नाकिल, मारुती हरी
मारुती हरी नाकिल यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील नारोळी या गावी झाला. दि. २५ जून १९६२ रोजी ते लष्करात दाखल झाले. ते एकोणिसाव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये कार्यरत होते. १९७१ च्या पाकिस्तान युद्धात मध्यम पल्ल्याच्या मशीनगन विभागामध्ये ते कमांडर होते. पहिल्या आघाडीच्या सैनिक तुकडीमध्ये ते सैनिक असताना त्यांच्या तुकडीकडून करण्यात आलेल्या तोफखान्याच्या अचूक व तीव्र माऱ्यामुळे त्यांनी शत्रूचा निःपात केला. त्याचा वेळी दुसऱ्या बाजूने मध्यम पल्ल्याच्या तीन मशीनगन्सच्या माऱ्यामुळे शत्रूसैन्य मोठ्या प्रमाणात जखमी झाले. नाकील यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्वरित कारवाई करत शत्रूची मध्यम पल्ल्याची एक मशीनगन निकामी केली. या कारवाईत ते जखमी झाले व धारातीर्थी पडले. नाकील यांनी दाखवलेले धैर्य व नेतृत्वगुण यांबद्दल त्यांना मरणोत्तर ‘वीरचक्रा’ ने गौरविण्यात आले.
-संपादित