नाईक, बाळकृष्ण रामचंद्र
बाळकृष्ण रामचंद्र नाईक यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील सैन्यात कर्नल या पदावर होते. दि. २ ऑगस्ट १९६४ रोजी बाळकृष्ण नाईक हे भारतीय भूसेनेतील आर्टिलरी रेजिमेंटमध्ये दाखल झाले. भूसेनेतील तुकडीमध्ये तोफखाना कमांडर असताना त्यांच्यावर पूर्व भागातल्या शत्रूची ठिकाणे काबीज करण्याची मोहीम सोपविण्यात आली होती. ही तुकडी हल्ला करण्याच्या तयारीत असताना शत्रूच्या तोफखाना तुकडीने मशीनगन आणि तोफांच्या साहाय्याने आपल्या तुकडीवर अतिशय जवळून हल्ला केला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.
स्वतःच्या सुरक्षेची काळजी न करता बाळकृष्ण नाईक पुढे सरसावले. त्यांना दोन मोठी मशीनगन ठाणी सापडली. त्यांनी तोफखान्याच्या सहाय्याने शत्रूवर हल्ला चढविला. त्यामुळे शत्रूसैन्य जखमी झाले. त्यामुळे नाईक यांचे उदिष्ट्य साध्य झाले. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना शौर्य, व्यावसायिकता आणि कामा प्रती झोकून देण्याची वृत्ती दाखवून दिली. १९७१ मध्ये बाळकृष्ण नाईक यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-संपादित