Skip to main content
x

नंबियार, सतीश के

      सतीश के नंबियार यांचा जन्म मुंबई येथे झाला. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयामधून शिक्षण पूर्ण केल्यावर यांनी दि. १५ डिसेंबर १९५७ रोजी भारतीय भूसेनेत प्रवेश करून पहिल्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये सेवेस सुरुवात केली.१९६२मध्ये  चीनबरोबर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये नंबियार यांनी जम्मू काश्मीरच्या सीमेवर वीस मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या सैनिकांसह लढा देऊन युद्धविराम दिला. १९६८मध्ये त्यांनी ऑस्ट्रियन स्टाफ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात पूर्व विभागात मराठा लाइट इन्फन्ट्रीने उभारलेल्या एका मोर्चाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. दि. १० डिसेंबर १९७१ रोजी शत्रूने मोठ्या ताकदीने या मोर्चावर हल्ला चढवला. ह्या हल्ल्याला तोफखाना, उखळी तोफा व मशीनगनच्या जोरदार माऱ्याचे पाठबळ होते.
     अशा प्रसंगी मेजर नंबियार यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मोर्चातील प्रत्येक सैनिकाला प्रतिकारासाठी प्रोत्साहित केले. या धुमश्चक्रीदरम्यान शत्रू अगदी जवळ म्हणजे चाळीस यार्डांच्याही आत येऊन पोहोचला होतो. परंतु मेजर नंबियार व त्यांच्या तुकडीने निकराचा प्रतिकार करून हल्ला परतवून लावला. शत्रूने दि. ११ डिसेंबर रोजी फिरून केलेला हल्लासुद्धा परतवून लावण्यात मेजर नंबियार यांनी यश मिळविले.
     या धुमश्चक्रीमध्ये मेजर नंबियार यांनी दाखविलेल्या असामान्य धाडस आणि नेतृत्वगुणांबद्दल त्यांना ‘वीरचक्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नंबियार हे जुलै १९७७ ते जानेवारी १९७९ यादरम्यान इराक येथे भारतीय  लष्करी प्रशिक्षण केंद्राचे सदस्य राहिले आहेत, त्यांनी  १९८० ते ८२ या काळात वेलिंग्टनच्या  'डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज'मध्ये अध्यापनाचे काम केले.   १९८३ ते ८७ च्यादरम्यान नंबियार यांनी लंडनच्या भारताच्या उच्च आयोगात सल्लागार म्हणून काम पाहिले. याखेरीज त्यांनी भारताच्या लष्करी ऑपरेशनचे  'डायरेक्टर जनरल ' म्हणून काम पाहिले. नंबियार हे युनायटेड नेशन्ससाठी युगोस्लावियामध्ये भारताचे पहिले कमांडर तसेच मिशन प्रमुख होते. त्यांची लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत बढती होत  १९९४ साली निवृत्त होताना ते लष्कराचे उपप्रमुख होते.

निवृत्तीनंतर नंबियार यांनी युद्धासंबंधीच्या विषयांवर संशोधन तसेच लिखाणाचे काम केले . २०११ पासून ते दिल्ली येथील  इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस या संस्थेचे सदस्य म्हणून काम पाहतात.

२००९ साली नंबियार यांना त्यांच्या लष्करातील कामगिरीसाठी पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले.
-संपादित

नंबियार, सतीश के