देशपांडे, शरच्चंद्र नरेश
शरच्चंद्र नरेश देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील, वडनेर तालुक्यातील गंगई या छोट्याश्या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथील श्री समर्थ, तसेच व्हीएमव्ही विद्यालयात झाले, दि.२४ डिसेंबर १९५७ रोजी ते वायुसेनेत दाखल झाले. देशपांडे हे ‘जेट बॉम्बर कॉन्व्हर्जन युनिट’ च्या ‘इन्स्ट्रक्टर स्टाफ’ मध्ये दिशादर्शक म्हणून कार्यरत होते. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात बॉम्बर विमानातून त्यांनी शत्रूप्रदेशातील सात मोहिमांमध्ये भाग घेतला. बॉम्बर विमानांचे प्रमुख चालक म्हणू त्यांनी त्या वेळी महत्वाची भूमिका बजावली, तसेच प्रत्येक मोहिमेमध्ये यश मिळविले.
या मोहिमेत त्यांनी अतुलनीय धैर्य, व्यावसायिक कौशल्य आणि कर्तव्यनिष्ठा या तीनही गुणांचे दर्शन घडवले. त्यांचा ‘वीरचक्र’ देऊन सन्मान करण्यात आला. पुढे त्यांना एअर व्हाइस मार्शल पदापर्यंत बढती मिळाली.
-संपादित