Skip to main content
x

नाडकर्णी, जयंत गणपत

यंत गणपत नाडकर्णी यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णाबाई होते.  त्यांना दोन बहिणी होत्या. सुप्रसिद्ध समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी हे त्यांचे ज्येष्ठ बंधू होत. त्यांचे वडील गणपतराव हे उत्तम केमिस्ट होते. लेमन हेअर क्रीमआणि सुकेशा हेअर ऑइलया त्या काळी खूप गाजलेल्या उत्पादनांचे ते संशोधक व संस्थापक होते. ते मूळचे कारवारचे.  ते मुंबईतील ऑपेरा हाउस परिसरात राहत. त्यामुळे जयंत व त्यांच्या भावंडांचे शिक्षण गिरगावातील चिकित्सक हायस्कूलमध्ये झाले. जयंत नाडकर्णी शाळेत शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

जयंत नाडकर्णी इंग्रजी सहावीत असतानाच (आजच्या नववीच्या समकक्ष) वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांची आय.एम.एम.टी.एस. डफरीनया व्यापारी नौदल प्रशिक्षण जहाजावर प्रशिक्षणाकरिता निवड झाली. खरे तर, ‘डफरीनवर वयाच्या सोळाव्या वर्षीच प्रवेश दिला जात असे; पण नाडकर्णी याला अपवाद ठरले. तीन वर्षांच्या खडतर अभ्यासक्रमाअंती त्यांनी एक्स्ट्रा फर्स्ट क्लास सर्टिफिकेटही डफरीनवरील सर्वोच्च पदवी मिळविली. तेथून त्यांची भारतीय नौसेनेत फेबु्रवारी १९४९ मध्ये विशेष निवड झाली. भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले असल्यामुळे सेनादलांच्या विशेष प्रशिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्यांना मार्च १९४९ मध्ये प्रशिक्षणासाठी ब्रिटनमधील डार्टमाउथ येथील रॉयल मरीन नेव्हल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. मे१९५३ मध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले.  भारताने ब्रिटनकडून खरेदी केलेल्या आय.एन.एस. गंगा या युद्धनौकेवर त्यांची दिशादर्शक अधिकारी (नेव्हिगेशन ऑफिसर) म्हणून नियुक्ती झाली. जुलै १९५५ मध्ये त्यांना दिशादर्शनातील विशेष अभ्यासक्रमासाठी पुन्हा ब्रिटनला, रॉयल मरीन नेव्हल कॉलेजला पाठविण्यात आले. त्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवून मार्च १९५६ मध्ये भारतात परतल्यावर आय.एन.एस. तीर या फ्रिगेट गटातील युद्धनौकेवर त्यांची दिशादर्शन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

एप्रिल १९५६ मध्ये त्यांचा कारवारच्या विमल दिवेकर यांच्याशी विवाह झाला. ऑक्टोबर १९५६ पासून पुढील पाच वर्षे त्यांनी आय.एन.एस. दिल्ली या क्रूझर गटातील युद्धनौकेवर दिशादर्शन अधिकारी म्हणून काम केले.

डिसेंबर १९६१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून गोवा प्रदेश पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला. त्या वेळी नौसेनेची भूमिका महत्त्वाची होती. तेव्हा जयंत नाडकर्णी यांच्यासह काही जणांना पुन्हा आय.एन.एस. दिल्लीवर जबाबदारी देण्यात आली. या संग्रमात दीवमध्ये शिरणे भारतीय भूसेनेला शक्य होत नव्हते. त्या वेळी आय.एन.एस. दिल्लीने दीवच्या किल्ल्यावर अत्यंत जवळून तोफांचा भडिमार करून तेथील पोर्तुगिजांना जेरीस आणले. त्यामुळे भारतीय भूसेनेला दीववर ताबा मिळविणे सोपे गेले. या लढाईत नाडकर्णी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

१९६२ मध्ये नाडकर्णी यांची नियुक्ती कोचीन येथे झाली. १९६४ मध्ये त्यांना वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. मे १९६४ पासून एका वर्षासाठी त्यांची नियुक्ती आय.एन.एस. विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर झाली. त्यानंतर पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एन.डी.ए.) त्यांची जी-२ स्तरावर समन्वयक म्हणून नेमणूक झाली. तेथून त्यांना कमांडरपदी बढती मिळाली आणि त्यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयात झाली. त्यांचे काम संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांत भारताला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विविध योजना आखून नियोजन करणे व क्रियान्वयनात मदत करणेे अशा स्वरूपाचे होते. 

त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील माझगाव गोदी व कलकत्त्यातील गार्डन रीच या गोदींच्या आधुनिकीकरणास चालना मिळाली. पोर्तुगिजांच्या पराभवानंतर बंद पडलेली गोवा गोदीही नौदलाने ताब्यात घेतली. या सर्व गोदींच्या पुनर्उभारणीत नाडकर्णी यांचा मोलाचा वाटा होता. त्या वेळी लिएंडर जातीच्या युद्धनौका माझगाव गोदीत बनत होत्या. त्यांचे आधुनिकीकरण करून नीलगिरीया जातीच्या नवीन संपूर्ण भारतीय बनावटीच्या युद्धनौका बनवायला माझगाव गोदीने १९६७ साली सुरुवात केली. या प्रकल्पांच्या नियोजनात नाडकर्णी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

१९६९ मध्ये त्यांची नियुक्ती आय.एन.एस. तलवार या युद्धनौकेच्या कमांडरपदी झाली.  जानेवारी १९७० मध्ये त्यांना नौसेनेच्या पश्चिम विभागाचे फ्लीट ऑपरेशन ऑफिसरम्हणून जबाबदारी दिली गेली. पश्चिम ताफ्याच्या  दैनंदिन व्यवस्थापनाच्या कार्यात फ्लीट कमांडरसोबत फ्लीट ऑपरेशन ऑफिसरचा महत्त्वाचा सहभाग असतो.

१९७१ मध्ये त्यांना एक, वर्षासाठी अमेरिकेतील र्‍होड आयलंड येथे नेव्हल वॉर कॉलेजमध्ये नेव्हल कमांड कोर्ससाठी पाठविण्यात आले. १९७२ मध्ये त्यांना कॅप्टनपदी बढती देऊन वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये नौसेनेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.

१९७४ मध्ये त्यांची आय.एन.एस. दिल्लीच्या कॅप्टनपदी नियुक्ती झाली. दोन वर्षे त्यांनी आय.एन.एस. दिल्लीची धुरा सांभाळली. या काळात आय.एन.एस. गोदावरी (डी ९२ जातीची) ही जुनी युद्धनौका मालदीवच्या किनार्‍यावर पोवळ्यांच्या बेटावर रुतली होती. ती सोडवून सुखरूपपणे भारतात कोची येथे खेचून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आय.एन.एस.दिल्लीने पार पाडले.

मे १९७६ मध्ये नौसेनेच्या पश्चिम विभागाचे चीफ ऑफ स्टाफम्हणून त्यांची नियुक्ती झाली. परेरा, गांधी आणि बार्बुझा या तीन व्हाइस अ‍ॅडमिरल्सचे सहकारी म्हणून त्यांनी नौसेनेच्या पश्चिम विभागाची धुरा सांभाळली. १ जानेवारी १९७८ रोजी एअर इंडियाचे एम्परर अशोकनावाचे जंबो जेट  उड्डाण करताना मुंबईच्या वांद्रे येथील समुद्रात कोसळले. तेव्हा तातडीचे मदत व बचावकार्य भारतीय नौसेनेने  नाडकर्णींच्या नेतृत्वाखाली हाती घेतले. या दुर्घटनेत एकही प्रवासी वाचू शकला नाही; पण या विमानाचे सर्व महत्त्वाचे भाग आणि ब्लॅक बॉक्स नौसेनेने शोधून तपास पथकांकडे सुपूर्द केले. त्यामुळे ही दुर्घटना नक्की कशी झाली, हे तपास यंत्रणांना शोधून काढता आले.

डिसेंबर १९७९ मध्ये त्यांची रिअर अ‍ॅडमिरलपदी नियुक्ती झाली. त्याच काळात त्यांच्यावर १९८१ पर्यंत नवी दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये नौसेनेचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.

मे १९८१ मध्ये त्यांची नियुक्ती नौसेनेच्या पश्चिम विभागात पश्चिमी ताफ्याच्या प्रमुख (फ्लीट कमांडर) पदी झाली. ऑगस्ट १९८२ मध्ये त्यांना व्हाइस अ‍ॅडमिरल पदी बढती मिळाली. त्यांची नियुक्ती नौसेना मुख्यालयात चीफ ऑफ पर्सोनेलम्हणून करण्यात आली. नौसेनेची मनुष्यबळ विकासासंदर्भातील धोरणे आखण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. नौसैनिकांच्या निवडीसंदर्भात आणि प्रशिक्षणासंदर्भात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राबविले.

मार्च १९८४ मध्ये त्यांची नियुक्ती नौसेनेच्या पूर्व विभागाचे मुख्य ध्वजाधिकारी’ (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ) या पदावर विशाखापट्टणम येथे झाली.  मार्च १९८६ मध्ये त्यांना नौसेनेचे उपप्रमुख म्हणून व्हाइस अ‍ॅडमिरलपदी बढती देण्यात आली. तेथे नौसेनेच्या नियोजन खात्याचे प्रमुख म्हण्ाून त्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या काळात अ‍ॅडमिरल तहलियानी नौसेनेचे प्रमुख होते.

नोव्हेंबर १९८७ मध्ये त्यांची भारताच्या नौसेनेचे प्रमुख म्हणून अ‍ॅडमिरलपदी नियुक्ती करण्यात आली. नौसेना प्रमुखपदाच्या त्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत दोन वर्षे ते भारतीय सेनादलांचे संयुक्त प्रमुख (चीफ ऑफ जॉइंट चिफ्स ऑफ स्टाफ’) होेते.

३ नोव्हेंबर १९८८ रोजी मालदीव बेटांवर बंडखोरांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गयूम यांचे सरकार उलथून टाकण्याचा सशस्त्र प्रयत्न केला. या बंडात श्रीलंकेतील तामीळ अतिरेकी भाडोत्री सैनिक म्हणून सामील झाले असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे वातावरण पसरले. राष्ट्राध्यक्ष गयूम यांनी कसाबसा स्वत:चा जीव वाचवून भारताकडे मदतीची याचना केली. त्याला भारत सरकारने ताबडतोब प्रतिसाद दिला.

बंड झाल्यापासून अवघ्या बारा तासांत भारतीय सेनादलांचे दीड हजाराहून अधिक छत्रीधारी सैनिक (पॅराट्रूपर्स) भारतीय वायुसेनेच्या मदतीने मालदीवमध्ये उतरले आणि पुढील अवघ्या काही तासांत मालदीवमधील बंडाचा बिमोड करून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष गयूम यांचे सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यात आले. मात्र काही बंडखोर मालदिवच्या एका मंत्र्याला ओलीस म्हण्ाून बरोबर घेऊन जहाजावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. भारतीय नौसेनेने पुढील अठ्ठेचाळीस तासांत हिंदी महासागरात त्यांचा शोध घेऊन बंडखोरांना ताब्यात घेतले. यांना तुतीकोरीन येथे कोठडीत ठेवण्यात आले. मालदिवच्या मंत्र्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. त्या सर्व बंडखोरांवर मालदिव येथे नंतर खटला चालला आणि त्या सर्वांना अत्यंत कडक शिक्षा फर्मावण्यात आली. या बंडामागे श्रीलंकेत स्थायिक झालेला असंतुष्ट मालदिवी उद्योजक असल्याचे नंतर निष्पन्न झाले. मालदिवच्या बंडखोरांविरुद्धच्या या ऑपरेशन कॅक्टसमोहिमेत भारतीय नौसेनेची आणि नौसेनाप्रमुख जयंत नाडकर्णींची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. विशेष म्हणजे या मोहिमेत नौसेनेच्या आय.एन.एस. गोदावरी (एफ २०)  आणि आय.एन.एस. बेटवा (एफ ३९) या फ्रिगेट जातीच्या युद्धनौकांनी प्रामुख्याने भाग घेतला होता.

अ‍ॅडमिरल नाडकर्णी यांनी संरक्षण मंत्रालयात नौसेनेतर्फे कार्यरत असताना भारतीय संरक्षण उद्योगाच्या उभारणीत प्रमुख जबाबदारी पार पाडली. त्यांनी भारतीय आण्विक पाणबुडी प्रकल्पाच्या मूलभूत सुविधांच्या उभारणीचे कार्य यशस्वी केले. डॉ.राजा रामण्णा यांच्यासोबत त्यांनी या काळात कार्य केले.  ते नौसेनेचे उपप्रमुख असताना  भारतातील सर्व संरक्षणविषयक प्रशिक्षण संस्थांच्या कार्यांचा अभ्यास करून त्यांनी एक सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. त्यातील सर्व सूचना स्वीकारण्यात आल्या. त्या अहवालानुसार या सर्व संस्थांच्या कार्यप्रणालीत आणि अभ्यासक्रमात आधुनिक काळाला योग्य असे अनेक महत्त्वपूर्ण बदल नंतर लवकरच करण्यात आले. त्यांना १९६९मध्ये विशिष्टसेवा पदक, १९७७ मध्ये नौसेनापदक, १९८३ मध्ये अतिविशिष्टसेवा पदक आणि १९८५ मध्ये परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या दोन मुलांपैकी रवींद्र नाडकर्णी भारतीय नौसेनेत कमांडरपदी कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले आहेत. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजया संस्थेचे ते एक संस्थापक असून पहिले संचालक होते. संरक्षण विषयातील जाणीव जागृती करण्यात ते आघाडीवर असून या संदर्भातील विविध विषयांवर वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून ते सतत लिखाण करीत असतात.

- राजेश प्रभु साळगांवकर

नाडकर्णी, जयंत गणपत