Skip to main content
x

देशपांडे, मनोज मधुकर

      मनोज मधुकर देशपांडे यांचा जन्म कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे शिक्षण सातारा येथील सैनिकी शाळा व पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) येथे झाले. वयाच्या बाविसाव्या वर्षी दि. १० जून १९९५ या दिवशी आपले शिक्षण संपवून ते सैन्यःच्या सेवेत दाखल झाले. मनोज देशपांडे हे आठव्या जम्मू-काश्मीर लाइट इन्फन्ट्री या तुकडीत मेजर या हुद्द्यावर कार्यरत होते. भारताच्या उत्तर सीमेवरील सिराचीन या जगातील  सर्वात उंच सीमा क्षेत्रावर अत्यंत बर्फाळ प्रदेशात त्यांची नेमणूक झाली होती.
       दि. २४ ऑगस्ट २००० रोजी जम्मू काश्मीर  क्षेत्रातील दोडा-पूंछ येथील सीमारेषेवर असलेले आपले ठाणे काबीज करण्याचा शत्रूचा प्रयत्न, मनोज देशपांडे यांनी एका खास कृतिदलाचे नेतृत्व करीत यशस्विरीत्या परतवून लावला. शत्रू या ठाण्यावर हल्ला करणार अशी खात्रीलायक बातमी गुप्तहेरांकडून समजल्यावर सैन्याने लगेच कारवाई केली. मेजर मनोज देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली तेथे पलटण (प्लॅटून) तैनात करण्यात आली; त्यामुळे त्या चौकीतील आधीच्या जवानांना आणखी बाल मिळाले. 
      
शत्रूच्या हल्ल्याआधी करण्यात आलेल्या मोठ्या गोळीबारात व तोफांच्या माऱ्यात प्रत्येक खंदकात जाऊन मनोज देशपांडे यांनी आपल्या जवानांना प्रोत्साहन दिले, तसेच स्वतःही मोकळ्या खंदकात जाऊन, स्वतः शत्रूशी दोन हात करून आपल्या तुकडीतील जवानांपुढे आदर्श घालून दिला. एक शत्रूसैनिक हातगोळा फेकण्याच्या तयारीत असलेला पाहिल्यावर, त्यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्या सैनिकाजवळ जाऊन त्याला गोळी घातली. या धीट चढाईने आश्चर्यचकित होऊन शत्रूने माघार घेतली. त्यांचे बारा जवान मारले गेले व कित्येकांना शस्त्रे मागे ठेवून पळ काढावा लागला. मेजर मनोज देशपांडे यांना त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले.
-संपादित

देशपांडे, मनोज मधुकर