

१९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी ब्रिगेडियर वैद्य एका चिलखती पथकाच्या (ब्रिगेड) कमांडरपदी होते. हे पथक जाफरवाल क्षेत्रात पश्चिम आघाडीवर होते. त्यांनी आपल्या पथकाची जलद हालचाल करून शत्रूचे रणगाडे ताब्यात घेऊन शत्रूला चकित केले. आपल्या रणगाड्यांची अथकपणे आक्रमक हालचाल करून पाकिस्तानी सेनेचा सामना करण्यासाठी आपल्या डिव्हिजनला सरसावत ठेवले. चकरा व दाहिराच्या लढाईत शत्रूने पेरलेल्या भूसुरुंगाच्या भागातून त्यांनी आत्मविश्वासाने आपल्या सैनिकांना घेऊन निधड्या छातीने पुढेच वाटचाल केली. त्यांच्या प्रेरक नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याचा प्रतिहल्ला मोडून काढण्यास संपूर्ण स्क्वॉड्रन पुढे सरसावली.

शकरगढ क्षेत्रातील बसंतारच्या लढाईतही आपल्या अतुलनीय पराक्रमाचे व नेतृत्चगुणाचे दर्शन ब्रिगेडियर अरुणकुमार वैद्य यांनी घडविले. या वेळी शत्रूने दूरवरच्या क्षेत्रात पेरलेल्या सुरुंगांवरून त्यांनी आपले रणगाडे पुढे नेले आणि शत्रूच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. या लढाईत आपल्या सैन्याने ६२ पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा उडविला. यातील अपूर्व शौर्याबद्दल वैद्य यांना दुसरे महावीरचक्रप्रदान करण्यात आले.

१९७३ मध्ये अरुणकुमार वैद्य मेजर जनरल झाले. त्यांनी डायरेक्टर मिलिटरी ऑपरेशन्स, सदर्न कमांड मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ आणि आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूलचे कमांडंट अशा महत्त्वाच्या पदांवरही काम केले. जानेवारी १९८० मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरल म्हणून बढती मिळाली. त्यांनी मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स आणि नंतर जनरल ऑफिसर कमांडिग ऑफ अ कॉर्प्स या पदांवरूनही काम केले. १९८१ साली वैद्य यांची पूर्व विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदोन्नती झाली. ईशान्य भागात नागालँडमध्ये जो बंडखोरीचा उद्रेक माजला होता, त्याला आवर घालण्याचे कार्य त्यांनी मोठ्या कौशल्याने केले. बंडखोर नागांचा स्वयंघोषित जनरल मोबू अंगामी व त्याच्या सहकाऱ्यांना जेरबंद करण्यात आले. १९८३ मध्ये त्यांना परमविशिष्ट सेवा पदकप्रदान करून त्यांच्या अत्युच्च गुणवत्तापूर्ण कामगिरीचा गौरव करण्यात आला.

जनरल वैद्य यांनी चीफ ऑफ द आर्मी स्टाफहे पद १ऑगस्ट१९८३ रोजी स्वीकारले आणि ३१जानेवारी१९८६ पर्यंत ते या पदावर होते. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकही देण्यात आले. याच काळात त्यांनी सुवर्णमंदिरात घुसलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांचा नायनाट करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टारही सैनिकी कारवाई सुवर्णमंदिरात केली. हा अत्यंत अवघड असलेला निर्णय त्यांनी कर्तव्यपरायण वृत्तीमुळे घेतला. सुमारे चाळीस वर्षांची सेवा अतिशय उत्तम प्रकारे बजावून अरुणकुमार वैद्य सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते पुण्यात कोरेगाव पार्क येथे निवृत्तीनंतरचे जीवन सुखाने व्यतीत करण्यासाठी राहायला आले. मात्र ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा सूड घेण्यासाठी देशद्रोही खलिस्तानवादी अतिरेक्यांनी वैद्य यांच्या हालचालींवर नजर ठेवून १०ऑगस्ट१९८६ रोजी त्यांची हत्या केली. वैद्य यांना मरणोत्तर पद्मविभूषणहा सन्मान देऊन सरकारने त्यांच्या देशसेवेचा गौरव केला.

स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाच्या वेळी ब्रिटिश पद्धतीची तलवार वापरण्यात येत असे. नागपूर येथील शंकरराव चिटणवीस यांच्या सूचनेला व  रेखांकनाला अनुसरून वैद्य यांनी पुढाकार घेऊन २६जानेवारी१९८६ पासून भारतीय पद्धतीप्रमाणे असलेली बाकदार तलवार वापरण्याचा निर्णय अमलात आणला.

जनरल वैद्य यांचे लष्करी नेतृत्त्व अनुपम होते. त्यांनी आपल्या व्यापक आणि दीर्घकालीन अनुभवाच्या बळावर भारतीय सेनेला कुशल नेतृत्त्व देऊन यशाची कमान चढती राखली.

अरुणकुमार वैद्य यांचे शिक्षण जेथे झाले त्या अलिबाग येथील टोपीवाला इंडस्ट्रियल हायस्कूलला जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलअसे नाव देण्यात आले आहे.

- दीपक हनुमंत जेवणे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].